Press "Enter" to skip to content

वाचा दरवर्षी तुळशीविवाह का ?

विष्णू पुराण, पद्म पुराणासह अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये तुळशी विवाहाचा उल्लेख आहे जाणून घेऊयात तुळशी विवाहाची वैशिष्ट्ये

तुळशी विवाह

तुलसि श्रीसखि शुभे पापहारिणि पुण्यदे ।
नमस्ते नारदनुते नारायणमनःप्रिये ॥ – तुलसीस्तोत्र, श्‍लोक १५

अर्थ : हे तुलसी, तू लक्ष्मीची मैत्रीण, शुभदा, पापहारिणी आणि पुण्यदा आहेस. नारदाने स्तवलेल्या आणि नारायणाला प्रिय अशा तुला मी वंदन करतो.

प्रस्तावना :

हिंदु धर्मात तुळशीला देवी स्वरूपात पूजतात. आपण इतरवेळी तुळशिमाता म्हणून तिची पूजा करीत असलो तरीही कार्तिक शुद्ध द्वादशीपासून ते पौर्णिमेपर्यंत या कालावधीत तिला कन्या रुपात पूजन करून भगवान विष्णूच्या शाळीग्राम रूपाशी किंवा श्रीविष्णूचा (बाळकृष्णाच्या मूर्तीचा) तुळशीशी विवाह करतात, पूर्वीच्या काळी बालविवाहाची पद्धत होती. हा विवाह विधी पूजोत्सव म्हणून साजरा करण्याची प्रथा आहे. (विष्णू पुराण, पद्म पुराणासह अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये तुळशी विवाहाचा उल्लेख आहे. )

दरवर्षी तुळशीविवाह का?

१. तुळसी विवाह हे एक व्रत मानले गेले आहे. हे व्रत केल्याने कर्त्याला कन्यादानाचे फल मिळते असे मानतात. तुळसी विवाह व्रत हे एक काम्य व्रत आहे.

२. यामुळे सर्व इच्छा पूर्ण होतात आणि वैवाहिक जीवनात येणारे अडथळे दूर होतात. उत्तम संततीप्राप्त होते.
३. प्रत्येक विवाहित स्त्रीने तुळशी विवाह नक्की केला पाहिजे असे मानले जाते. असे केल्याने अखंड सौभाग्य प्राप्त होते.

४. घरच्या कन्येस श्रीकृष्णासारखा आदर्श वर मिळावा या हेतूने तुळशी विवाह करतात. (जोशी, महादेवशास्त्री (२००१). भारतीय संस्कृती कोश खंड ५. पुणे: भारतीय संस्कृतीकोश मंडळ प्रकाशन.)

५.तुळशी विवाह झाल्यानंतर चातुर्मासात जी व्रते घेतलेली असतील त्या सर्वांचे उद्यापन करतात.
६. विवाह संस्काराचे महत्व भावी पिढीला कळावे. यासाठी हा पूजोत्सव प्रत्येकाने आपल्या घरी अवश्य करावा.

तुळशीचे महत्व

हिंदू धर्मात तुळशीला पापनाशिनी म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुळशीचे केवळ आध्यात्मिक महत्व नसून आयुर्वेदात सुद्धा तिचे तितकेच महत्व आहे.

१. तुळस बहुगुणी आणि प्रभावी औषध आहे. त्यामुळे शास्त्राने देवपूजा व श्राद्ध यामध्ये तुळस आवश्यक सांगितली आहे.

२. एखाद्याच्या गळ्यात तुळशीची माळ असणे, हे धार्मिकतेचे व सदाचाराचे प्रतीक मानले जाते.

३. श्रीविष्णूला तुळस अतिशय प्रिय आहे. तुळशीचे पान वाहिल्याने तो जितका प्रसन्न होतो, तितका अन्य कशानेही प्रसन्न होत नाही.

४. तुळशीवरील उदक मस्तकी धारण केल्यास गंगास्नानाचे पुण्य लाभते.

५. तुळशीपूजेशिवाय नित्य पूजा पूर्ण होत नाही.

६. मरतेवेळी अंगावर तुळशीपत्र असणारा मनुष्य वैकुंठात जातो, अशी श्रद्धा आहे.

७. तुळशी दुषित वायू शोषून घेते आणि प्राणवायू सोडते, त्यामुळे वातावर शुद्ध होण्यास साहाय्य होते. हे विज्ञानाने सुद्धा सिद्ध केले आहे. म्हणून दारोदारी तुळशी वृंदावन बांधले जाते. तसेच शहरी भागात खिडकीतल्या कुंडीत, दाराजवळ तुळशीचे रोप लावले जाते. दारात तुळशी असणे, हे शुभ मानतात.

तुळशी विवाहाची पूर्वतयारी आणि प्रत्यक्ष पूजाविधी :

कन्या मानून, घरातील तुळशी वृंदावनाची-तुळशीचे रोप असलेल्या कुंडी आणि तुळस यांना सजवतात.
१. काही स्त्रिया आषाढी एकादशीला तुळशीचे रोप लावून ते वाढवतात आणि त्या तुळशीचा विवाह करतात.
२. तुळशीची कुंडी चुना आणि गेरूने रंगवून सुशोभित करतात. त्यावर राधा-दामोदर प्रसन्न असे लिहीतात.
३. तुळशीच्या चारी बाजूने ऊस लावून ऊसाचा मांडव करतात. उसाला मामाचा मान आहे, असे मानतात.
४. तुळशीला जरीचे नवीन वस्त्र पांघरावे. भगवान विष्णूला पिवळे वस्त्र घालावे. घरामध्ये शालिग्राम असल्यास ते पिवळ्या कपड्यात गुंडाळून तुळशीच्या मुळामध्ये ठेवावे.

५. वृंदावनांतील तुळशींत चिंचा, बोर, आवळे, सीताफळ, चातुर्मासात त्याज्य केलेल्या भाज्या जसे वांगी, कांदा आदी ठेवतात.

६. तुळशीसाठी सौभाग्य अलंकार:- मणी- मंगळसूत्र, जोडवे- विरोदे, हिरव्या बांगड्या, करंडा, फणी इ. वृंदावनात तुळशीच्या मुळाशी ठेवावे.

७. पूजेसाठी चौरंग, नागवेलीची पाने, सुपाऱ्या, खारीक, बदाम, फुले, हळद, कुंकू, शंख – घंटा, पळी, ताम्हण, फुलपात्र, हळकुंड, अष्टगंध, गहू, तांदुळ, अक्षतासाठी रंगीत तांदुळ, जानवे जोड, तूप, पंचामृत, निरनिराळी फळे, लाह्या, बत्तासे, खोबर्‍याच्या वाट्या, फराळाचे साहित्य, आंतरपाटासाठी कापड, हात पुसायला रुमाल, बसायला पाट किंवा आसन इ. साहित्य घ्यावे.

८. अंगण सारवून किंवा सदनिकेत रहात असल्यास स्वच्छता करून लादी स्वच्छ पुसावी. त्यावर विष्णू तत्व किंवा कृष्ण तत्वाची रांगोळी काढल्यास उत्तम. अन्यथा शक्य तशी सात्विक रांगोळी काढावी. तुळशी भोवती रांगोळी काढावी.

९. तुळशीसमोर पाटावर तांदुळाचे स्वस्तिक काढून त्यावर बाळकृष्ण ठेवावा. बाळकृष्णाचे तोंड पश्चिमेकडे असावे.

१०. तुळशीच्या मुळामध्ये तुपाचा दिवा लावावा. (धर्मसिंधु ग्रंथ)

११. दाराला आंब्याच्या पानाचे आणि झेंडूच्या फुलांचे तोरण बांधावे. शक्य असल्यास केळीचे गाभे, झेंडूच्या फुलांच्या माळा बांधून लग्न मंडप सुशोभित करावा.

१२. कुटुंबातील कर्ता पुरुषाने स्नान करून तुळशीची आणि कृष्णाची पूजा करावी.

१३. विवाह संस्काराप्रमाणे बाळकृष्ण व तुळशीला चढती हळद लावावी. नंतर दोघांची षोडशोपचारे, पंचोपचारे पूजा करावी. (श्रीसूक्त व पुरुषसूक्ताचा अभिषेक करावा) मंगलाष्टक म्हणण्याआधी पुण्याहवाचन विधी करावा. (सक्तीचे नाही) त्यानंतर दोघांमध्ये अंतरपाट धरून, उपस्थितांना अक्षता वाटाव्यात. मंगलाष्टक झाल्यानंतर उपवर मुलीने तुळशीच्या वतीने बाळकृष्णास हार घालावा. उपवर मुलगा- मुलगी नसल्यास इतरांनी घालावा. त्यानंतर बाळकृष्णाच्या वतीने तुळशीला मणी- मंगळसूत्र, ओटीचे साहित्य व इतर साहित्य उपवर मुलगा वाहील. ज्यांना संपूर्ण विधी शक्य नसल्यास फक्त ‘अलंकार समर्पण’ पर्यंत केला तरी चालतो. (संकलन- सदानंद पाटील, रत्नागिरी.)

१४. कर्त्याने यानंतर तुळशीचे कन्यादान करावे व नंतर मंत्रपुष्प आणि आरती करावी.

१५. या विधीच्या वेळी तुळशीभोवती दीप आराधना करण्याची पद्धती आहे. (जोशी, महादेवशास्त्री (२००१). भारतीय संस्कृती कोश खंड ५. पुणे: भारतीय संस्कृतीकोश मंडळ प्रकाशन.)

१६. आनंद व्यक्त करण्यासाठी लग्न लागल्यावर टाळ्या आणि सात्विक वाजंत्री वाजवण्याची प्रथा आहे. (शास्त्र आधार नाही.)

१७. फराळाच्या साहित्याचा प्रसाद दाखवून तो प्रसाद सगळ्यांनी ग्रहण करावा.

तुळशी विवाहाचा आध्यात्मिक लाभ होण्यासाठी पुढील कृती करा :

१. विष्णू आणि लक्ष्मी तत्वाचा लाभ होण्यासाठी विवाहाची पूर्वतयारी करतांना प्रत्यक्ष लक्ष्मी माता आणि श्री विष्णूचा विवाह आहे असा भाव ठेवावा.

२. श्री विष्णू आणि श्री लक्ष्मी यांना शरण जाऊन ‘तुम्हाला अपेक्षित असलेली विवाहाची पूर्वतयारी करून घ्यावी ‘ अशी प्रार्थना करावी.

३. तुळशी विवाह असला तरीही लगीनघाई असतेच. त्यात बरेचदा मनावर कामाचा ताण येतो, चिडचिड होते, असे होऊ नये आणि तुळशी विवाह भावपूर्ण व्हावा यासाठी स्वतःच्या मनाचे सतत निरीक्षण करावे. मनाला आनंदी आणि सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करावा.

४. सगळ्या कामाचे पूर्व नियोजन करावे. विवाहाच्या कामात घरच्या सगळ्यांना यथाशक्ती सहभागी करून घ्यावे.

५. हा पूजोत्सव भावपूर्ण संपन्न झाला म्हणून श्री विष्णू आणि श्री लक्ष्मी यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करावी.

प्रदेशानुसार तुळशी विवाह प्रथा :

गोवा, दीव आणि दमण येथे तुळशीविवाह सार्वजनिकरीत्या साजरा होतो. तुळशीची व बाळकृष्णाची वाद्यांच्या आणि फटाक्यांच्या दणदणाटात मिरवणूक निघते. सन २०१७मध्ये गोव्याच्या राज्यपालांनी तुळशीचे कन्यादान केले होते. हे नवभारत टाइम्स मधे सुद्धा प्रसिद्ध झाले होते.( २. ११. २०१७.)

महाराष्ट्रात तुळशी विवाह घरोघरी आणि मंदिरात करतात.

तुळशी विवाहाचे बदलते स्वरूप :

हा पूजोत्सव भावपूर्ण व्हावा यापेक्षा हल्ली दिखाव्याकडे कल अधिक असतो. इलेक्ट्रिकची रोषणाई, कृत्रिम भपकेबाज सजावट, फटाक्यांच्या आतिषबाजी चा अतिरेक, तर काही ठिकाणी फराळ ऐवजी बुफे घेण्याच्या चुकीच्या प्रथा रूढ होऊ लागल्या आहेत.

तुळशी विवाह हा पूजोत्सव भारतीय संस्कृतीची अनोखी ओळख आहे. तिची शास्त्रशुद्ध माहिती जाणून घेऊन हा पूजोत्सव साजरा करू या आणि आपल्या संस्कृतीचे जतन करू या.

सौजन्य : सनातन संस्था

संकलक : श्री. श्रीकृष्ण उपाध्ये,
सनातन संस्था,
(संपर्क : 98192 42733)

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.