
राष्ट्रीय एकता दिनानिमित्त खोपोली पोलीस ठाण्याच्या पुढाकाराने आयोजित एकता दौड
खोपोली :
राष्ट्रीय एकता दिनानिमित्त दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी “रन फॉर युनिटी – अर्थात एकता दौड” या उपक्रमाचे आयोजन खोपोली पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले. या उपक्रमाचा आरंभ खोपोली पोलीस ठाणे येथून झाला. शहरातील विविध भागांतून एकता दौडेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी ठिकठिकाणी दौडचे स्वागत करून सर्वांचा उत्साह अधिकच वृद्धिंगत केला. अखेरीस या दौडची पोलीस ठाण्याच्या आवारात सांगता झाली.
या प्रसंगी खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहुल यांनी दौड मध्ये सहभागींचे झालेल्यांचे मनःपूर्वक आभार मानत कौतुक केले. त्यांनी राष्ट्रीय एकतेचे महत्त्व अधोरेखित करत समाजातील सर्व घटकांनी परस्पर सलोखा आणि बंधुतेचा संदेश जनमानसात पोहोचवावा, असे आवाहन केले.
या उपक्रमात सहभागी झालेल्यांनी पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट, ट्रॅक पॅन्ट व शूज असा ड्रेसकोड परिधान केला होता. कार्यक्रमात उत्साही खोपोलीकर नागरिक, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, करिअर कोचिंग क्लासचे विद्यार्थी-विद्यार्थिनी, हेल्प फाउंडेशन, पोलीस मित्र संघटना आणि पत्रकार बांधव यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. खोपोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन हिरे यांच्या पुढाकाराने संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रभावीपणे पार पडला. पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी देखील या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेत समाजात एकतेचा संदेश दिला.





Be First to Comment