
कासवाच्या गतीने होत आहेत चेक क्लिअर : नवीन रियल-टाइम चेक क्लिअरन्स सिस्टीम म्हणजे तेलही गेले तूपही गेले हाती आले धुपाटणे !!!
एका दिवसात चेक होणार क्लियर ! असा गाजावाजा करत,सर्व माध्यमे गाजवत आरबीआयने राणा भीमदेवी थाटात घोषणा केली होती. ही सिस्टीम लागू केल्यानंतर कुठेतरी माशी शिंकली. एका दिवसात चेक क्लिअर होणं तर सोडूनच द्या अगोदरची देखील फिजिकल चेक क्लिअरन्स सिस्टीम कोलमडली असल्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावरती चेक क्लिअर होण्यासाठी ग्राहकांना वाट बघावी लागली. या वाट बघण्यामुळे कित्येक लोकांच्या दिवाळीची वाट लागली. सध्याच्या परिस्थितीत रियल टाईम चेक क्लिअरन्स सिस्टीम म्हणजे तेलही गेले तूपही गेले हाती आले धुपाटणे अशी परिस्थिती होऊन बसली आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) नवीन रियल-टाइम चेक क्लिअरन्स सिस्टीममुळे चेक लगेच क्लिअर होतील अशी अपेक्षा होती. पूर्वी चेक क्लिअर व्हायला दोन ते तीन दिवस लागायचे, पण आता एका दिवसात क्लिअर होणे अपेक्षित होते. मात्र, तांत्रिक अडचणी, चेकच्या स्कॅन केलेल्या इमेजेसची खराब क्वालिटी आणि कर्मचाऱ्यांचे अपुरे प्रशिक्षण यामुळे ही नवीन सिस्टीम एक डोकेदुखी ठरली आहे. यामुळे लोकांचे व्यवहार थांबले आहेत तसेच सणासुदीच्या खरेदीवरही याचा परिणाम झाला होता. दिवाळी उलटून गेल्यानंतर देखील ही सिस्टीम सुधारण्याची कुठलीही चिन्हे दिसत नाहीत. बँकेमध्ये चेक डिपॉझिट करताना किमान १० दिवस लागतील असा धमकी वजा इशारा देण्यात येतो.
चेक जमा केल्यानंतर खात्यात पैसे जमा व्हायला दहा ते बारा दिवस लागत असले तरी कित्येक ठिकाणी चेक देणाऱ्याच्या खात्यातून मात्र तातडीने पैसे वजा होतात. इतक्या मोठ्या प्रमाणात बँकांच्याकडे ही रक्कम विना वापर पडून राहते. या सर्व पार्श्वभूमीवर चेक प्राप्त करणाऱ्या ग्राहकांना असंख्य अडचणी येत असून देखील याबाबत मेन स्ट्रीम मीडियामध्ये बोटभर देखील बातमी येत नाही हे अत्यंत अनाकलनीय आहे. हा सावळा गोंधळ माध्यमांच्या मध्ये येऊ नये यासाठी सरकारमधून कोणी दबाव टाकत आहे काय? या प्रश्नाचे उत्तर शोधणे अत्यंत गरजेचे बनले आहे.
एरवी आर बी आय चे यश म्हणजे केंद्र सरकारचे यश असे समजून स्वतःची पाठ थोपटून घेणाऱ्या एन डी ए गोटातून देखील याबाबत कुठलेही भाष्य आलेले नाही.तर दुसरीकडे आरबीआयचे अपयश ते केंद्र सरकारचे अपयश असे समजून पार्श्वभाग आपटणाऱ्या भाजपा विरोधी इंडी/ मविआ अशा सर्वपक्षीय गोटातून देखील कुठलीही प्रतिक्रिया उमटत नाही. विरोधकांनी केवळ भाजपाला हरवणे एवढेच एक कलमी स्वार्थी राजकारण करणे बंद करून जनतेला होत असलेल्या समस्यांकडे लक्ष देणे अभिप्रेत आहे.देशभरात पेपरलेस बँक ट्रांजेक्शन चे आणि यू पी आय ट्रांजेक्शन वापरण्याचे प्रमाण निश्चितच वाढलेले असून चेकच्या माध्यमातून व्यवहार करण्याचे टक्केवारी प्रमाण अगदी सिंगल डिजिट वर आलेले आहे. असे असले तरी देखील सध्याच्या बँकिंग व्यवस्थेमधून चेक प्रणाली चे अस्तित्व नाकारणे कधीही योग्य होणार नाही. म्हणूनच रियल टाईम चेक क्लिअरन्स ही सिस्टीम शक्य तितकी लवकर अचूक करण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत अशी प्रतिक्रिया जनतेमधून उमटत आहे.




Be First to Comment