

पनवेल (प्रतिनिधी) परिया येथील बेकल गोकुलम गोशाळा येथे ‘परंपरा विद्यापीठा’च्या वतीने आयोजित पाचव्या दीपावली संगीत महोत्सवात रायगडचे सुपुत्र प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित उमेश चौधरी यांच्या सुमधुर गायनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या गाण्याच्या माधुर्याने संपूर्ण गोशाळा रसिकांच्या टाळ्यांच्या गजराने दुमदुमून गेली. यावेळी त्यांच्या गायकीने गोशाळेचा परिसर मंगलमय झाला होता.
केरळ राज्याच्या उत्तर भागात, कासरगोड जिल्ह्यातील रमणीय अळक्कोडे या गावात, ऐतिहासिक बेकल किल्ल्याजवळ, ही गोकुलम गोशाळा व श्रीकृष्ण मंदिर वसलेले आहे.या पवित्र स्थळातून प्रेम, परंपरा आणि निसर्गाशी संतुलित सहजीवन यांचा दिव्य संदेश आजही प्रसारित होत आहे. गोकुलम गोशाळा ही सनातन धर्माच्या संस्कृतीचे सजीव प्रतीक मानली जाते. त्यामुळे अशा पवित्र आणि आध्यात्मिक वातावरणात आयोजित झालेला हा संगीत महोत्सव अधिकच मंगलमय आणि अध्यात्मिक ऊर्जेने ओतप्रोत झाला. दिनांक २० ऑक्टोबर ते ०१ नोव्हेंबर पर्यंत म्हणजेच तेरा दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचे उदघाटन उद्योगपती व भारतीय गोसंरक्षण चळवळीचे कार्यकर्ते महावीर सोनिका यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी गोशाळेचे संस्थापक विश्णुप्रसाद हेब्बार, डॉ. नागरत्ना हेब्बार, संगीतगुरू वेल्लिकोट विश्णुभट्ट, तसेच प्रसिद्ध संगीतविद्वान थामरशैरी ईश्वरन भट्टथिरी उपस्थित होते.नेहमीप्रमाणे पं. उमेश चौधरी यांनी या महोत्सवातसुद्धा शास्त्रीय गायनाची किमया अधोरेखित करत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. त्यामुळे यावेळी हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या रसिक प्रेक्षकांनी व मान्यवरांनी त्यांच्या गायनाला भरभरून दाद दिली तसेच त्यांच्या गायनाची स्तुती केली. यावेळी तबल्यावर गणेश भागवत तर हार्मोनियमवर सतीश हेग्गर यांची वाद्य साथ लाभली. महोत्सवाच्या प्रारंभी उडुपीचे पावन आचार्य यांच्या नेतृत्वाखाली पंचवाद्य वीणेचा रंगतदार कार्यक्रम पार पडला. इडयार बंधू, उषा आणि जयलक्ष्मी भट्ट, टी. पी. श्रीनिवासन, श्रीहरी भट्ट, चैतन्य अशोक आणि वैष्णवी नांबियार यांनी मनमोहक सादरीकरण केले. महोत्सवाची सुरुवात आदित्य मोहन यांच्या कन्सर्टने झाली.
त्यानंतर भरत कृष्ण, श्याम कृष्ण, अनीश व्ही. भट्ट, गिरीजा शंकर सुंदरशन आणि विभा राजीव यांनीही आकर्षक सादरीकरण केले. जयलक्ष्मी शेखर आणि निवेदिता अरुण यांच्या वीणा कन्सर्टने गोशाळेत संगीत सरिता वाहिली. प्रसिद्ध वीणावादक म्हैसूर आर.के. पद्मनाभ यांच्या सुरेल वादनाने प्रेक्षक भारावून गेले; त्यांना साई गिरिधर (मृदंग) आणि चंद्रशेखर शर्मा (घटम) यांनी अप्रतिम साथ दिली. गुंजिरा वादनात साई भरत तर मुखशंख वादनात गोपी नादलया यांनी कार्यक्रमात रंग भरला. अनसूया पाठक, सर्वेश देवस्तळी, अभिज्ञा राव, शिल्पा पांज, स्नेहा गोमती, श्रीनिधी भट्ट, विभाश्री बैलारे, श्रुती वारिजाक्षन, श्रेया कोळत्ताय, प्रतिक्षा भट्ट आणि कांचना भगिनी यांच्या मैफिली तसेच गोशाळेचे संस्थापक विश्णुप्रसाद हेब्बार यांच्या रचनांचे प्रकाशन अजय मुक्कू यांच्या हस्ते झाले. या महोत्सवात पंडित उमेश चौधरींच्या मंत्रमुग्ध गायनाने गोशाळा परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाले.





Be First to Comment