Press "Enter" to skip to content

राज्यातील सर्वात मोठया दिवाळी अंक स्पर्धेचे रौप्यमहोत्सव 

राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाला ०१ लाख रुपये तर रायगड जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकास ४० हजार रुपये

पनवेल(प्रतिनिधी) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शैक्षणिक, सामाजिक, कला. क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने २५ व्या अर्थात रौप्यमहोत्सव राज्यस्तरीय आणि रायगड जिल्हास्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

 दिवाळी अंक ही महाराष्ट्राची पूर्वापार चालत आलेली एक सांस्कॄतिक परंपरा आहे. ही परंपरा अखंडपणे चालू राहावी व त्यातून दर्जेदार दिवाळी अंकांची निमिर्ती व्हावी, यासाठी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्यावतीने गेल्या २४ वर्षापासून महाराष्ट्रातील सर्वात मोठया दिवाळी अंक स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असून यंदा ही २५ वी स्पर्धा आहे.      

भरघोस रक्कमेची पारितोषिक असलेल्या या स्पर्धेच्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेमधील विजेत्या प्रथम क्रमाकांस ०१ लाख रुपये, व्दितीय क्रमाकांस ५० हजार तर तॄतीय क्रमाकांस ३० हजार रूपये तसेच आकर्षक सन्मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या स्पर्धेतील लक्षवेधी उत्कृष्ट अंकाला १५ हजार रुपये, सर्वोत्कृष्ट विशेषांकाला १५ हजार रुपये, उत्कॄष्ट कथेसाठी ०७ हजार रूपये, उत्कॄष्ट कविता, उत्कॄष्ट व्यंगचित्र, उत्कृष्ठ लेख, लक्षवेधी परिसंवाद, लक्षवेधी मुलाखत  व उत्कृष्ठ मुखपृष्ठ यांना प्रत्येकी ०५ हजार रुपये, त्याचबरोबर बालसाहित्याच्या सवोत्कॄष्ट अंकास ७५०० रूपये, सर्वोत्कृष्ट डिजिटल अंकाला ७५०० रुपये तसेच रायगड जिल्हयातून प्रकाशित होणाऱ्या दिवाळी अंकांसाठी खास पारितोषिके देण्यात येणार असून यामध्ये प्रथम क्रमांकास ४० हजार रूपये, व्दितीय क्रमांकास २० हजार रूपये आणि तॄतीय क्रमाकांस १० हजार रूपये, दोन उत्तेजनार्थ प्रत्येकी ०५ हजार रुपये, उत्कृष्ठ कथा, कविता आणि व्यंगचित्र यांना प्रयेकी ०५ हजार रुपये आणि सर्व पुरस्कारप्राप्त अंकांना सन्मानचिन्ह असे बक्षिसांचे स्वरूप आहे.    

  दरवर्षीप्रमाणे यंदाही या स्पर्धेत स्पर्धकांनी मोठया संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, संयोजक दीपक म्हात्रे यांनी केले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दिवाळी अंकाच्या दोन प्रती १०० रूपये प्रवेश फीसह १५ डिसेंबर २०२५ पर्यत पाठवाव्यात. दिवाळी अंक पाठविण्यासाठी व अधिक माहितीसाठी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, प्लॉट क्रमांक ४७५, मार्केट यार्ड, पनवेल, जि. रायगड. अनिल कोळी (९७६९४०९१६१) यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन आयोजकांनी केले आहे. 

राज्यातील सर्वात मोठी आणि प्रतिष्ठित म्हणून ओळखली जाणारी हि दिवाळी अंक स्पर्धा यंदा रौप्यमहोत्सवी वर्षात प्रवेश करत आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली गेली २५ वर्षे ही स्पर्धा सातत्याने आयोजित होत असून, राज्यभरातील विविध दिवाळी अंकांना प्रोत्साहन देत आहे. राज्यातील दिवाळी अंकांच्या समृद्ध परंपरेला आणि सर्जनशीलतेला बळ देण्याच्या हेतूने सुरू झालेली ही स्पर्धा आज संपादक, लेखक, कलाकार आणि वाचक यांच्यातील सृजनशीलतेचा दुवा आणि संवादाचे व्यासपीठ म्हणून ओळखली जाते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.