
रिसॉर्टमधील स्वच्छतागृहात छुप्या कॅमेराने महिलांचे रेकॉर्डींग करणाऱ्याला अटक
पनवेल दि.२८(वार्ताहर): पनवेल तालुक्यातील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. फार्महाऊसमध्ये आलेल्या महिला पर्यटकांच्या बाथरूममध्ये गुप्तरीत्या स्पाय कॅमेरा बसवून अश्लील चित्रीकरण केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्वरीत कारवाई करत अरोपी मॅनेजरला अटक केली आहे. ही कारवाई तळोजा पोलीस ठाणे यांच्याकडून करण्यात आली आहे. मात्र रिसॉर्ट चे नाव बाहेर येऊ नये याची खबरदारी देखील घेतली जात आहे.
तळोजा पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, पनवेलजवळील एका फार्महाऊसमध्ये महिला पर्यटक विश्रांतीसाठी आलेल्या होत्या. याच दरम्यान त्यांना बाथरूममध्ये लपवलेला कॅमेरा आढळला. महिलांनी त्वरित याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास केला असता बाथरूममधील आरशामागे सूक्ष्म आकाराचा स्पाय कॅमेरा बसवलेला आढळून आला. तपासात हा कॅमेरा फार्महाऊसचा मॅनेजरनेच बसविल्याचे समोर आले. पोलिसांनी मॅनेजरला ताब्यात घेऊन त्याच्याकडील मोबाईल व लॅपटॉप जप्त केले आहेत. त्यामध्ये अनेक महिला पर्यटकांचे चित्रीकरण केलेले व्हिडिओ सापडले असल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.





Be First to Comment