
शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करा- तालुकाप्रमुख समीर म्हात्रे
पेण, ता. २७ (वार्ताहर) : मागच्या दोन-चार दिवसांपासून परतीच्या पावसाने घातलेल्या धुमाकूळमध्ये पेण तालुक्यातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून याबाबत आज शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी वाशी खारेपाट भागातील शेतीची पाहणी करत सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
तालुक्यातील वाशी, वढाव, सरेभाग, भाल विठ्ठलवाडी यासह संपूर्ण तालुक्यात परतीच्या पावसामुळे हजारों हेक्टर भातशेती उध्वस्त झाली असून यामुळे शेतकरी पुर्णता हवालदिल होऊन चिंताग्रस्त झाला आहे त्यामुळे त्याला सावरण्याची जबाबदारी शासनाची असल्याने दररोज पडत असलेल्या पावसामुळे शासनाने नुसते नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे न करता पेण तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख समीर म्हात्रे यांनी केली आहे.
या पाहणी दरम्यान उपजिल्हा प्रमुख नरेश गावंड, माजी तालुकाप्रमुख आनंत पाटील, ग्रामपंचायत वाशी सदस्य सुनील पाटील, उपविभाग प्रमुख समीर पाटील, शाखाप्रमुख सदा म्हात्रे, शाखाप्रमुख काशिनाथ म्हात्रे, उपशाखाप्रमुख महेश पाटील, युवा सेना प्रमुख चेतन मोकल, विभाग प्रमुख नंदू मोकल, युवा सेना अक्षय थवई आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.



Be First to Comment