Press "Enter" to skip to content

पनवेल महानगर पालिका क्षेत्रात जाहिरातबाजीला आली “रोनक”

नवीन पनवेल उड्डाण पुलाजवळ उभारला भव्य डिजिटल जाहिरात फलक ; सामान्य नागरिकांच्या सुरक्षेला तिलांजली देत केवळ नफा कमविण्याचे षडयंत्र

 पनवेल महानगर पालिका प्रशासनाने हद्दीतील होर्डिंग्ज प्रसिद्धी बाबत धोरण निश्चिती केलेली असून याबाबत रोनक नामक जाहिरात ठेकेदारास कंत्राट देण्यात आले आहे.उदंड जाहिरात बाजी करत असताना अफाट नफा हाच हेतू डोळ्यापुढे ठेऊन कसेही कुठेही फलक उभारणी करण्याचे काम बिनबोभाट सुरू असल्याचे दुर्दैवी चित्र सध्या पालिका क्षेत्रात दिसून येत आहे.याहून दुर्दैवी परिस्थिती म्हणजे स्थानिकांची हरकत असली तरी पालिका अधिकाऱ्यांना हाताशी घेत या एजन्सी ने उदंड जाहिरातबाजी करताना सामान्य नागरिकांची सुरक्षा वाऱ्यावर सोडली आहे.
     नवीन पनवेल उड्डाण पुलावरून पनवेल शहर आणि बस स्थानक या दिशेने जाणाऱ्या रस्त्याच्या उजव्या कोपऱ्यावर भव्य डिजिटल जाहिरात फलक उभारण्याचा घाट पालिका प्रशासनाने आणि रोनक जाहिरातबाज यांनी घातला आहे.या रस्त्यावर उड्डाण पुलाचा तीव्र उतार असल्याने वाहने वेगात येत असतात.उजव्या बाजूला जाण्यासाठी सिग्नल यंत्रणा असली तरी डाव्या बाजूला मुक्त वळण घेता येते.याच वळणावर साधारण १० फूट बाय १५ फूट असा भव्य डिजिटल फलक बसविण्यात आला असून तो लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे.
     याठिकाणी भव्य जाहिरात फलक लावल्यास सर्विस रोड वरील डाव्या बाजूने येणारी वाहने, पुलावरून खाली उतरणाऱ्या वाहन चालकांना दिसणार नाहीत. त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. तसेच डिजिटल फलकासाठी वापरण्यात येणाऱ्या एलईडी लाइट्समुळे पडणाऱ्या तीव्र प्रकाशामुळे वाहनचालकांच्या डोळ्यांना त्रास झाल्याने देखील अपघाताची शक्यता बळावते. सदर डिजिटल फलकावर हाय रिझोल्युशन मध्ये चलचित्र असल्याने वाहन चालकांचे चित्त विचलित होऊ शकते त्यामुळे देखील अपघात होण्याची शक्यता आहे.

सामान्य नागरिकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव काही सजग स्थानिक नागरिकांनी या फलकला आक्षेप घेतला होता.त्यावेळी केवळ त्या फलकाचे काम काही वेळ थांबविण्याचे नाटक पालिकेच्या वतीने करण्यात आले. परंतु स्थानिकांचा विरोध असताना देखील बिनबोभाट पणे हा फलक उभारल्यामुळे नेमकी कोणाची शक्ती या पाठी काम करत आहे हे शोधणे गरजेचे झाले आहे.

पालिकेने नेमलेल्या रोनक या जाहिरात ठेकेदाराने यापूर्वी उभारलेल्या जाहिरात फलकांची दोन वेळा पडझड झालेली आहे. सुदैवाने यामध्ये जीवित हानी झाली नसली तरी देखील या जाहिरात बाजाने उभारलेले इन्फ्रास्ट्रक्चर विना नियोजन आणि केवळ नफा कमविणे या हेतूनेच उभारलेले असते. पनवेल बस स्थानकामधील अति भव्य होर्डिंग आणि वडाळे तलावावरील नंदनवन कॉम्प्लेक्स च्या आवारातील होर्डिंग यापूर्वी पडलेली आहेत. अशा परिस्थितीत एकाच जाहिरात ठेकेदाराची भलामाण महापालिका करत असल्याचे सिद्ध होते. स्थानिकांचा विरोध असून देखील जाहिरात ठेकेदाराने महापालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी घेत सदर फलक उभारला असल्याने सामान्य नागरिकांच्या सुरक्षेला तिलांजली देत केवळ नफा कमविण्याचे षडयंत्र असल्याचे जाणवते. या फलकामुळे जर का भविष्यात अपघात झाले व काही जीवित हानी झाल्यास त्यांची सर्वस्वी जबाबदारी जाहिरातबाद ठेकेदार आणि पालिका प्रशासनाची असेल असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.