कै. कृष्णाजीराव कदम हे धरणा कॅम्प (भवानीगर) करंजावडे गावचे सुपुत्र असून ते एक राष्ट्रीय कबड्डी खेळाडू होते त्यांचे वयाच्या ६७ व्या वर्षी दुःखद निधन झाले त्यांना गावातील बहुतांशी लोक ‘‘बाबाभाई ‘‘या नावाने आवडीने हाक मारत असत त्याने कबड्डी क्षेत्रामध्ये ८०-९० च्या दशकात त्यांनी आपल्या खेळाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून टाकले होते. ते एक अष्टपैलू कबड्डीपटू होते त्यांचा कबड्डी खेळामधील "जंप" मारणे हा एक प्रेक्षणीय प्रकार होता.
त्यांची कबड्डी मध्ये रायगड जिल्हा कबड्डी संघ मधे निवड झाली होती. तसेच अनेक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धे मध्ये त्यांना उत्कृष्ट खेळाडू म्हणून सन्मानित करण्यात आलं होतं. तसेच त्या काळात समाजात आणि रायगड जिल्ह्यामध्ये अग्रगण्य असणाऱ्या जय भवानी तरुण मंडळ कबड्डी संघाचे ते हुकमी अष्टपैलू खेळाडू होते.
दिनांक - २०/१०/२०२५ रोजी त्यांचे एमजीएम हॉस्पिटल वाशी या ठिकाणी दवा उपचार चालू असताना दुःखद निधन झाले. "बाबा भाई "यांच्या दुःखद निधनाची बातमी ऐकून धरणा कॅम्प( भवानीनगर )गाव, कबड्डी क्षेत्रामध्ये तसेच आजूबाजूच्या पंचक्रोशीमध्ये शोककळा पसरली.
"बाबा भाई" यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कबड्डी खेळाच्या प्रभावामुळे व उत्कृष्ट खेळामुळे आयडीबीआय सारख्या नामांकित राष्ट्रीय बँकेने त्यांना आयडीबीआय बँकेच्या कबड्डी संघातून खेळण्याची व बँकेमध्ये काम करण्यासाठी आमंत्रित केले. ते देखील आपला खेळ कसा सुधारेल यासाठी नेहमी प्रयत्नशील असायचे ,त्यांना चांगली संधी चालून आल्याने त्यांनी आयडीबीआय बँकेत १९८० साली रुजू झाले व आयडीबीआय बँकेच्या वतीने व्यावसायिक गटात कबड्डी खेळू लागले. व्यवसाय गटात कबड्डी खेळताना आयडीबीआय बँकेला त्यांनी अनेक कबड्डी फायनल एक हाती जिंकून दिल्या व आपल्या खेळाची चुणूक दाखविली. अनेक वर्ष बँकेमध्ये कबड्डी खेळाडू म्हणून खेळल्यानंतर ते आयडीबीआय बँकेच्या विविध शाखेत कामास कार्यरत होते. त्यांची शेवटची निवृत्ती वेळची पोस्टिंग ही कळंबोली शहरातील आयडीबीआय बँकेमध्ये होती. तेथे ते वयाच्या ६० व्या वर्षी यशस्वीपणे सेवा बजावून सेवानिवृत्त झाले.
राष्ट्रीय पातळीवर खेळाडू म्हणून स्थान मिळवणे म्हणजे सातत्यपूर्ण परिश्रमाचं आणि समर्पणाचे फळ आहे राष्ट्रीय पातळीवर खेळणारा खेळाडू हा तरुणांसाठी प्रेरणादायी आदर्श ठरतो त्याच्या यशातून इतर युवकांमध्ये प्रेरणा,प्रेम शिस्त आणि राष्ट्रीय अभिमानाची भावना निर्माण होते .म्हणून "बाबाभाई "हे गाव, शाळा आणि समाजासाठी अभिमानाचा विषय ठरले.
"बाबा भाई"यांच्या स्वभावाविषयी बोलायचे झाले तर स्वभावाने ते दिलखुलास, दिलदार व्यक्तिमत्व ,ते जे बोलायचे ते मनापासून बोलायचे .कारण त्यांना दिखावा किंवा ढोंग आवडत नव्हते .ते आयुष्य जगले मनापासून त्यांचा स्वभाव म्हणजे सरळ ,पारदर्शक आणि दिलदार होता.त्यांचं आयुष्य स्मरणात ठेवून त्यांच्यासारखे मोकळेपणाने ,प्रेमाने आणि प्रामाणिकपणे जगायचं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
त्यांच्या दुःखद निधनामुळे कोयना क्षत्रिय मराठा समाज ,अखिल कोयना पुनर्वसात सेवा संघ ‘ग्राम विकास मंडळ भवानीनगर, जय भवानी तरुण मंडळ, जय भवानी नवतरुण मंडळ अशा सर्व संस्थांनी दुःख व्यक्त केले आहे. स्वर्गीय कृष्णाजीराव वामनराव कदम यांना भावपूर्ण श्रद्धांजली, ईश्वर त्यांना सद्गती देवो ही प्रार्थना.त्यांचे उत्तर कार्य राहत्या घरी धरणा कॅम्प(भवानीनगर) येथे शुक्रवार दिनांक ३१/१०/२०२५ रोजी होणार आहे.
Be First to Comment