Press "Enter" to skip to content

१९ ऑक्टोबर – मनुष्य गौरव दिन

१९ ऑक्टोबर हा पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले यांचा जन्मदिवस संपूर्ण जगभर मनुष्यगौरवदिन म्हणून साजरा होत असतो त्यानिमित्ताने हा लेख

भौतिक सुखांची रेलचेल असतानाही सतत दुःखी आणि अस्वस्थ असलेली माणसे आपण समाजात पहात असतो. खरेतर नव्वदच्या दशकात झालेल्या उदारीकरण आणि जागतिकीकरणानंतर सामान्य माणसाच्याही खिशात पैसा खेळू लागला आहे. एकेकाळच्या दारिद्र्याने पीडित असलेल्या माणसांच्या जीवनात आर्थिक समृद्धी आल्यानंतर खरे तर माणूस सुखी व्हायला हवा होता पण प्रत्यक्षात तसे घडलेले दिसते का? बाह्यवस्तूंच्या उपलब्धतेमुळे जीवन जगणे सुसह्य होते हे खरे असले तरी आज माणूस मनाने खचलेला आहे. अस्वस्थ आहे. निराश बनला आहे, तो कदाचित काहीसा सुखी असेल पण आनंदी नाहीये. कारण, आनंद ही आंतरिक गोष्ट आहे! आंतरिक वैभवाची जाणीव झाल्याशिवाय आणि ही जाणीव पुष्ट झाल्याशिवाय माणूस आनंदी होणे असंभव आहे!

माणसाची नेमकी हीच आंतरिक कमतरता परम पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले (दादा) यांनी ओळखली आणि ही कमतरता दूर करून माणसाला पुन्हा उभे करण्यासाठी आणि त्याच्यात आत्मविश्वास आणि आत्मसन्मान निर्माण करण्याचा त्यांनी निर्धार केला. आपले संपूर्ण आयुष्य पूजनीय दादांनी त्यासाठी समर्पित केले!

पूजनीय दादांच्या लक्षात आले की भौतिक वैभवाच्या डोळे दिपवणाऱ्या प्रकाशात माणूस आपले सत्त्व आणि स्वत्व विसरला आहे. गीतेने दिलेली आत्मप्रचितीची शिकवण माणूस विसरला आहे. काय आहे ही शिकवण? ‘ सर्वस्य चाहं ह्रदि सन्निविष्टः’ हाच तो गीतेचा श्लोक की ज्याद्वारे भगवंत मानवामानवाला ‘मी तुझ्या ह्रदयात निवास करीत आहे आणि माझा लाडका पुत्र म्हणून तुझे संपूर्ण जीवन मी चालवीत आहे’ असे समजावतात!

विश्व निर्माण करणारी, चंद्र सूर्यासारखे अब्जावधी ग्रहतारे निर्माण करून संपूर्ण विश्व चालवणारी भगवत्शक्ति माझ्या शरीरात येऊन राहिली आहे आणि ती माझे जीवन चालवते आहे याची जाणीव माणसात उभी करून दृढ करता आली तर माणूस स्वतःला हीन, दीन, दुबळा, परिस्थितीचा दास आणि हताश समजणे बंद करील. इतकेच नव्हे तर हृदयस्थ भगवंताच्या जाणीवेने तो स्वतःला भाग्यवान समजून सतत आनंदी राहील हे पूजनीय दादांनी ताडले. वास्तविक ह्रदयस्थ भगवंताची जाणीव भारतीयांना नवीन नाही परंतु काळाच्या ओघात माणसातली ही जाणीव लुप्त झाली आणि आज हाच माणूस केवळ भौतिक वैभवातच गुरफटून गेला आहे!

देव फक्त मंदिरात आणि तीर्थक्षेत्रातच आहे असे मानणाऱ्या माणसाला त्याच्या देहात असलेल्या भगवंताची जाणीव करून देणे ही काय सोपी गोष्ट होती का? नक्कीच नाही! माणसाला बदलण्यासारखे दुष्कर काम अन्य कोणतेही नाही हे दादांना माहीत होते पण तरीही भगवंतावरच्या आणि भगवंत ज्याच्या शरीरात येऊन राहिला आहे अशा माणसावरच्या प्रेमातून दादांनी अशक्यप्राय असणाऱ्या या युगपरिवर्तनाच्या कार्याचे शिवधनुष्य पेलण्याचा कार्याला सुरुवात केली!

यासाठी पूजनीय दादा स्वतः अक्षरशः हजारो गावांमध्ये स्वतः गेले. वर्षानुवर्षे वारंवार जात राहिले! कोणत्याही मोबदल्याची, अगदी आभाराचीही अपेक्षा न करता गावांतल्या माणसांना आत्यंतिक प्रेमातून भेटत राहिले. ‘सर्वस्यचाहं ह्रदिसन्निविष्टः… ‘ श्लोकाचा अर्थ सांगताना , विश्वनिर्माता भगवंत प्रत्येकाच्या ह्रदयात राहतो आणि आपले जीवन चालवतो असे सांगत आपल्या शरीराची सुंदर आणि अद्भुत रचना आणि कार्य समजावले.

पद,पदवी आणि पैसा यांपैकी काही असेल तरच माणसाला प्रतिष्ठा आहे. यापैकी काहीही ज्याच्याकडे नाही असा माणूस उपेक्षित जीवन जगताना पाहून दादांना अतीव दुःख झाले. अशा उपेक्षित माणसाला दादांनी समजावले की दुधात वेगवेगळे मसाले, सुकामेवा घातल्यावर दुधाची चव आणि किंमत वाढते हे खरे असले तरी यांपैकी काहीही घातले नाही तरी दुधाला स्वतःचा असा स्वाद असतो. याचप्रमाणे, पद, पदवी, पैसा या आभूषणांच्या सजावटीमुळे माणसाची प्रतिष्ठा वाढत असली तरीही यांपैकी काहीही नसले तरी ‘मी माणूस आहे आणि माझ्या हृदयात ईश्वर वास करतो’ ह्या वास्तवाचाच एक विशेष स्वाद आहे! मी माणूस आहे हीच गोष्ट माझ्यासाठी आत्यंतिक गौरवाची आहे या भावनेतून माणसाचा आत्मगौरव उभा रहायला लागला.

एकीकडे कोट्यवधींची संपत्ती असलेली पण तरीही दुःखी, अस्वस्थ माणसे असलेल्या समाजाचे चित्र तर दुसरीकडे स्वाध्यायी विचारांतून, प्राप्त परिस्थितीतही अत्यंत आनंदी आणि समाधानी जीवन जगणारा समाज असा सहज नजरेत येणारा फरक जग अनुभवू लागले. परिस्थिती कठीण असली तरीही मोफत कोणाकडूनही घेणार नाही अशा खुमारीतून तेजस्वितेने जगणारी कुटुंबे निर्माण होणे हे आजच्या काळातले महान आश्चर्य पूजनीय दादांच्या कार्यातून वास्तवात आलेले पहायला मिळत आहे.

१९ ऑक्टोबर हा पूजनीय दादांचा जन्मदिवस संपूर्ण जगभर मनुष्यगौरवदिन म्हणून साजरा होत असतो. या मनुष्य गौरव दिन पर्वानिमित्त परम पूजनीय दादांना त्रिवार वंदन !!

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.