
खोपोलीच्या डॉ. रामहरी धोटे शिशुमंदिर शाळेचा क्रीडाक्षेत्रात डंका !
खोपोली : प्रतिनिधी
शासन मान्य महाराष्ट्र राज्य जिल्हास्तरीय सुब्रोतो फुटबॉल कप स्पर्धा, व्हॉलीबॉल, कुस्ती, बुद्धिबळ आणि कॅरम या विविध क्रीडा प्रकारांमध्ये डॉ. रामहरी धोटे शिशुमंदिर, खोपोलीच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत एकाच वेळी अनेक विजेतेपदे पटकावली आहेत.
सुब्रोतो कप फुटबॉल स्पर्धेत 17 वर्षाखालील मुलींचा संघ आणि 15 वर्षाखालील मुलांचा संघ विजयी झाला. जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत 17 वर्षाखालील मुलींनी प्रथम तर 14 वर्षाखालील मुलींनी द्वितीय पारितोषिक प्राप्त केले. मुंबई विभागीय कुस्ती स्पर्धेत 14 वर्षाखालील गटात वेद दिनेश मरागजे यांन रौप्यपदक प्राप्त केले. जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत 14 आणि 17 वर्षाखालील मुले तृतीय पारितोषिक विजेते ठरली.
बुद्धिबळ स्पर्धेत विनंती वाघ, आर्था देशमुख, तीर्था देशमुख, शर्वरी देशमुख, अविष्कार शेजवळ, अलिशा शेख, मनस्वी देशमुख आणि श्रेया मिंडे यांनी उत्तुंग कामगिरी करत आपल्या बुद्धिमत्तेची छाप उमटवली. कॅरम स्पर्धेत हर्षदा ओमले, आर्था देशमुख, तीर्था देशमुख, श्रेया पाटील, स्नेहा ढोकले, धनश्री जाधव, स्वरा कोळंबे, श्लोक देशमुख, श्रवण जाधव, अथर्व पांडव आणि आदित्य गुरव यांनी विजेतेपद पटकावत शाळेचा झेंडा उंचावला.
या सर्व उल्लेखनीय यशाबद्दल खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम, सचिव किशोर पाटील आणि विजय चुरी यांनी सर्व विजयी खेळाडूंचे तसेच क्रीडा मार्गदर्शक अमित विचारे रोहन मोरे आणि स्वप्नाली देशमुख यांचे विशेष अभिनंदन केले. त्यांनी पुढील वाटचालीसाठी सर्व खेळाडूंना शुभेच्छा देत सांगितले की, “ही यशशृंखला आमच्या संस्थेच्या क्रीडाप्रेमी संस्कारांची फलश्रुती आहे.
डॉ. रामहरी धोटे शिशुमंदिरने राज्य, विभागीय आणि जिल्हास्तरीय स्तरांवर मिळवलेले हे एकत्रित यश खोपोली शहरासाठी आणि खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की “शिस्त, मेहनत आणि मार्गदर्शन यांचा संगम यश निर्माण करतो.”



Be First to Comment