कोरोना, देशप्रेम आणि आपण
कोरोना, लॉकडाऊन, सॅनिटायझर, मास्क, फिजिकल डीस्टन्सिंग या शब्दांचा कंटाळा न आलेला माणूस आजच्या घडीला शोधूनही सापडणार नाही. पण काय करणार,सध्यातरी आपण या साऱ्यांशिवाय जगू शकणार नाही. याचा कितीही कंटाळा आला तरी!
झालंय काय, सुरुवातीला जवळपास सगळेच जण नवीन नियम व्यवस्थितपणे पाळताना दिसत होते.पण नियम पाळताना जराशी कुठेतरी चूक झाली की कोरोना टपून बसल्यासारखा त्यांना गाठत होता. याउलट काही सुदैवी लोकांजवळ (त्यांनी काटेकोरपणे नियम न पाळूनही) कोरोना अजिबात फिरकत नव्हता त्यामुळे जनसामान्यांची अशी धारणा झाली की आता बास झालंय काही मास्क वगैरे लावायचा नाही, पूर्वीसारखे बिनधास्त राहायचे एकत्र यायचे, सण समारंभ साजरे करायचे.. काहीही होत नाही.
गेल्या आठवड्यात एक व्हॉट्स ॲप मेसेज वाचला होता.
“सध्या दोन प्रकारची माणसे दिसतायत अति काळजी घेणारी किंवा अजिबात काळजी न घेणारी आणि दोन्ही प्रकारची माणसे एकमेकांना मूर्ख समजतात.”
आपण थोडा वस्तुनिष्ठ विचार करूया..
सुरुवातीला जेव्हा तुरळक कोरोना रुग्ण आढळले होते तेव्हा आपण घरातून बाहेर जायला घाबरत होतो. घराबाहेर पडलोच तर मास्क, सॅनिटायझर, फिजिकल डीस्टन्सिंग या त्रिसूत्रीचे काटेकोरपणे पालन करत होतो. आतातर रोज शेकडोंनी केसेस मिळत आहेत मग आपण जास्त काटेकोरपणे नियमांचे पालन करायला हवे. हो ना?
खूप जास्त दिवस लॉकडाऊन केले तर जनसामान्यांची गैरसोय होते आहेच आणि रोजगाराविना त्यांची उपासमार व्हायची वेळ येतेय हे जाणवल्याने सरकारने हळूहळू जनजीवन सुरळीत होण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. याचा अर्थ कोरोना हद्दपार झाला असा होत नाही. हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवे.
आपल्या सगळ्यांना जसे सणसमारंभ साजरे करायची इच्छा आहे तसेच वैद्यकीय व्यवसायात गेले पाच महिने निरलसपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील सणवार साजरे करायचे असतील. किमान आपल्या घरच्या माणसांना भेटावे असे तरी वाटत असेल ना? काहीजण, ज्यांना पारंपरिक सणांसाठी कोणत्याही परिस्थितीत घरी जाणे गरजेचे असेल किंवा काही जण रुग्णसेवा करताना कोरोनाची बाधा झाल्यामुळे रजेवर असतील. म्हणजेच जे काही कर्मचारी सणवार असूनही कामावर जात असतील त्यांच्यावर अतिरिक्त ताण असेलच. याचवेळी जर केवळ जनसामान्यांनी नीट काळजी न घेतल्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली तर रुग्णालयांमध्ये किती गंभीर परिस्थिती निर्माण होईल? याचा विचार केलाय का?
सध्या आपल्या आजूबाजूला पाहिले तर शंभरातील पन्नास जणांनी सुद्धा मास्क लावलेला नसतो. ज्यांनी मास्क लावलेला असतो त्यांचा एकतर नाकाखाली घसरलेला असतो किंवा ते वारंवार आपल्या मास्कला हात लावून तो नीट करायचा प्रयत्न करताना दिसतात. दुकानदारांनी वारंवार विनवणी करूनसुद्धा अनेकजण दुकानांमध्ये गर्दी करून फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवताना दिसतात. आपल्याकडील लोकसंख्या आणि शासकीय कर्मचारी यांचे व्यस्त प्रमाण लक्षात घेता नवीन नियमांचे काटेकोरपणे पालन होते आहे की नाही याकडे लक्ष देणे व नियम न पाळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणे शक्य होत नाही. मुळात अशी कारवाई करून कोरोनाची लागण नियंत्रित होणारच नाही कारण नियम न पाळण्यामुळे जे नुकसान व्हायचे होते ते आधीच झालेले असेल.
आपल्या बऱ्यावाईट भविष्याचे शिल्पकार आपणच आहोत हे लक्षात असू द्या. आपल्या लापरवाहीमुळे आपल्याबरोबरच आपण इतरांचा जीवही धोक्यात घालत आहोत हे लक्षात असू द्या. आपल्यासाठीच नाही तर आपल्या प्रियजनांसाठी तरी नियमांचे पालन करा.
आज आपला स्वातंत्र्यदिन आहे. आपला मोबाईल देशप्रेमाच्या संदेशांनी भरून जाईल. आपण स्वातंत्र्यसैनिकांनी केलेले बलिदान आठवून गहिवरून जाऊ. आपले देशप्रेम उफाळून येईल. विचार करा एक दोन नाही तर अठराशे सत्तावन्न पासून एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत तब्बल उणीपुरी नव्वद वर्षे स्वातंत्र्य लढा सुरू होता. भारताला स्वातंत्र्य मिळवण्यात केवळ मोठमोठ्या नेत्यांचाच वाटा नव्हता तर तळागाळातील प्रत्येक व्यक्ती देशप्रेमाने भारून आपापल्यापरीने देशाला स्वातंत्र्य मिळविण्यास कारणीभूत ठरली आहे.
आता केवळ गहिवरून जाण्याची आणि नारेबाजी करण्याची नव्हे तर वेळ आली आहे ते स्वातंत्र्य सैनिकांसारखी अविरत कृती करून देशप्रेम आणि अखंड मानवजातीवर असलेले प्रेम दाखविण्याची! आपल्याला कोव्हिड विरुद्धच्या लढाईत जिंकायचे असेल तर प्रत्येकाने कोव्हिड योद्धा होण्याची गरज निर्माण झाली आहे.
मास्क (व्यवस्थितपणे नाक व तोंड झाकले जाईल अशा पद्धतीने लावलेला), सॅनिटाईझिंग (हातांची स्वच्छता साबण व पाण्याने वारंवार हात धुणे आणि हे शक्य नसेल तेव्हा अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर वापरणे)
फिजिकल डिस्टन्सिंग(सार्वजनिक ठिकाणी एकमेकांपासून दोन हात दूर रहाणे) या महत्त्वाच्या शस्त्रांचा सातत्याने वापर करून आपण कोरोनाला हरवूया. आपले देशप्रेम नियमांचे काटेकोर पालन करून व्यक्त करूया.
जय हिंद! जय महाराष्ट्र!
डॉ. समिधा गांधी, पनवेल
Be First to Comment