लाडक्या बहिणी कापत आहेत बेवड्या भावांचा खिसा : कसा ? वाचा हे विडंबन
पर्वा स्टेशन रोड वरच्या भंगार बाजारामध्ये दिग्या अचानक दिसला. विश्वाची काळजी वाहणाऱ्या या अजातशत्रूच्या चेहऱ्यावर नेहमीप्रमाणे चिंता क्लेश आणि दारिद्र्य ओथंबून वाहताना दिसत होते. ऑफिसला पोहोचायची घाई होती त्यामुळे त्याला थांबवून इथे काय करतोस? असे विचारायचं धारिष्ट झाले नाही. ट्रेन पकडून बेलापूरला माझ्या ऑफिस मधल्या संपादक खुर्चीला पाठ टेकवेपर्यंत दिग्या काही केल्या डोक्यातून जाईना. भंगार बाजारात दिग्या काय बरं करत असेल? या विचारांनी काहूर माजवले. इनबॉक्स उघडला आणि समोर बातम्यांचा रतीब सुरू झाला, नेहमीच्या कामात गुरफटून गेलो आणि दिग्याचा विसर पडला.
दुसऱ्या दिवशी आमच्या एका सामायिक मित्राकडून दिग्याचा नंबर मिळवला. तातडीने त्याचा नंबर टाइप केला आणि काल भंगार बाजारात काय करत होतास? हे विचारण्यासाठी अगदी उत्सुकतेने फोन लावला. नेहमीप्रमाणे उत्साही असणाऱ्या दिग्याने माझा फोन कसा काय आला? म्हणून उगाच नाटकी संवादफेक केली. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यानंतर मी मूळ मुद्द्याला हात घातला. पलीकडे काही क्षण शांतता अनुभवली, नंतर दिग्याचे घसा खाकरणे ऐकू आले... अरे ! विषय थोडा गंभीर आहे.. भेटून बोलूयात का? त्याला आज संध्याकाळी ऑफिसला ये ..असे म्हणून फोन ठेवला.
संध्याकाळी बातम्यांचे सॉर्टिंग झाल्यानंतर दिग्या आला असल्याची वर्दी पिऊन ने दिली. दिग्या योग्यवेळी आला म्हणून मी ही मनोमन सुखावलो. माझ्या केबिनमध्ये दिग्या माझ्यासमोर बसल्यावरती मी थेट विषयाला हात घातला. म्हटले परवा भंगार बाजारात काय शोधत होतास रे? दिग्या म्हणाला सहा मीटर लांब तांब्याचा पाईप, जुना कुकर, ड्रम असे सगळे साहित्य स्वस्तात मिळते का हे पाहत होतो. म्हटले का रे बाबा कुठला नवीन धंदा सुरू करतोयस की काय? दिग्या म्हणाला होय.... दारू गाळण्याचा!
पापभिरू स्वभावाचा दिग्या दारू गाळण्याचा व्यवसाय करू पाहतोय म्हटल्यावरती माझ्या पायाखालची जमीन सरकली. म्हटले अरे काय रे बाबा... हे कसले भिकेचे डोहाळे? अरे मंदार ..१९० ची आरसी क्वार्टर २६० ला झाली. महापालिकेत खर्डीघाशी करणाऱ्या माझ्यासारख्या कारकून माणसाला रोजचे ७० रुपयांचा अधिभार कसा काय परवडणार? अरे मित्रा तब्बल २१०० रुपयांचा महिन्याचा अधिकचा खर्च कसा काय करावा? दिग्याचे लॉजिक कितीही वास्तविक असले तरीदखील मी माझे सकारात्मक बोलणे सुरूच ठेवले. म्हटले अरे मित्रा ह्या दारू दरवाढीकडे जरा सकारात्मक दृष्टीने पहा. रोज दारू पिणे वाईट, कदाचित त्यामुळेच सरकारने दर वाढवले असतील. अर्थशास्त्राचा नियम सांगतो की एक तर खर्च कमी करा, किंवा तुमची मिळकत वाढवा. मी असे काही साळसूद सल्ले देईन हे दिग्याला अपेक्षित असावे. एक कुत्सित पणाने उसासा सोडत तो म्हणाला की, संपादक महोदय.. तुम्हाला जशा शानदार पार्ट्यांची आमंत्रण येतात तसे आम्हाला कोणीही दारू पाजत नाही. आपली क्वार्टर आपणच कमवायची आणि आपणाच प्यायची... या साध्या सरळ तत्त्वावरती जगणारी आम्ही माणसे आहोत. तुम्ही तुमच्या विश्वात, आम्ही आमच्या विश्वात सुखी राहुयात आणखीन काय...
दिग्या थोडा नॉस्टॅल्झाजिक झालेला पाहून मी पुन्हा मूळ मुद्द्यावर आलो. म्हटले ते सगळे सोड तू दारू का गाळणार आहेस? नाही आता सहन होत नाही.. त्यामुळे आता मी दारू गाळणार, माझी क्वार्टर मी रोज पिणार.. लोकांना प्यायला देणार आणि त्यातनं पैसे कमावणार... मी म्हटले अरे दिग्या हा गुन्हा आहे... पैसे घेऊन बातम्या लावणे हा गुन्हा नाही काय? तरी तुम्ही हे धंदे करताच ना? दिग्याच्या या उलटवाराने मी निशब्द झालो. विषय बदलण्यासाठी मी म्हटले, दिघ्या तुला काय वाटते काय म्हणून ही दरवाढ झाली असावी? काही नाही रे! निवडणूक जिंकण्यासाठी लाडक्या बहिणींना पैसे दिले... आता सरकारचा खजिना रिकामा झाला आहे. पैसे आणायचे कुठून? अशावेळी एक सॉफ्ट टारगेट असते. ते म्हणजे दारू,सिगरेट ,तंबाखू, गुटखा अशी इंडस्ट्री. सरकारने नेमकी व्यसने करणाऱ्यांच्या दुखत्या नशीवर बोट ठेवले आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना जे पैसे दिले ते त्या बहिणींचे दारू पिणारे नवरे यांच्या खिशातून वसूल करावे हा इतका साधा सरळ "मारवाडी मुनीम" हिशोब आहे.
एका क्षणामध्ये दिग्याने त्याचे अर्थशास्त्र मला उलगडून दाखवले. हसावे की रडावे हे समजेना... दिग्या म्हणाला चल मित्रा निघतो... मी ही म्हटले सावकाश जा... आता त्या मुर्खाला मी काय सांगू.. मी आधी स्वतःची गाडी घेऊन ऑफिसला यायचो... त्याची क्वार्टर ७० ने वाढली माझी १७० ने वाढली आहे... म्हणून तर खर्चाचा ताळमेळ बसावा यासाठी मी गाडी घरीच ठेवतो आणि ट्रेन ने ऑफिसला ये जा करतो! असो... लाडक्या बहिणींनो समजून घ्या ... अधिक उणे न सांगणे...
Be First to Comment