प्रतिनिधी/ तळोजे
तळोजा येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलींना नगरसेविका प्रीती म्हात्रे जॉर्ज आणि सायकॉलॉजिस्ट अनिशा कोल्हापुरे यांनी मुलींच्या विविध समस्यांवर समुपदेशन केले. फारशा न बोलल्या जाणाऱ्या विषयावर या दोन्ही तज्ञांनी पहिली ते आठवीपर्यंतच्या मुलींना अत्यंत सुंदर आणि सोप्या भाषेत त्यांच्या समस्यांवर कशी मात करावी याचे मार्गदर्शन केले. तसेच शिक्षण आणि करियर या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर मुलींशी संवाद साधला. नुकत्याच पार पडलेल्या या कार्यक्रमाला नगरसेविका प्रीती जॉर्ज म्हात्रे,सायकॉलॉजिस्ट अनिशा कोल्हापुरे, केंद्रप्रमुख सरिता ठाकूर, मुख्याध्यापक गणेश म्हात्रे,योगिनी वैदू, प्रवीण रेवाळे, राम केकान, विभावरी सिंहासने यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमाबाबत माध्यमांशी संवाद साधताना नगरसेविका प्रीती जॉर्ज म्हात्रे म्हणाल्या की,मुलींना समुपदेशन करण्याचे माझं कार्य हे कित्येक दिवसापासून सुरू आहे.या कार्यात सायकॉलॉजिस्ट अनिशा कोल्हापुरे यांची मोलाची साथ मला मिळत असते.
माझा पुढाकार आणि तिचा अभ्यास या जोरावर सहा ते सात हजार मुलींना आम्ही आजपर्यंत समुपदेशन केले आहे.समुपदेशन (counseling) ही एक महत्त्वाची गरज आहे. मुलींसाठी समुपदेशन म्हणजे त्यांना त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या समस्या, भावना आणि परिस्थितींचा सामना करण्यासाठी मार्गदर्शन करणे. यात मुख्यत्वे शिक्षण, करिअर, नातेसंबंध, आरोग्य (शारीरिक व मानसिक), आणि सामाजिक दबाव यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन केले जाते.तसेच मासिक पाळी आणि लैंगिक आजार याबाबत देखील आम्ही मुलींसोबत संवाद साधतो. हे विषय फारसे बोलले जात नाहीत यासोबतच गुड टच आणि बॅड टच याच्या माध्यमातून आम्ही त्यांना सजग करतो.योगिनी वैदू यांनी पुढाकार घेऊन या कार्यक्रमासाठी आम्हाला आमंत्रित केले. या समुपदेशनासाठी योगिनी वैदू यांची तळमळ निश्चितच कौतुकास्पद आहे.
नगरसेविका प्रीती म्हात्रे जॉर्ज पुढे म्हणाल्या की, तळोजे येथील शाळेतील मुली सुरुवातीला या विषयावरती खुलून बोलण्यास लाजत होत्या. तरीसुद्धा आम्ही मुलींच्या कलेने घेत त्यांच्याशी संवाद सुरूच ठेवला. कालांतराने मुलींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत खूप सुंदर प्रतिसाद दिला. मला विश्वास आहे की आमच्या समुपदेशनामुळे अगदी शंभर टक्के नसला तरी काही टक्के नक्कीच फरक पडेल. समुपदेशन कार्यक्रमानंतर मुलींच्या चेहऱ्यावरती आत्मविश्वासाची झलक दिसत होती. आणि मला असे वाटते की तीच आमच्या कार्याची पोचपावती आहे.
रायगड जिल्हा परिषदेची तळोजे येथील शाळा ही नेहमीच अभिनव उपक्रम साजरे करण्यासाठी सुप्रसिद्ध आहे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात पनवेल तालुक्यातून या शाळेने पहिला क्रमांक पटकावला आहे. तर परसबागेमध्ये पनवेल तालुक्यातून दुसऱ्या क्रमांकाची ही शाळा मानकरी ठरली आहे.






Be First to Comment