Press "Enter" to skip to content

लेख : दीप अमावास्या – अग्नीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण !

जाणून घ्या दीप अमावास्येचे आध्यात्मिक महत्त्व आणि दीपपूजनामागील शास्त्र

२४ जुलै : आषाढ अमावास्या (दीप अमावास्या)

दीप अमावास्या – अग्नीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण !
अग्नीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढ अमावास्येला म्हणजे ‘दीपान्वित अमावास्ये’ला दीपपूजन केले जाते. मात्र हल्लीच्या वर्षांत या अमावास्येला ‘गटारी अमावास्या’ असे म्हणण्याची कुप्रथा वाढ़ीस लागली आहे. यातून हिंदु धर्माची अपकीर्ती होत आहे. मुळात ‘गटारी’ असा काही सण आपल्या धर्मात नाही. हिंदु धर्माची अपकीर्ती करणाऱ्यांकडून या अमावास्येच्या दिवशी दारू आणि मांसाहार यांचे सेवन केले जाते. या कुप्रथेचे उदात्तीकरण न करता या दीप अमावास्येला शास्त्रानुसार दीपपूजन करूया. या लेखात दीप अमावास्येचे आध्यात्मिक महत्त्व आणि दीपपूजनामागील शास्त्र समजून घेऊया.

दीपपूजन करण्यामागील शास्त्र – ‘दिव्याची ज्योत ही अग्नितत्त्वाचे प्रतीक आहे. अग्नीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढ अमावास्येला ‘दीपपूजन’ केले जाते.

दीपान्वित अमावास्या – आषाढ अमावास्येला ‘दीपान्वित अमावास्या’ असेही म्हणतात. या दिवशी दिव्यांचे पूजन केले जाते. सुवासिनी स्त्रिया घरातील दिवे स्वच्छ आणि एकत्रित करून त्यांच्याभोवती रांगोळी काढतात. ते दिवे प्रज्वलित करून त्यांची पूजा करतात. पूजेत पक्वान्नांचा नैवेद्य दाखवतात आणि पुढील मंत्राने दिव्याची प्रार्थना करतात.

दीप सूर्याग्निरूपस्त्वं तेजसां तेज उत्तमम् ।
गृहाण मत्कृतां पूजां सर्वकामप्रदो भव ॥

अर्थ : हे दीपा, तू सूर्यरूप आणि अग्नीरूप आहेस. तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर.

यानंतर दिव्याची कहाणी ऐकतात. हे पूजन केल्याने ‘आयुरारोग्य आणि लक्ष्मी यांची प्राप्ती होते’, अशी फलश्रुती आहे.’ (संदर्भ : भक्तिकोश, चतुर्थ खंड, पृ. 877)

दीप अमावास्या शास्त्रानुसार साजरी करून आपली संस्कृती जपूया ! – या सणाला घरातले सर्व दिवे धुवून त्यांची पूजा केली जाते, दिवे आपल्या जीवनातील अंधार दूर करून आपल्याला प्रकाश देतात, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण ! त्यामुळे या सणाला दीप अमावास्याच म्हणावे, अगदी चेष्टेने सुद्धा गटारी म्हणू नका. कोणीही या दिवशी दारू प्यायला सांगत नाही, उलट दिव्यांची पूजा करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायला सांगतात. आजही या दिवशी महाराष्ट्रातील लाखो मराठी घरात असेच मनोभावे दीपपूजन करून अत्यंत वैशिट्यपूर्ण नैवेद्य दाखवतात. खूप आनंददायी आणि मंगल अशी ही दीप अमावास्या आपण सर्वांनी शास्त्रानुसार साजरी करूया आणि आपली संस्कृती जपूया.

आवाहन ! – आषाढ अमावास्येच्या दुसर्‍या दिवसापासून श्रावण मास चालू होत असल्याने आणि हा पवित्र मास मानला जात असल्याने असंख्य जण त्या काळात मांसाहार वर्ज्य करतात. काही जणांना पुढे महिनाभर, तर काही जणांना चातुर्मास संपेपर्यंत मांसाहार करायला मिळणार नसल्यामुळे या अमावास्येच्या दिवशी दारू आणि मांसाहार यांचे सेवन केले जाते. या कुप्रथेचे मोठ्या प्रमाणात उदात्तीकरण करण्यात येते. हिंदूंनो ! वेळीच सावध व्हा, उद्या हे धर्मद्रोही म्हणतील, ‘धर्मच आम्हाला गटारी साजरी करायला लावतो. धर्म सांगतो की, या दिवशी भरपूर दारू प्यावी.’ मुळातच ‘गटारी’ असा काही सण आपल्या धर्मात नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. हिंदूंनी या सणाविषयी लोकांमध्ये जागृती करून या सणाला जे विकृत वळण लागले आहे, ते थांबवण्यासाठी प्रयत्न करावेत. या माध्यमातून आपल्या सण आणि संस्कृती यांचा मान राखण्यासाठी हिंदूंनी संघटित होऊया.

सौजन्य : सनातन संस्था
संपर्क क्र. : 9819242733

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.