

शेकडो विद्यार्थ्यांच्या साक्षीने उरण न्यायालय आणि वकिलांचा जनजागृतीसाठी पुढाकार
उरण(घन:श्याम कडू)
“कायदा प्रत्येकासाठी आहे, पण त्याची जाणीव प्रत्येकाला असली पाहिजे,” हा संदेश घेऊन उरण तालुक्यातील शिक्षण प्रसारक कै. गोपाळ नारायण अक्षीकर विद्या संकुल (NI हायस्कूल), उरण येथे दि. २२ जुलै रोजी सकाळी १० वाजता एक प्रभावी कायदेविषयक जनजागृती शिबिर संपन्न झाले.
या शिबिराचे आयोजन दिवाणी न्यायालय क.स्तर, उरण व तालुका विधी सेवा समिती, उरण यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. कार्यक्रमाला मा. एम. एस. काझी (दिवाणी न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष), मा. एस. पी. वानखडे, मा. जी. के. आर. टंडन हे सह-दिवाणी न्यायाधीश, तसेच वकिल संघटनेचे अध्यक्ष अॅड. व्ही. एल. पाटील व नामवंत वकील मंडळी, न्यायालयीन कर्मचारी, गट विकास अधिकारी श्री. सर्जेराव पाटील, आणि शाळेतील शेकडो विद्यार्थी मोठ्या उत्साहात सहभागी झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. अमर पाटील यांनी केले. अॅड. संघश्री गायकवाड यांनी जागतिक आंतरराष्ट्रीय न्याय दिन याविषयी भाष्य करत न्यायसत्ता, सत्यता आणि कायदेशीर मूल्यांचा आदर यावर भर दिला. “सजग नागरिक हा न्यायाचा पहिला आधारस्तंभ आहे,” असं ठाम मत त्यांनी व्यक्त केलं.
त्यानंतर अॅड. धिरज डाकी यांनी जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त समाजात वाढत्या लोकसंख्येचे परिणाम, संसाधनांवरील ताण, बेरोजगारी व शैक्षणिक संधी यावरील प्रभाव यावर मार्गदर्शन करत उपस्थितांना संतुलित लोकसंख्येच्या गरजेबाबत सजग केलं.
या शिबिरात प्रमुख वक्ते म्हणून मा. एम. एस. काझी यांनी एक दांडगा आणि प्रभावी संदेश दिला. “न्यायालय म्हणजे फक्त गुन्हेगारांची शिक्षा करणारी यंत्रणा नाही, ती सामाजिक न्यायाची दिशा दाखवणारी दिवा आहे!” त्यांनी न्याय दिन आणि लोकसंख्या दिनाचे महत्त्व समजावून सांगताना नागरिकांमध्ये कायदा पाळण्याची शिस्त व जागरूकता बाळगण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचा समारोप अॅड. अमर पाटील यांच्या आभार प्रदर्शनाने झाला.





Be First to Comment