
राजकीय भूकंप ! हनीट्रॅप प्रकरणात भाजपच्या “प्रफुल्ल लोढा” या बड्या नेत्याला अटक1
मुंबई प्रतिनीधी : सतिश वि.पाटील
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजवणाऱ्या नाशिक हनीट्रॅप प्रकरणात भाजप नेते प्रफुल्ल लोढा यांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी ५ जुलै रोजी त्यांना अंधेरीतील ‘लोढा हाऊस’ येथून ताब्यात घेतले. त्यांच्या विरोधात पॉक्सो, बलात्कार आणि हनीट्रॅप प्रकरणात गंभीर गुन्हे नोंदवले गेले आहेत. पोलिसांनी त्यांच्या जळगाव, जामनेर आणि पहूर येथील मालमत्तांवरही छापेमारी केली असून, अनेक महत्त्वाचे इलेक्ट्रॉनिक पुरावे जप्त करण्यात आले आहेत.
नाशिक हनीट्रॅप प्रकरणाचा भयंकर विस्तार :
या प्रकरणात आतापर्यंत ७२ उच्चपदस्थ अधिकारी आणि काही राजकीय नेते संशयाच्या भोवऱ्यात आहेत. विधानसभेत काँग्रेस नेते नाना पटोले यांनी एक पेन ड्राईव्ह दाखवत हे प्रकरण उघड केलं आणि प्रचंड राजकीय वादाला तोंड फुटलं. पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे आता या प्रकरणाचे धागेदोरे जळगावच्या राजकारणाशी जोडले जात आहेत.
साकीनाका पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, ६२ वर्षीय प्रफुल्ल लोढा यांनी नोकरीचं आमिष दाखवून १६ वर्षांच्या दोन मुलींवर जबरदस्ती केली, त्यांचे अश्लील फोटो काढले आणि लोढा हाऊसमध्ये बंद करून ठेवत धमकावले. त्यांच्याविरुद्ध पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, अंधेरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात बलात्कार व हनीट्रॅपचा दुसरा गुन्हाही नोंदवण्यात आला आहे.
जळगावमध्ये मोठी कारवाई, राजकीय संबंध तपासणीच्या भोवऱ्यात :
प्रफुल्ल लोढा हे जामनेरचे रहिवासी असून, त्यांनी पूर्वी जळगावच्या एका प्रभावशाली नेत्याशी निकट संबंध ठेवले होते. नंतर मात्र त्यांनी त्याच नेत्यावर गंभीर आरोप केले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळाल्यानंतर काही दिवसांतच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मंत्री गिरीश महाजन यांचे हे पूर्वीचे विरोधक, आता मात्र कट्टर समर्थक बनले होते.
या प्रकरणात जळगावमधील माजी राजकारणी आणि दोन वरिष्ठ अधिकारी संशयित म्हणून पुढे येत असून, नाशिकपासून जळगाव आणि मुंबईपर्यंतचा राजकीय आणि प्रशासनिक जाळं पोलिसांसमोर उलगडत आहे. पुढील काही दिवसांत आणखी मोठी नावं या प्रकरणात समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.




Be First to Comment