
आजची वासनांध नवी पिढी बघितली की “गणा खोत” ची हमखास आठवण येते ; कोण होता हा “गणा खोत” !
रस्त्या रस्त्यावर बला## करीत सुटलेली वासनांध नवी पिढी बघितली की गणा खोताची हमखास आठवण येते. गणा खोतानं तरुणपणी मातीतल्या अनेक कुस्त्या केल्या. अनेक पैलवान पुरुषांचे देह त्याने अंगाखाली लोळवले. पण एखादी इष्काची कुस्ती त्याला उभ्या आयुष्यात कधी खेळता आली नाही की एखादा तरुण स्त्री देह त्याच्या अंगाला कधी चिकटला नाही. उभ्या आयुष्यात स्त्री देहाचा स्पर्शही न झालेलं शरीर घेऊन गणा खोत आयुष्यभर रुबाबात वावरला. टेचात जगला. असू शकतात अशीही माणसं? होय!
दिवस उगवायच्या आधीच गणा खोत अंथरुणातून उगवून वर यायचा. घरात आई आणि दोघेच. केवळ “खादाडा गण्या” अशीच त्याची गावाला ओळख. गणा खोत जन्माला आला आणि त्याची आई जी चुलीला चिकटली ती कायमचीच. सकाळच्या न्याहारीला आठ-दहा भाकरी सहज मुरगळायचा गणा खोत. कोरड्यासाची डीचकी एका बसणीला रिकामी करायचा गणा खोत. खाऊन पिऊन झाले की गच्च ढेकर देऊन हातात बटवा खेळवत गावभर हिंडत राहायचा तो.
लग्नाच्या जेवणावळीत गणा खोत पंक्तीच्या शेवटी एका कोपर्यात जेवायला बसायचा. त्याला जेवायला दोन पत्रावळ्या अंथरल्या जायच्या. सगळ्यांच्या ते अंगवळणीच पडून गेलेलं. तो जेवायला बसला की पंक्तीत फिरून आलेले वाढपी त्याच्याजवळच उभं राहणार. शिऱ्या भाताचं अर्धे घमेलं त्याच्या पत्रावळीवर खाली करायला लागायचं. बुंदीचे जेवण असलं की पंधरा-वीस लाडू सहज गिळायचा गणा खोत. जर्मलीचा एक मग भरून कटाची आमटी प्यायचा गणा खोत. एखादा माणूस म्हणायचा, “चिपाळचिल लका गण्या! मग गणा शेकेचा भुरका मारत म्हणणार, ” तुज्यागत नाजुक हाय व्हय रं माजा.”
गणा खोताने तारुण्यात काही दिवस पैलवानकी केली. जन्मताच धिप्पाड शरीर लाभलेला गणा खोत काही दिवस गावच्या तालमीतल्या लाल मातीत अंग घुसळू लागला. पैलवान पोरासोबत कुस्त्या धरू लागला. नंतर नंतर यात्रा-जत्रात कुस्त्यांच्या फडात कुस्त्या करू लागला. केवळ ताकदीच्या जोरावर त्याने कित्येक पैलवान लोळवले. कित्येक नामांकित पैलवाना सोबत निकाली कुस्त्या केल्या. पण यात तो काही फारसा रमला नाही. शिवाय पैलवानकी करताना कुस्तीत जे डावपेच शिकावे लागतात ते त्याला काही जमले नाहीत. पैलवान असूनही केवळ डावपेच न आल्यानं त्याच्या पेक्षा कमी ताकदीचे पैलवान त्याला सहज लोळवू लागले. अखेर डावपेच न समजलेल्या गणा खोताने भर तारुण्यातच कुस्तीचा नाद सोडला. कायमचाच. गणा खोताला कुस्ती आवडली नाही की कुस्तीला गणा खोत पेलला नाही नेमकं सांगता येणार नाही.
बलदंड धिप्पाड शरीर असूनही केवळ गरिबीमुळं गणा खोताच्या डोक्याला कधीच बाशिंग चिकटलं नाही. वडलोपार्जित एका जमिनीच्या तुकड्यावर गणा खोताला तग धरणं शक्यच नव्हतं. त्याच्या आईनं लोकांची मोलमजुरी करून गणाला मोठा केलेला. रोजगार करून सुद्धा त्याच्या पोटाला तिनं कधी कमी पडू दिलं नाही. त्याची त्याची आई गल्लीतल्या बायकांनी म्हणायची, “देवानं मारुती माझ्या पोटाला घातलाय बाई त्याचा कोटाच हाय तसा मोठा.” पुढं वयोमानानुसार त्याच्या आईच्या हातातलं खुरपं माचोळी खाली अडगळीत पडलं आणि गणा खोताच्या हातात कुदळ, फावडं आलं ते कायमचंच.
गणा खोत केवळ खादाड्या गण्या होता असं नाही तर तो कामात ही हुकमी एक्का निघाला. खताची गाडी दहा मिनिटात भरायचा तो. उकिरंड्यात शिरलेला गणा खोत दोन खोऱ्यात अक्खी खताची पाटी भरायचा. लहान मुलाला हातातून उचलून खेळवत राहावं, अशी सहज खताची पाटी हातावर खेळवत राहायचा तो. वावरातही दोन खोऱ्यात खताची ढिगुळी पाडायचा तो. त्याच्या एवढा वैरणीचा भारा उचलायची हिंमत अख्या पंचक्रोशीत कुणाकडे नव्हती. छप्पर शेकरावे तर त्यानेच. कितीही पाऊस कोसळो. त्याने शेकारलेल्या छप्परात पाण्याचा थेंब सुद्धा आत टिपकायचा नाही. असं पांजरान आणि पाचट टाकायचा तो छपरावर. तडक्या बांधाव्या तर त्यानेच. त्याने बांधलेला कुड पाच सहा वर्षे जागचा हलणार नाही की त्याची बांधाटी निसटणार नाही.
अख्ख्या गावात कुठे साप निघाला कि गणा खोताच्या घराकडे माणूस पळणारच. “आलुच चल पुढं हू” म्हणत गणा खोत कोपऱ्यातला भाला आणि बरचा घेऊन गल्लीबोळात पळत सुटायचा. हिरवीगार धामण असो नाही तर अन्य काही असो. गणा खोताच्या भाल्या पुढं तो घाबरा होणारच. सापला मारताना तो त्याच्या तोंडाच्या मागं भाला खुपसायचा. बरचीचा ठोसा देऊन वेटोळे घातलेल्या सापाला जाग्यावरच संपवून काटीवर घेऊन तो फिरवत फिरवत रिकाम्या जागी आणायचा. काहीवेळा गमतीने पोरांच्या मागे लावायचा. रिकाम्या जागी पालापाचोळा गोळा करून त्याला तो अग्नी द्यायचा आणि पाया पडत म्हणायचा, जा बाबा स्वर्गात पुढच्या जन्मी माणूस म्हणून ये जन्माला.”
गणा खोताचं तारूण्य जसं संपत गेलं तशी त्याची आई पण थकत गेली. त्याच्या एकटयाच्या मजुरीवर त्याचा छप्परातला प्रपंच कसातरी रडत कुढत चालू लागला. पावसाळ्यात त्याच्या हाताला काम मिळायचं नाही. मग त्याचं प्रचंड हाल व्हायचं. या दिवसात तो नुसताच हुलग्याचं माडगं पिऊन दिस ढकलायचा. पण जगायचा. रडायचा नाही. हलत राह्यचा. कुणी जेवलास का रं गणा म्हंटलं की, ही काय आताच जेवलो म्हणत मोठ्यांनं खोटाच ढेकर देऊन वातावरणात जेवल्याचा आभास निर्माण करायचा. पावसाळ्यात कुणी हाक दिली की तो कुणाच्या घरावरची काैलं बसवून द्यायचा. कुणाचं छप्पर शेकरायचा. कुणाच्या गोठ्याला कूड बांधून द्यायचा. तर कुणाच्या घरासमोर जळणासाठी लाकडं फोडून ढीग मारायचा. कधी नुसत्या चहावर नाहीतर एकवेळच्या जेवणावर असली कष्टाची कामं तो करायचा. कुणाच्या कामाला कधी नाही म्हणायचा नाही. नदीला पुराचं पाणी चढ़लं की सारं गाव खालच्या अंगाला असलेल्या नदीकडं सरकायचं. पण गणा खोत उलटा चिंचेच्या ओढ़याकडं सरकायचा. त्याच्या मागं आम्ही लहान पोरं पळायचो. हा ओढ्याकडं गेला की त्याची आई छप्परातल्या दगडी पाटयावर मसाला वाटत बसायची.
गणा खांद्यावर एक जाळी अन हातात मोड़की छत्री घेऊन ओढ्याच्या पुलावर उडणारं मासं पकडायचा. पुरात शिरून करंजीच्या झाडाचा आसरा घेऊन जाळं लावायचा. नदीला पूर चढला की नदीचा मासा ओढयाला चढ़ायचा. कधी कधी पुरात वाहत आलेला एखादा साप येऊन गणाला धड़कायचा. पण गणा पृथ्वीवर असलेल्या कुठल्याच सजीव जीवाला घाबराचा नाही. सापाला हातात धरून गरगर फिरवून गढुळलेल्या पुराच्या पाण्यात अलगद फेकायचा. धोतराच्या फडक्यात पकडलेलं मासं गुंडाळून वर्षानुवर्षे अंधार बाळगून बसलेल्या त्याच्या छप्परात आणून शिजवून खायचा. भूक शांत झाल्यावर बाहेरच्या पावसाळी अंधारात येऊन रस्त्यावर कुणी माणूस दिसलं की कधीतरी खरा ढेकर पण द्यायचा.
पुढं-मागं पोटातली आतडी ओली ठेवण्यासाठी आम्ही गावची वेस ओलांडली आणि गावाच्या एका कोपऱ्याला लोंबकळत गणा खोत मातीला चिकटून मागं राहिला. काळ बदलला. माणसं बदलली. दुनिया इकडची तिकडे झाली. खेड्यापाड्यातून धुरळा उडवीत नागमोडी वळणे घेत ऊन वारा पचवणारी गावाची ती जुनी सडकही बदलली. तिच्या अंगाखांद्यावर बैलगाडी ऐवजी चारचाक्या धावू लागल्या. जगण्याची वाट सुकर झाली. पण गणा खोत आहे तसाच राहिला. जागच्याजागी.
कधी मध्ये गावाकडे गेलो की गणा खोत येता जाताना दिसायचा. बरं हाय का विचारल्यावर, बरंच म्हणायचं बघा! आला दिस ढकलायचा असं म्हणायचा. उन्हाळ्याच्या दिवसात एखाद्या गुऱ्हाळावर गुळव्याचं काम करायचा. पोटाची भूक भागवण्यासाठी तिथेच बचाक भरून गुळाचे खडे खायचा. कासंडीभर रस प्यायचा. ऊन ऊन काकवी प्यायचा. पुन्हा ढेकर देऊन वातावरणात पोटभर जेवण्याला आभास निर्माण करायचा.
कोणाच्या घरी जेवणावळीचं आमंत्रण असलं की त्या दिवशी दिवसभर गणा खोत खूश असायचा. कधी एकदा संध्याकाळ होते आणि तिकडं जेवायला जातोय असं त्याला व्हायचं. एखदा कोणाच्यातरी पाठवणीचे मटण गपागपा खाताना त्याच्या नरड्यात हडकाची नळी ओढताना अडकली. आणि घामाघूम होऊन त्याचा श्वास अडकला. माणसं त्याला पालथा झोपवून नळी पाडू लागली. पण गणा काही डोळे उघडण्याचं नाव घेईना. बघता बघता गावभर गणा खोत मेला म्हणून बातमी पसरली. गणा खोताला बघायला सारं गाव फुटलं. पण कोण तरी म्हणलं, श्वास अजून चालू हाय गड्या. पुन्हा एकच गडबड उडाली. माणसांनी त्याला उचलून जीप मध्ये घालून तालुक्याच्या दवाखान्यात नेला. लोकांना वाटलं आता गणा जिवंत परतणार नाही. पण तिसर्या दिवशी गावात परतलेल्या गणा खोताने एका संध्याकाळी मटणाच्या जेवणावळीत हसत हसत दहा बारा भाकरी मुरगाळीत मटनाच्या नळ्या कडाकडा फोडल्या. आणि कटाचा रस्सा पित म्हणाला, गड्यानो आता खरी चव आली बघा तोंडाला.
असा हा अफलातून गणा खोत. पण गावानं गणा खोताला कधीच गांभीर्याने घेतलं नाही. “खादाडा गण्या” असंच म्हणत लोक त्याला हिणवायचे. गणा खोताची लोकांना काहीच किंमत नव्हती. पण मला हा माणूस नेहमीच एक थोर अवलिया वाटत आलाय. स्वतःच्या डोक्याला कधीच बाशिंग लागलेलं नसतानाही उभ्या आयुष्यात एखाद्या बाईकडे वाकड्या नजरेनं न बघता, निसर्गानं शरीरात भरलेल्या वासना आणि भावना आयुष्यभर आतल्या जाळून मारणं ही काही सोपी गोष्ट आहे?उभ्या आयुष्यात स्त्री देहाचा स्पर्शही न झालेलं शरीर घेऊन गणा खोत आयुष्यभर रुबाबात वावरला. टेचात जगला. शाळेची पायरी न चढलेला गणा खोत हे सारं कुठे शिकला असेल?
पुढं वयोमानानुसार त्याच्या आईची एके दिवशी राख होऊन गेली. आणि माती सावडून आईच्या अस्थी घेऊन चंदभागेत सोडायला गेलेल्या गणा खोतानं गाव सोडलं ते कायमचंच. प्रश्न होता पोटाचा? प्रश्न होता भाकरीचा? आई होती तोपर्यंत कसंतरी भाकरीचं पीठ मळून चूल चालू ठेवत होती. सातारा जिल्ह्यातल्या एका वाडीत एका बागायतदाराकडे घरगडी म्हणून गणा खोत कामाला राहिला. तिकडे त्याला खायला-प्यायला चांगलं मिळू लागले. मालकाच्या मळ्यातच एका पत्र्याच्या शेडमध्ये त्याचा मुक्काम पडला. तिथं गुरांच्या धारा, शेणघाण, वैरण गाडी करणं, पिकाला पाणी पाजणं अशी पडेल ती शेतातली कामं तो तिकडे करू लागला. गाव हळूहळू गणा खोताला विसरून गेलं पण गणा खोत गावाला विसरला असेल का?
एकदा गोंदावले वरून परतत असताना रस्त्यात गणा खोताची आठवण झाली. गणा खोत गावासाठी मेला असेल पण आपल्यासाठी मरून कसं चालेल? म्हणून मुख्य रस्ता सोडून आडवाटा धुंडाळत गणा खोत राहात असलेल्या वाडीकडे वळालो. दुपार झालेली. वाडी तशी सामसूम होती. पण गावात अश्या वर्णनाचा माणूस कुठे काम करतो हे विचारलं तर पटकन त्याचा मुक्काम समजला. वाडीबाहेर एका मुरमाड गाडीवाटीने मोटार सायकल वरून निघालो. दोन किलोमीटर गेल्यावर डोंगराच्या पायथ्याला एक झुळुझुळु वाहणारा ओढा लागला. तिथंच थांबून इकडे तिकडे येणा जाणाऱ्या पाशी जरा वेळ थांबून चौकशी केली तर एकाने पलीकडे हात दाखवला. तो रहात असलेला मळा हाच होता. तिथंच एक पत्र्याचं शेड होतं. गणा खोताचा मुक्काम इथेच. मोटरसायकल तिथंच लावून शेडपर्यंत चालत गेलो. पुढं वावरकडं बघितलं तर मळकट बंडी आणि बरमुडा घातलेला थकलेला गणा खोत मागचा डोंगर पाठीवर घेऊन गव्हाची दारी मोडत होता. पूर्वीसारखा त्याचा तो दिमाख डौल आता उरला नव्हता. पूर्वीसारखं त्याचं ते धिप्पाड शरीरही आता राहीलं नव्हतं. बांधाने चालत मी जवळ गेलो. कुणाच्या तरी येण्याची चाहूल लागताच थकलेल्या गणा खोताने मान वर केली. त्याचं हरेखलेपण आणि झालेला आनंद इथे मला शब्दांत मांडता येणार नाही. कारण असंख्य वेळा ऐन मोक्याच्या संवेदनशील वेळी मला शब्द धोका देतात आणि मी हतबल होऊन जातो…
बांधावर बसून बराच वेळ मी त्याच्या नव्या जुन्या आठवणी जाग्या केल्या. गुळाच्या ढेपेला लागलेल्या मुंगळ्यागत कदाचित त्याला त्या कुरतडत असाव्यात. “जगायचं कसंतरी! किती दिस उरल्यात आता! तुमचं बरं हाय नव्ह!” असं काही बाही तो बराच वेळ बोलत राहिला. दिवस मावळतीकडे सरकू लागला. भयान शांत वाटणाऱ्या त्या ओढ्याच्या वाटेला आता गुराढोरांचा वेढा पडू लागला. मी जायचं म्हणून उठलो. तर मला निरोप द्यायला गणा खोत ओढ्यापर्यंत माझ्या सोबत येऊ लागला. त्यानं मला तिथंच थांबवून शेडमधली एक मळकट पिशवी घेऊन गव्हातली दहा बारा मक्याची कणसं पळत पळत मोडून आणली. एकीकडे केवळ पैसा आणि वासनेच्या आगीत अखंड मानवजात एकमेकांचे मुडदे पाडत असताना गणा खोतासारखी माणसं नेमकी कशाच्या बळावर शेता शिवारात इतकी भक्कमपणे उभी असतील?
त्याचा निरोप घेऊन मी मोटारसायकलला किक मारली. थोडं पुढं गेल्यावर वळून त्याच्याकडं बघितलं. तर एका डगरटीवर चढून तो मागून हात हलवत उभा होता. जणू मागचा डोंगरच हलतोय असा भास. पुढं अजून एका वळणावर मी क्षणभर थांबलो आणि पुन्हा वळून ओढ्याच्या वाटेकडं बघू लागलो तर भल्या मोठ्या गणा खोताचा डगरटीवरचा पांढरा ठिपका अजून जागीच उभा होता. खरंच! कोणता विचार करीत इतका वेळ जाग्यावर थांबला असेल गणा खोत? आता पुन्हा त्याची केव्हा भेट होईल? होईल की नाही ते ही कुणास ठाऊक…
©ज्ञानदेव पोळ




Be First to Comment