Press "Enter" to skip to content

रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात वृक्षारोपण करून निषेध

उरण चारफाटा–पिरवाडी (ओएनजीसी) रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य


उरण (घन:श्याम कडू)

चारफाटा ते पिरवाडी ओएनजीसी मार्ग म्हणजे खड्ड्यांचा महामार्ग झालाय! रस्ता आहे की खड्ड्यांतून गेलेली पायवाट, हेच कळेनासं झालंय. या मार्गाचा दररोज वापर करणाऱ्या प्रवाशांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. विशेष म्हणजे या मार्गावर ओएनजीसीसारखी मोठी केंद्रसरकारी कंपनी असतानाही रस्त्याचं काय हाल झालंय, याकडे कंपनीने पाठ फिरवली आहे!

पनवेल, नवी मुंबई, ठाणे या भागातून पिरवाडी समुद्रकिनाऱ्याकडे जाणारे पर्यटक, स्थानिक ग्रामस्थ, ओएनजीसीचे कामगार — सगळेच या खड्ड्यांच्या नरकयात्रेला रोज सामोरे जात आहेत. जणू काही रस्ता नाही, तर खड्ड्यांचंच साम्राज्य. एका स्थानिक तरुणांनी ओएनजीसी कंपनीचे लक्ष वेधण्यासाठी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात वृक्षारोपण करून आपला निषेध व्यक्त केला.

पिरवाडी समुद्रकाठाकडे जाणारा रस्ता नव्याने केला गेला, पण ठेकेदाराने असा हलक्या दर्जाचा रस्ता टाकला की, पहिल्याच पावसात हा रस्ता खचला. चारफाटा ते पिरवाडी दरम्यान शंभर खड्डे आणि एक रस्ता असं चित्र आहे. आणि ते खड्डेही चिमुरड्याचे नाहीत, तर चक्क दुचाकी, रिक्षा गिळकृत करणारे ‘मातब्बर’ खड्डे आहेत!

ग्रामस्थांनी यावर वारंवार तक्रारी करूनही ना ठेकेदार हलतो, ना प्रशासन. आणि ओएनजीसीसारखी कंपनी तर ‘आम्ही काय करायचं?’ अशा थाटात अंग झटकून मोकळी होतेय. लाखोंचा महसूल कमावणारी कंपनी, पण स्थानिक रस्त्यांबाबतची जबाबदारी मात्र झटकून टाकण्याचा उद्योग सुरू आहे.

या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांची शक्यता वाढली आहे. एखादी जीवघेणी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागं होणार का? की आणखी एखाद्याचा बळी गेला पाहिजे? त्वरित खड्डे बुजवून रस्ता दर्जेदार केला नाही, तर ग्रामस्थ रस्त्यावर उतरून थेट ओएनजीसीच्या गेटसमोर ठिय्या आंदोलन करू, असा इशारा यावेळी नागरिकांनी दिला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.