Press "Enter" to skip to content

कंटेनर फुटला आणि त्यातून निघू लागला प्रचंड धूर

ग्लोबिकॉनच्या कंटेनरमधून धुराचे लोड ; माणसं मळमळली, प्रशासन ढिम्म !

उरण (घन:श्याम कडू)

उरण पूर्व भागातील जनतेनं काल मरण अक्षरशः डोळ्यांनी पाहिलं. कोप्रोली गावाजवळ असलेल्या ग्लोबिकॉन कंटेनर यार्डमध्ये एक कंटेनर फुटला आणि त्यातून प्रचंड धूर बाहेर पडू लागला. या धुरामुळे संपूर्ण परिसर ढगाळला, आणि नागरिकांची दमछाक झाली. कोणाला उलट्या सुरू झाल्या, कुणाला चक्कर, कुणाच्या पोटात मळमळ हे सगळं सुरू असतानाही, प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत गप्प बसलेत.

गेल्या कित्येक वर्षापासून उरण तालुक्यात हे कंटेनर गोदामांचे गुप्तधंदे सुरू आहेत. हजर डस्टसारख्या जीवघेण्या रसायनांचे कंटेनर बिनधास्त साठवले जात आहेत. परवाना नाही, सुरक्षा नाही, फायर फायटिंग नाही. पण बिनधास्त धंदा सुरू आहे, कारण काय? ‘हप्ता’ नावाची जादू! जोपर्यंत एखाद्या कंटेनरचा स्फोट होऊन चार माणसं मरणार नाहीत, तोपर्यंत इथं कोणालाही काही वाटणार नाही.


कारण प्रशासन, अग्निशमन, ग्रामपंचायत सगळे मिळून ‘अळीमिळी गुपचिळी’चं नाटक करतायत. या साऱ्या प्रकरणावर उरण तहसीलदार कार्यालयाशी आणि उरण पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता, उपस्थित अधिकाऱ्यांनी “आम्हाला याची काहीच माहिती नाही, कुठलीही नोंद नाही” अशी थंड उत्तरं दिली. म्हणजे कंटेनर फुटतो, धूर पसरतो, लोक मरणासारखा त्रास सहन करतात आणि प्रशासनाला काहीच माहित नसतं? म्हणजे हे सगळं चालू कुणाच्या आशीर्वादाने?
आज जे घडलं ते अपघात नव्हता, ते फक्त लक्षण होतं. या सगळ्या बेशरम आणि भ्रष्ट सिस्टीमचं. तासाभर कंटेनरमधून धूर निघत होता, परिसरात जहर मिसळत होतं, नागरिकांची तब्येत बिघडत होती, तरीही ना कुणी पोलिस आले, ना अधिकारी, ना डॉक्टर! म्हणजे काय? माणसं मेल्यावर पंचनामा करायला हे येणार?

ग्लोबिकॉनचे थोर मालक जेकब थॉमस म्हणाले, “लिथियमचा कंटेनर होता, धूर निघाला, पण काही झालं नाही.” अरे बापरे! म्हणजे उलट्या करणारे, घशात झणझण घेणारे, चक्कर आलेले नागरिक हे काय सगळे नाटक करत होते का? जनतेच्या जीवाशी खेळ करून कंपनीवाले हात झटकतायत, आणि प्रशासन फक्त ‘ऑल इज वेल’चा ढोल वाजवतंय.

उरण तालुका आज कंटेनरच्या जहरात गुदमरतोय. विकासाच्या नावाखाली येथील जनतेच्या नशिबी मृत्यूचं सावट आलंय. हे सगळं थांबवायचं असेल तर आता उरणकरांनी एकच ठरवावं लागेल. हे कंटेनरवाले, हे दलाल अधिकारी आणि हप्तेखोर राजकीय नेतेमंडळी यांना जाब विचारावा लागेल.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.