
अवैध माती उत्खन्न केल्या प्रकरणी आरव्ही लॉजिस्टिक पार्क प्रा. लि.च्या तिन्ही ७/१२ वर बसवला साठ लाखापेक्षा अधिक बोजा
खालापूर/ प्रतिनिधी :
मौजे रानसई स. नं. ६४/१ या आदिवासी शेतकरी यांच्या वडिलोपार्जित असणाऱ्या जमिनीमधून आरवी लॉजिस्टिक पार्क प्रा. लि. कंपनीने अवैधरित्या माती उत्खन्न केल्या प्रकरणी श्रीम. ताराबाई बारकू कातकरी, श्रीम. शकुंतला रमेश कातकरी, बारकू देहू कातकरी, मारुती बारकू कातकरी यांनी अनेकदा महसूल खात्याकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यानंतर स्थळ पाहणी करून अवैधरित्या केलेले माती उत्खन्नाचे मोजमाप घेऊन मंडळ अधिकारी वावोशी यांनी तहसीलदार यांना अहवाल सादर केला होता.
त्याअनुषंगाने खालापूर तहसीलदार यांनी सुनावणी घेऊन दि. ०६/१२/२०२३ रोजी आदेश दिले आहे. त्यामध्ये १००० ब्रास माती काढण्यासाठी परवानगी घेतली असल्याचे म्हटले आहे तर १२९६.६० ब्रास इतक्या अधिकच्या प्रमाणात माती उत्खन्न झाल्याचे म्हटले आहे. त्यानुसार रक्कम ६०,०६,८२४/- (अक्षरी, साठ लक्ष सहा हजार आठशे चोवीस मात्र) एवढा दंड करून ३० दिवसाचे आत आर.व्ही. लॉजिस्टिक पार्क प्रा. लि. कंपनीने भरणेचा आहे, असे तात्कालीन खालापूर तहसीलदार आयुब तांबोळी यांनी आदेश दिले होते, परंतु दंड भरला नाही. शासनाचा महसूल बुडविणे, आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीतून मातीची चोरी केल्या प्रकरणी आरवी लॉजिस्टिक पार्क प्रा.लि. कंपनीवर गुन्हा दाखल व दंड वसुल करण्यासाठी रायगड आदिवासी समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष गणपत वारगडा, जयवंत शिद, विष्णू खैर, संदीप भस्मा, रोहित वाघमारे यांनी खालापूर तहसीलदार श्री. अभय चव्हाण, महसूल नायब तहसीलदार श्री. पवार यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली होती.


त्यानंतर महसूल खात्याने कायदेशीर प्रकिया करून आर.व्ही. लॉजिस्टिक पार्क प्रा.लि. कंपनीला केलेला दंड न भरल्याने कंपनीच्या जमीन मिळकतीचा शोध घेऊन त्यावर बोजा ठेवण्यासाठी वावोशी मंडळ अधिकारी यांना दि. २०/०६/२०२५ रोजी खालापूर तहसीलदार श्री. अभय चव्हाण यांनी पत्र काढले होते.
अवैधरित्या व अनधिकृत माती उत्खन्न केल्याने मा. तहसीलदार अभय चव्हाण यांनी काढलेल्या पत्रानुसार तलाठी व मंडळ अधिकारी यांनी आरवी लॉजिस्टिक प्रा. लि. च्या नावे असणाऱ्या सातबाराचा शोध घेतला आणि शासकीय प्रक्रिया करून दिनांक ११/०७/२०२५ रोजी फेरफार क्रमांक १३४८ नुसार आरवी लॉजिस्टिक प्रा. लि. च्या नावे असणारे मौजे रानसई येथील सर्व्हे नं. २०, २६/२, २१/२ असे तिन्ही सातबारावर अनधिकृत गौण खनिज उत्खन्न दंड रक्कम ६०,०६,८२४ एवढा बोजा बसविण्यात आला आहे. खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांनी केलेल्या बेधडक कारवाईने खालापूर हद्दीतील ग्रामस्थांकडून गुणगान गायले जात आहे. तर आदिवासी शेतकऱ्यांना तहसीलदार अभय चव्हाण यांचे आभार मानले आहे.





Be First to Comment