

उरण (घन:श्याम कडू)
खड्ड्यांनी भरलेल्या आणि जनतेच्या नाकीनऊ आणलेल्या खोपटा-कोप्रोली रस्त्याच्या दुरवस्थेवर अखेर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनाला झुकवावं लागलं. गेली दोन वर्षे रखडलेल्या या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाला आज, बुधवार १६ जुलै रोजी अखेर सुरुवात झाली.
आज सकाळीच खोपटा पुलाच्या खाली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तालुकाप्रमुख संतोष ठाकूर व तालुका संघटक बी. एन. डाकी यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने एकत्र येत रास्ता रोकोचा इशारा दिला. प्रशासनाला खडबडून जागं करत शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता नरेश पवार, उपअभियंता नरेश सोनवणे यांनी धाव घेत पदाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि “आजपासूनच रस्त्याचे काम सुरू करण्यात येत आहे” अशी ग्वाही दिली. यावेळी कामाचे ठेकेदार राजाशेठ खारपाटील स्वतः हजर होते आणि “काम पूर्ण करणे ही माझी जबाबदारी आहे” असे सांगत त्यांनी प्रत्यक्ष काम सुरू असल्याचे घोषित केले.
तालुकाप्रमुख संतोष ठाकूर यांनी संतप्तपणे सांगितले की, “शिवसेना गेली दोन वर्षे या प्रश्नासाठी लढत आहे. चार महिने उलटले तरी काम सुरू झालं नव्हतं. ही प्रशासनाची आणि सत्ताधाऱ्यांची ढिसाळता आहे. जनतेचा आवाज न ऐकणाऱ्यांना आंदोलनाशिवाय जाग येत नाही.”
या वेळी तालुका संघटक बी एन डाकी, उपतालुका संघटक रुपेश पाटील, विभागप्रमुख भूषण ठाकूर, वशेणी सरपंच अनामिका म्हात्रे, माजी सरपंच भावना म्हात्रे यांनीही अभियंत्यांना जाब विचारून थेट जबाबदारीची आठवण करून दिली.
या आंदोलनात माजी तालुका प्रमुख राजीव म्हात्रे, चिरनेर सरपंच भास्कर मोकल, कोप्रोली शाखाप्रमुख रवी म्हात्रे, खोपटे शाखाप्रमुख नंदकुमार ठाकूर यांच्यासह रितेश ठाकूर, गणेश म्हात्रे, जयंत म्हात्रे, प्रांजल पाटील, लक्ष्मण ठाकूर, गजानन वशेणीकर, दीपक म्हात्रे, महेश कोळी आदींचा उत्स्फूर्त सहभाग होता. काही काळ रास्ता रोकोही करण्यात आला.
शिवसेनेच्या ठाम आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे प्रशासनाने अखेर जाग येऊन काम सुरू केल्याचे स्पष्ट झाले. जनतेच्या प्रश्नांवर शिवसेना उरणमध्ये कशी तत्पर आहे, हे पुन्हा सिद्ध झालं आहे.





Be First to Comment