
अपहरण करून मारहाण झालेल्या पत्रकाराच्या तक्रारीला केराची टोपली आणी तडीपारी लागलेल्या गुन्हेगार महिलेच्या तक्रारीवर ताबडतोब कारवाई ? पोलिसांची भूमिका वादाच्या भोवऱ्यात !
पत्रकार समीर बामुगडे यांचा निर्धार “आता मी थांबणार नाही !, शेवटपर्यंत लढा देणार”
पनवेल – गेल्या ३० वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रामाणिकपणे कार्य करणारे ज्येष्ठ पत्रकार समीर बामुगडे यांच्यावर करण्यात आलेले खोटे आरोप आता मोठ्या वादाला तोंड देत आहेत. एका महिलेने त्यांच्या विरोधात बनावट तक्रार करून त्यांच्यावर आर्थिक फसवणुकीचा आरोप केला. विशेष म्हणजे, हीच महिला याआधी गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकलेली असून तिला रत्नागिरी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.
समीर बामुगडे यांनी याआधीच पनवेल पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करून, त्या महिलेने एका टोळीच्या मदतीने अपहरण केल्याचा आणि जबरदस्तीने काही व्हिडिओ रेकॉर्ड करून घेतल्याचा आरोप केला आहे. त्यांनी त्याचे पुरावेही पोलिसांना दिले; मात्र आश्चर्य म्हणजे आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.
समीर बामुगडे म्हणाले, “मी कोणताही आर्थिक गैरव्यवहार केलेला नाही. उलट मी त्या महिलेला काही रक्कम दिली आहे आणि त्याचेही पुरावे माझ्याकडे आहेत. माझी कामे बँक व्यवहारातूनच पार पडली आहेत. माझी पत्रकारिता खरी आहे, त्यामुळे मी आता अधिक आक्रमक होईन.”
या घटनेवर अनेक मीडिया चॅनेल्सनी कोणतीही तथ्य तपासणी न करता एकतर्फी आणि खोटी बातमी दाखवली. याविरोधात बामुगडे यांनी ठाम भूमिका घेत, “जर यापुढे कोणत्याही चॅनेलने अशा प्रकारच्या बदनामीकारक बातम्या दाखवल्या, तर मी त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार. मी थांबणार नाही – माझ्या सन्मानासाठी आणि पत्रकारितेच्या प्रतिष्ठेसाठी मी लढणार,” असा स्पष्ट इशारा दिला.
बामुगडे यांचे म्हणणे आहे की, पोलिसांनी एका तडीपार महिलेच्या खोट्या आरोपांना महत्त्व देऊन, एका प्रामाणिक पत्रकाराकडे दुर्लक्ष केल्यास, लोकशाही व्यवस्थेवरचा विश्वासच उडेल.
त्यामुळे हे प्रकरण केवळ वैयक्तिक बदनामीचे नसून, संपूर्ण पत्रकारिता आणि लोकशाहीवरील गंभीर आक्रमण आहे. बामुगडे यांनी मागणी केली आहे की, या प्रकरणात तात्काळ आणि पारदर्शक तपास होऊन दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.





Be First to Comment