
चिनी फटाक्यांचे ७ कंटेनर उघडकीस, ३५ कोटींचा बेकायदेशीर स्फोटक माल जप्त !
उरण (घन:श्याम कडू)
देशाच्या सुरक्षेला सुरुंग लावणाऱ्या काळाबाजारांना आता महसूल गुप्तचर संचालनालय (DRI) ने चांगलाच झटका दिला आहे. ‘ऑपरेशन फायर ट्रेल’ या गुप्त मोहिमेतून मुंबई विभागीय युनिटने एक धडाकेबाज कारवाई करत न्हावा शेवा बंदर, मुंद्रा बंदर आणि कांडला SEZ इथून चक्क ३५ कोटींचे चिनी फटाके असलेले ७ कंटेनर जप्त केले आहेत!
या फटाक्यांचं वजन तब्बल १०० मेट्रिक टन असून, हे संपूर्ण स्फोटक साठवण खोट्या घोषणांच्या आड लपवण्यात आले होते. “मिनी डेकोरेटिव्ह प्लांट्स”, “आर्टिफिशियल फुलं” आणि “प्लास्टिक मॅट्स” अशा बिनधोक वस्तू म्हणून जाहीर करून देशात बेकायदेशीरपणे हे फटाके डंप करण्याचा कट आखला गेला होता. मात्र, DRI च्या अत्यंत बारकाईच्या कारवाईने हा स्फोटक कट उधळून लावला.
लाल शिसे, लिथियम, तांबे ऑक्साईडसारखी अत्यंत धोकादायक रसायनं या फटाक्यांत आढळली असून, कोणताही परवाना न घेता या मालाची आयात करण्यात आली होती.
भारताच्या विदेश व्यापार धोरण व २००८ च्या स्फोटक नियमांनुसार, फटाक्यांची आयात ही “प्रतिबंधित श्रेणीत” मोडते. त्यामुळे DGFT आणि PESO (स्फोटक सुरक्षा संघटना) यांच्याकडून परवानगी घेणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. मात्र या सर्व नियमांना हरताळ फासत, SEZ युनिटच्या माध्यमातून देशांतर्गत वितरणासाठी ही मालवाहतूक सुरू होती.
ही केवळ तस्करी नव्हे, तर राष्ट्रीय सुरक्षेच्या मुळावर उठलेला गंभीर हल्लाच होता. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर स्फोटक माल देशात शिरला असता, तर कुठल्याही क्षणी अपघात, स्फोट किंवा लॉजिस्टिक साखळीतील गंभीर दुर्घटना होण्याची शक्यता होती. बंदराच्या सुरक्षेपासून ते संपूर्ण वाहतूक व्यवस्थेपर्यंत याचा भयंकर फटका बसला असता.
या कारवाईमागे असलेल्या सूत्रधाराची DRI ने ओळख पटवली असून त्याला अटक करण्यात आली आहे. संबंधित SEZ युनिटमधील एक भागीदार असल्याचे उघड झाले असून त्याला न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
या कारवाईने फक्त चिनी फटाक्यांचं धाडसी आयातच उधळून लावलेली नाही, तर देशाच्या सुरक्षेसमोरील एक मोठा स्फोटक धोका टाळण्यात यश मिळवलं आहे. DRI च्या या शौर्यपूर्ण कारवाईचे सर्वत्र कौतुक होत असून, अशा गद्दार तस्करांना अद्दल घडवण्याची ही सुरुवातच आहे, असं जाणकारांचं ठाम मत आहे.





Be First to Comment