Press "Enter" to skip to content

जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण अर्थात ‘दिशा’ समितीची बैठक

केंद्र सरकारच्या योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करा : खासदार श्रीरंग बारणे

रायगड : याकूब सय्यद

दि. १४ – केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांची जिल्हा प्रशासनाने काटेकोरपणे अंमलबजावणी करावी.यामध्ये कोणताही हजगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असे निर्देश दिशा समितीचे अध्यक्ष खासदार श्रीरंग बारणे व सहअध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिले.

रायगड जिल्ह्यातील केंद्रीय योजनांच्या प्रगती आढावा घेण्यासाठी सोमवारी जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण अर्थात ‘दिशा’ समितीची बैठक नियोजन समिती सभागृहात पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी खासदार श्रीरंग बारणे तर सह अध्यक्षस्थानी खा. सुनील तटकरे हे होते. बैठकीला खा. धैर्यशील पाटील, आ महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलीस अधीक्षक आचल दलाल, पनवेल मनपा आयुक्त मंगेश चितळे,अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बढे, प्रकल्प संचालक प्रियदर्शिनी मोरे यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामांचा आढावा घेण्यात आला. अनेक कामे अपूर्ण अवस्थेत आहेत. या प्रकरणी दोषी असणाऱ्या ठेकेदारावर काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करण्यात यावी तसेच आवश्यकते नुसार फेर निविदा करण्यात यावी असे निर्देश खा श्री तटकरे यांनी यावेळी दिले. तसेच ही सर्व कामे प्राधान्य क्रमाने पूर्ण करावीत.

सर्व सामान्यांना पाणीपुरवठा,आवास, शिक्षण, आरोग्य, त्याचप्रमाणे इतर सुविधाही विविध योजनांच्या माध्यमातून मिळवून देण्यासाठी केंद्र शासन व राज्य शासन प्रयत्नशील आहे. सर्व विभाग, यंत्रणांनी जबाबदारीने काम करावे असे खा बारणे यांनी सांगितले. केंद्र शासनाच्या सर्व योजनांची जिल्ह्यात प्रभावी प्रसिद्धी करण्यात यावी. मोक्याच्या व प्रत्यक्ष लाभाच्या ठिकाणी ठळक पणे योजना माहिती व लाभार्थी निकष लावावेत अशा सूचनाही श्री बारणे यांनी जिल्हा प्रशासनास दिल्या.

राष्ट्रीय सामाजिक मदत कार्यक्रमंतर्गत जिल्हा आरोग्य प्रशासनाने दिव्यांग मेळावे आयोजित करून लाभ द्यावे असे निर्देश मागील बैठकीत दिले होते. परंतु त्याची पूर्तता न झाल्याने सर्व लोक प्रतिनिधी यांनी नाराजी व्यक्त केली. तात्काळ हे मेळावे आयोजित करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी व आरोग्य विभागास दिल्या.

संजय गांधी निराधार योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना मधील दिव्यांग लाभार्थी यांचा देखील समावेश असावा असेही खा तटकरे यांनी यावेळी सांगितले.

स्वच्छा भारत मिशन ग्रामीण अंतर्गत सार्वजनिक शौचालय यांचे उद्दिष्ट वाढविण्याबाबत निर्देश दिले होते त्याप्रमाणे या वर्षासाठी 1500 वैयक्तिक व 150 सार्वजनिक शौचालय उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. पनवेल तालुक्यातील आणि एकूणच सर्व ग्रामपंचायत हद्दीतील घनकचरा व्यवस्थापनावर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन प्रकल्प राबवावेत. तसेच जिल्ह्याला डेव्हलोपमेंट चार्जेस मिळाले तर त्यामधून जिल्हा विकासाला त्याचा फायदा होईल यावरही बैठकीत सविस्तर चर्चा झाली. तसेच विविध कंपन्याकडे सि एस आर निधी असतो हा निधी त्यांनी संबंधित कार्यक्षेत्रात देखील खर्च करण्याबाबत कळवावे असेही खा श्री बारणे यांनी सांगितले.

यावेळी पाणी पुरवठ्याच्या सर्व योजनावर सविस्तर चर्चा झाली. या योजनाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश संबंधिताना देण्यात आले.

प्रधानमंत्री आवास योजनेतर्गत बँका परस्पर कर्ज कपात करीत आहेत त्यांनी ही कपात तात्काळ थांबवावी असेही निर्देश श्री बारणे यांनी दिले.

खासदार धैर्यशील पाटील यांनी कांदळवन आणि बी एस एन एल नेटवर्क टॉवर या विषयी सविस्तर चर्चा केली.

बैठकीत प्रधानमंत्री सुर्यघर योजना, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, मनरेगा, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, गृहनिर्माण योजना, जलजीवन मिशन, अटल भूजल योजना, मजीप्रा, स्वच्छ भारत मिशन, राष्ट्रीय आरोग्य योजना, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, कौशल्य विकास योजना, पीएम प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, नगरपरिषदेच्या योजना यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे यांनी बैठकीची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.