
शनिशिंगणापूरच्या देवस्थानात २४७४ बोगस कर्मचारी, बनावट ऐप द्वारे शेकडो कोटींचा घोटाळा ; पण अखेर भ्रष्टाचारी शनी च्या फेऱ्यात अडकलेचं
शनी शिंगणापूर : प्रतिनिधी
शनिशिंगणापूर देवस्थानात तब्बल २ हजार ४७४ बोगस कर्मचारी दाखवून देवस्थानचे पैसे पगाराच्या रूपात आपल्या कार्यकर्त्यांच्या खात्यात वळते केल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी या गैरकारभाराचा सारा लेखाजोखाच विधानसभेत मांडला.
या भ्रष्ट विश्वस्तांवर फौजदारी कारवाई केली जाईल, असे सांगतानाच भ्रष्टाचार करणार्यांना त्यांची जागा दाखविली जाईल, असा निर्धार मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
नेवासाचे आमदार विठ्ठल लंघे यांनी शनिशिंगणापूर देवस्थानातील गैरप्रकारांबाबत उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेला मुख्यमंत्र्यांनी तपशीलवार उत्तर दिले. यापूर्वी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही शनिशिंगणापूरचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यानुसार चौकशी समिती गठित करण्यात आली होती. या समितीने दिलेल्या अहवालात देवाच्या ठिकाणीही लोक किती भ्रष्टाचार करू शकतात, याचा भयानक नमुना पुढे आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
या देवस्थानचा कारभार पूर्वी 258 कर्मचार्यांच्या माध्यमातून अत्यंत व्यवस्थित हाकण्यात येत होता. तेथे आता 2 हजार 474 कर्मचार्यांची नियुक्ती केल्याचे भासवण्यात आले. स्थानिक कार्यकर्त्यांचे बँकेत खाते उघडून त्यांच्या खात्यांवर देवस्थानच्या खात्यातून पगाराच्या रूपाने पैसे देण्यात आले.
विधी, न्याय विभागाकडून कारवाई
याप्रकरणी विधी आणि न्याय विभागाला फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, पोलिसांना बाहेरील पथक पाठवून चौकशीचे आदेश दिले आहेत. यापूर्वी आलेल्या तक्रारींनुसार विशेष ऑडिट करण्यात आले होते. त्यावेळी धर्मादाय विभागाच्या एका अधिकार्याने क्लीन चिट दिली होती. हा अनुभव लक्षात घेता विशेष पथकाला चौकशी करण्यास सांगितल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
पोलिसांकडून चौकशी
बनावट अॅपद्वारे पूजेचे पैसे स्वीकारण्यात येत असल्याचा आरोप आमदार विठ्ठल लंघे यांनी केला होता. याचा तपास सायबर पोलीस दलाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांच्या देखरेखीखाली करण्यात येणार आहे. विधानसभेने कायदा करून शिर्डी, पंढरपूर देवस्थानप्रमाणे शनिशिंगणापूर येथेही समिती असावी, असे निश्चित केले आहे. त्याचीही अंमलबजावणी लवकरात लवकर केली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.





Be First to Comment