


गुरु-शिष्य परंपरेचा आदर्श घेऊन राष्ट्र-धर्मासाठी कृतीशील होणे ही खरी गुरुदक्षिणा ! – डॉ. उदय धुरी, प्रवक्ता हिंदु जनजागृती समिती
रायगड – आज संपूर्ण जगावर तिसर्या महायुद्धाची टांगती तलवार आहे. देशांतर्गतही पहलगामच प्रमाणेच दंगली, फेक नॅरेटिव्हज्’, लव्ह जिहाद, लँड जिहाद करून हिंदूंना लक्ष केले जात आहे. अशा परिस्थितीतही हिंदूंमध्ये संभ्रम आहे. महाभारताच्या वेळी अर्जुन संभ्रमावस्थेत होता, तेव्हा श्रीकृष्णाने सांगितले होते की, ‘अधर्माविरुद्ध लढणे हाच धर्म आहे.” आजही गुरुतत्त्वाला हेच अपेक्षित आहे की हिंदूंनी साधना करून आपले आध्यात्मिक बळ वाढवावे आणि अधर्माविरुद्ध कृतीशील व्हावे. हाच आपल्या गुरु-शिष्य परंपरेचा आदर्श असून, त्याच मार्गावर चालणे हीच खरी गुरुदक्षिणा आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे डॉ. उदय धुरी यांनी केले. ते पाली येथील जांभुळपाडा या ठिकाणी १० जुलै या दिवाशी झालेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवात ते बोलत होते. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता राहुल पाटकर यांनीही मार्गदर्शन केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रायगड जिल्ह्यात खोपोली, रामनाथ (अलिबाग) आणि जांभुळपाडा, पाली येथे, तर देशभरात एकूण ४५ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ चैतन्यमय वातावरणात संपन्न झाले.
‘आज हिंदू धर्मावर आक्रमणे होत असताना हिंदू मात्र शांत आहे. हिंदू धर्मरक्षणासाठी काही तरी करण्याची इच्छा आहे असे हिंदू कमी आहेत. आता या देशाला आणि धर्माला वाचवण्यासाठी या हिंदूंनी संघटित होण्याची आवश्यकता आहे’, असे आवाहन हिंदू विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी खोपोली येथील श्री समर्थ मंगल कार्यालयामध्ये गुरूपौर्णिमा महोत्सवात केले. यावेळी हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. सतीश कोचरेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (सुश्री) अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांची वंदनीय उपस्थिती खोपोली येथील गुरुपौर्णिमेला लाभली. कार्यक्रमाच्या शेवटी स्वरक्षा प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. हिंदु जनजागृती समितीचे श्री. योगेश ठाकूर यांनी रामनाथ (अलिबाग) येथील महोत्सवात प्रबोधन केले.
सर्व महोत्सवाच्या प्रारंभी श्री व्यासपूजा, प.पू. भक्तराज महाराज यांचे प्रतिमापूजन आणि रामराज्याच्या स्थापनेसाठी सामूहिक नामजप यावेळी करण्यात आला. संतसंदेशाचे वाचन, कार्यकर्त्यांचे अनुभवकथन आणि लघुपट याद्वारे महोत्सवात जनजागृती करण्यात आली. विविध विषयांवरील आध्यात्मिक, राष्ट्र आणि धार्मिक विषयीचे ग्रंथप्रदर्शन, तसेच राष्ट्र-धर्म विषयक फलकप्रदर्शनाचा यावेळी धर्मप्रेमी हिंदूंनी लाभ घेतला.
ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सव’: देश-विदेशांतील भाविकांना गुरुपौर्णिमेचा लाभ घेता यावा यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने इंग्रजी, कन्नड, तेलगू, बंगाली या भाषांत ‘ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सव’ संपन्न झाले. या माध्यमांतून देशविदेशातील दर्शक आणि हिंदू बांधवांनी ‘गुरुपौर्णिमा महोत्सवां’चा लाभ घेतला.





Be First to Comment