

विद्यार्थ्यांनी शैक्षणिक दृष्ट्या सक्षम होऊन आपल्यासह समाजाचे नांव उज्वल करावे – भीमराव आंबेडकर
पेण, दि. 5 ( प्रतिनिधी ) -: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनात विविध ठिकाणी महाविद्यालयांची निर्मिती केली असून पूर्वीचा वंचित असणारा आपला समाज आता प्रगतीपथावर जात असताना विद्यार्थ्यांनी शैक्षणिकदृष्ट्या सक्षम होऊन आपल्यासह समाजाचे नाव उज्वल करावे असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आणि भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भिमराव आंबेडकर यांनी पेण येथे केले.
भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडी पेण तालुका यांच्यावतीने आज माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ महात्मा गांधी वाचनालय सभागृहात करण्यात आला.या कार्यक्रमाला संस्थेचे कार्याध्यक्ष भिमराव आंबेडकर, राष्ट्रीय सचिव भिकाजी कांबळे, प्रदेश कोषाध्यक्ष प्रशांत गडकरी, वंचित जिल्हाध्यक्ष दिपक गायकवाड, पेण तालुकाध्यक्ष सुनील धामणकर, बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत सोनवणे, सुशिल वाघमारे, प्रकाश सोनावणे, संतोष जाधव, किशोर वाघमारे, मंगेश कांबळे आदिंसह महिला आघाडीच्या पदाधिकारी तसेच ज्येष्ठ बौद्धाचार्य, समता सैनिक दलाचे पदाधिकारी, विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ते अधिक म्हणाले की रायगड जिल्हा हा क्रांतीचा जिल्हा आहे.येथे आंबेडकरी चळवळीचे काम चांगले आहे.विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत सुद्धा तितकेच महत्त्व दिले पाहिजे येणाऱ्या काळात संघटन अधिक मजबूत करून बौद्ध महासभा आणि वंचित एक दिलाने काम करतील अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.तर आपल्या कार्यकर्त्यांनी धार्मिक संस्थेच्या माध्यमातून वंचितचे राष्ट्रीय नेते ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर कायम राहून आंबेडकरी घराण्याचे हात मजबूत करावे तसेच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेत त्याची सुरुवात पेण पासून झाली आहे.संस्थेचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत सोनवणे आणि वंचितचे तालुकाध्यक्ष सुनील धामणकर यांचे काम अतिशय वाखण्याजोगी आहे हाच आदर्श जिल्ह्याने घ्यावा असे आवाहन संस्थेचे राष्ट्रीय सचिव भिकाजी कांबळे यांनी केले आहे. तालुक्यातील दहावी, बारावी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारामुळे आता आमची जबाबदारी वाढली असून येणाऱ्या काळात अशीच संधी विद्यार्थ्यांनी आम्हाला वारंवार द्यावी असे वक्तव्य वंचितचे तालुकाध्यक्ष सुनील धामणकर यांनी केले.यावेळी तालुक्यातील असंख्य गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच विविध सामाजिक कार्य करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला.तर यावेळी पेण मध्ये आलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नातू भीमराव आंबेडकर यांचे शहरासह तालुक्याच्या विविध गावांमधून आलेल्या समाज बांधवांकडून स्वागत करण्यात आले.

Be First to Comment