
पनवेल बस आगार नूतनीकरणाच्या कामाला तातडीने सुरुवात करा- आमदार प्रशांत ठाकूर यांची औचित्याच्या मुद्याद्वारे पुनर्मागणी
पनवेल (प्रतिनिधी) पनवेल बस आगाराच्या नुतणीकरणासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी आंदोलन करण्यापासून ते शासन दरबारी सातत्यपूर्ण पाठपुरावा कायम ठेवला आहे, त्यानुसार पुन्हा एकदा त्यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा विधानसभेत मांडत शासनाचे लक्ष वेधून प्रवाशांना न्याय देण्याची मागणी केली. पनवेल बस आगार नूतनीकरणाच्या कामाला तातडीने सुरुवात करा, अशी जोरदार पुनर्मागणी त्यांनी आज (दि. ०२ जुलै) औचित्याच्या मुद्याद्वारे पुन्हा एकदा केली.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहात बोलताना पोटतिडकीने पनवेल बस आगाराच्या कामाचा विषय मांडताना प्रवाशांच्या भावनाही व्यक्त केल्या. राज्य परिवहन महामंडळाच्या पनवेल आगाराच्या नूतनीकरण अर्थात बसपोर्ट कामाला सन २०१८ साली शुभारंभ करण्यात आला. “बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा” या तत्वावर असलेले या बसपोर्टच्या कामाला बराच कालावधी होऊनसुद्धा सुरुवात झाली नाही. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची विघ्न सातत्याने या कामामध्ये येत आहेत. कंत्राटदाराने अजूनही या कामाला सुरुवात केली नाही आणि त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. प्रवाशांना सुविधांच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आणि वर्षानुवर्षे याचा पाठपुरावा करून देखील यात फरक पडत नाही. या संदर्भात राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या पनवेल बस आगाराला भेट दिली होती, यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देशही दिले होते मात्र अजूनही या कामाला सुरुवात झाली नाही, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहात नमूद केले. प्रवाशांच्या दृष्टिकोनातून या पनवेल बस आगाराच्या नूतनीकरण कामाला तातडीने सुरुवात करण्याची गरज असल्याचे अधोरेखित करत तशी कार्यवाही तात्काळ व्हावी, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी शासनाकडे औचित्याच्या मुद्यातून केली.
पनवेल येथील अतिशय महत्त्वाचे मानले जाणारे राज्य परिवहन महामंडळाच्या बस आगाराच्या नूतनीकरणाच्या कामाला मंजूरी मिळून बराच कालावधी होऊनसुद्धा कामाला सुरूवात झाली नाही. अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या या बस आगारात अनेक प्राथमिक पायाभूत सुविधांअभावी बस चालक, प्रवासी तसेच नागरिकांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. सदर बस आगाराच्या नूतनीकरणाच्या कामाबाबत वारंवार शासन दरबारी पाठपुरावा करूनसुद्धा संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे बस आगाराच्या नूतनीकरणाच्या कामाला विलंब झाला. त्यामुळे बस आगारातील अनेक गैरसोयींमुळे नागरिक व प्रवाशांमध्ये पसरलेल्या चिडीच्या व असंतोषाच्या भावना शासन दरबारी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मागणी आणि लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून यापूर्वीही मांडली होती. पनवेल बस आगाराचे काम लवकरात लवकर पूर्ण झाले पाहिजे हि आमदार प्रशांत ठाकूर व प्रवाशांची अपेक्षा आहे, आणि त्या दृष्टीकोनातून तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन तत्कालीन मंत्री दादाजी भुसे यांनी २०२३ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिले होते. तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊनही या संदर्भात आमदार प्रशांत प्रशांत ठाकूर यांचा पाठपुरावा कायम राहिला आहे.
पनवेल परिसर झपाट्याने विकसित होत असताना नागरीकरणामध्ये मोठी वाढ पाहता पनवेलचे बस स्थानक सर्व सुविधायुक्त असावे, अशी मागणी होती. या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी बस आगारात आंदोलनही केले होते. त्यानंतर कायम पाठपुरावा केला. आता पुन्हा एकदा हा प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर यांनी ऐरणीवर आणत मार्गी लावण्यासाठी शासनाचे लक्ष केंद्रित केले. आमदार ठाकूर यांनी प्रवाशांना होणाऱ्या अडचणी मांडल्या आणि शासनाचे लक्ष या प्रलंबित प्रकल्पाकडे वेधले. पनवेल परिसर झपाट्याने विकसित होत असून, नागरिक आणि प्रवाशांसाठी सुविधा असलेले आधुनिक बस स्थानक ही काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

Be First to Comment