
“आम्ही या बाळासाठी मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या काहीही करू शकत नाही.” ; जन्मदात्यांनी बाळाजवळ ठेवली भावनिक चिठ्ठी
पनवेल दि.२८ (वार्ताहर) : पनवेल शहरातील तक्का परिसरात आज सकाळी एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली. फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले असून, त्यासोबत सापडलेल्या एका इंग्रजीतील भावनिक चिठ्ठीने संपूर्ण शहरात खळबळ उडवून दिली आहे. आपल्या बाळाला सांभाळण्यास असमर्थ असल्याचे या चिठ्ठीतून पालकांनी म्हटले आहे.
आज सकाळी तक्का परिसरातील नागरिकांना एका बास्केटमधून बाळाच्या रडण्याचा आवाज आला. त्यांनी आवाजाच्या दिशेने जाऊन पाहिले असता, त्यांना बास्केटमध्ये एक नवजात बाळ दिसले. नागरिकांनी क्षणाचाही विलंब न लावता तात्काळ पनवेल शहर पोलिसांना या घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बाळाला ताब्यात घेऊन उपचारासाठी पनवेलच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. सध्या बाळाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
बास्केटमध्ये बाळासोबत एक इंग्रजीत लिहिलेली चिठ्ठी सापडली, ज्यामुळे या घटनेला एक भावनिक वळण मिळाले आहे. या चिठ्ठीत लिहिले आहे की…..
“प्रिय सर/मॅडम, आम्हाला हे करावे लागले यासाठी आम्ही मनापासून माफी मागतो. आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. आम्ही या बाळासाठी मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या काहीही करू शकत नाही. कृपया या प्रकरणात कोणालाही गुंतवू नका किंवा प्रकरण वाढवू नका. आम्हाला जे काही सहन करावे लागत आहे, ते या बाळाच्या नशिबी येऊ नये अशी आमची इच्छा आहे. आम्ही तुम्हाला विनंती करतो की तिची काळजी घ्या. आशा आहे की एक दिवस आम्ही तिला परत घेऊ.” कारण आम्ही तिच्या जवळच आहोत. आम्ही दिलगीरी आहोत.”
या चिठ्ठीतून बाळाच्या पालकांची बिकट मानसिक आणि आर्थिक परिस्थिती समोर आली आहे. मात्र, अशा प्रकारे बाळाला सोडून देणे हा गंभीर गुन्हा असल्याने, पनवेल शहर पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बाळाच्या पालकांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू करण्यात आला असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Be First to Comment