
1900 स्वच्छता विषयक कर्मचारी व कुटुंबीयांना मिळणार लाभ ;
पाच विमा कंपन्यांकडून मागवले कोटेशन
पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महानगरपालिकेमध्ये साफसफाई करणाऱ्या स्वच्छता दूतांना लवकरच विमा कवच मिळणार आहे. या अगोदर संबंधितांना
ई एस आय सी चा लाभ मिळत होता. मात्र त्यांच्या कामाचा मोबदला 21 हजाराहून अधिक झाल्यामुळे या योजनेच्या ते कक्षेबाहेर गेलेले आहेत. पार्श्वभूमीवर मनपा क्षेत्रात काम करणाऱ्या 1900 स्वच्छता विषयक कर्मचाऱ्यांना विमा कवच मिळावे या उद्देशाने आझाद कामगार संघटनेने मागणी लावून धरली होती. त्यानुसार पनवेल महापालिकेने आणि संबंधित एजन्सींकडून जवळपास पाच विमा कंपनीकडून कोटेशन मागवले आहे. लवकरच स्वच्छता दूत आणि त्यांच्या कुटुंबीयांना विमा मिळणार आहे.
पनवेल महानगरपालिकेच्या 110 किलोमीटर क्षेत्रफळामध्ये नगरपरिषद हद्द, सिडको वसाहती आणि 29 गावांचा समावेश आहे, या ठिकाणच्या रस्त्यावरील साफसफाई करणे. त्याचबरोबर इतर स्वच्छता विषयक काम स्वच्छता दूत करतात. पूर्वी सिडको कडे ही सेवा होती. पनवेल मनपाची स्थापना झाल्यानंतर हे काम सिडको ने मनपाकडे वर्ग केले. त्याचबरोबर महामंडळाकडून स्वच्छता विषयक कामगारही घेण्यात आले. त्यांच्या न्याय हक्कासाठी आझाद कामगार संघटनेने सुरुवातीपासून लढा दिला. सध्या महापालिका प्रशासनाकडून स्वच्छता दूतांना बेसिक 11 500 इतका मोबदला दिला जात आहे. त्याचबरोबर विशेष भत्ते 8610 आणि एचआरए 1005 असे एकूण 21,115 वेतन दिले जात आहे. नियमानुसार 21 हजाराहून अधिक कामाचा मोबदला मिळत असेल तर संबंधितांना ई एस आयसीच्या अखत्यारीत येत नाहीत. त्यामुळे संबंधितांना ही योजना लागू होत नाही. पनवेलचे आरोग्य आणि स्वच्छता राखणाऱ्या या दूतांना आरोग्य विमा मिळावा या उद्देशाने आझाद कामगार संघटना गेल्या दोन वर्षांपासून पनवेल महानगरपालिकेकडे पाठपुरावा करत आहे. त्यानुसार संबंधित एजन्सीला प्रशासनाने आदेश दिलेले आहेत. त्याचबरोबर महानगरपालिकेकडून चाचपणी सुरू झाली आहे. त्यानुसार पाच विमा कंपन्यांकडून कोटेशन मागवण्यात आले आहे. त्याप्रमाणे लवकरच याबाबत अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे.
पाच लाख रुपये विमा कवच ची मागणी!
आझाद कामगार संघटनेच्या वतीने पनवेल महानगरपालिकेत काम करणाऱ्या स्वच्छता दूतांसाठी एकूण पाच लाख रुपये विमा कवच देण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामध्ये संबंधित स्वच्छता विषयक कर्मचारी, पत्नी, दोन मुले आणि आई-वडिलांचा समावेश करावा अशा प्रकारचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे. दरम्यान या संदर्भात महापालिका प्रशासनाने संबंधित ठेकेदारांना निर्देश दिले असून मनपा ने सुद्धा याबाबत विशेष लक्ष घातले आहे. दोन लाख रुपयांचा विमा स्वच्छता दूतांना देण्यासंदर्भात हालचाली सुरू झालेल्या आहेत.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील आरोग्य अबाधित ठेवणाऱ्या स्वच्छता दूतांना विमा कवच मिळावा यासाठी आझाद कामगार संघटना अखंडितपणे पाठपुरावा करत आहे. त्यांचे वेतन 21 हजाराहून अधिक झाल्याने ते ई एस आय सी च्या कक्षेत येत नाहीत. मात्र स्वच्छता विषय कर्मचारी ज्या ठिकाणी काम करतात तेथे त्यांचे आरोग्य सुरक्षित राहणे आवश्यक आहे. यासाठी त्यांना विमा सुविधा मिळावे अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली. याबाबत पनवेल महापालिकेने सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. लवकरच याची अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे.
महादेव वाघमारे
अध्यक्ष आझाद कामगार संघटना

Be First to Comment