
देश घडविण्यासाठी इतिहास, संस्कृती आणि महापुरुषांचे कार्य समजून घेणे आवश्यक – माजी आमदार मधू चव्हाण
पनवेल (प्रतिनिधी) देश घडवायचा असेल तर देशातील नागरिकांनी आपल्या इतिहासाची, संस्कृतीची आणि महान व्यक्तींच्या कार्याची जाणीव ठेवली पाहिजे, असे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार मधु चव्हाण यांनी आज येथे केले.
भारतीय जनता पक्षाकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त २१ मे ते ३१ मे या कालावधीत “सामाजिक पर्व” म्हणून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून अहिल्यादेवींच्या समाज सुधारणेतील योगदान, प्रशासनातील पारदर्शकता, महिला सक्षमीकरणासाठीचा दृष्टिकोन आणि सांस्कृतिक वारसा यांचा नव्या पिढीला परिचय करून देण्याचा भाजपचा प्रयत्न असून त्या अनुषंगाने उत्तर रायगड जिल्हा भाजपच्यावतीने जिल्हा व तालुका मंडल स्तरावर विविध कर्यक्रमांचे आयोजन करून “सामाजिक पर्व” मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या ‘सामाजिक पर्व’च्या नियोजनासंदर्भात उत्तर रायगड जिल्हा भाजपची कार्यशाळा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत मार्केट यार्ड मधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात पार पडली. त्यावेळी प्रमुख वक्ता म्हणून मार्गदर्शन करताना बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर भाजपचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, माजी महापौर कविता चौतमोल, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, माजी नगरसेवक अनिल भगत, गणेश कडू, जिल्हा सरचिटणीस ऍड. प्रकाश बिनेदार, दीपक बेहेरे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा अश्विनी पाटील, सिद्धार्थ बांठिया, ज्येष्ठ नेते सी.सी. भगत, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर आदी उपस्थित होते. या कार्यशाळेला स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी, विविध सेल, मोर्चा, प्रकोष्ठचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची माहिती व कार्य तळागाळात पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून हे सामाजिक पर्व त्यांच्या जीवनावर आधारित आयोजित करण्यात आले असून त्यामध्ये जिल्हास्तरावर युवक भव्य मेळावा. वेशभूषा स्पर्धा, महिला मेळावा, महिला मॅरेथॉन, बुद्धीजीवी संमेलन, नाटक, पथनाट्य, चित्ररथ, प्रदर्शनी, रांगोळी स्पर्धा, तर मंडल स्तरावर मंदिर घाट व मठ स्वच्छता, महाआरती, शंखनाद, वेद पठण, भक्तीगीत, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, तसेच बूथ स्तरावर स्टिकर व पत्रक वाटप अशी कार्यक्रमे होणार आहेत.
श्री. चव्हाण यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “अहिल्यादेवी होळकर हे भारतीय इतिहासातील एक अद्वितीय व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी आपल्या कारकीर्दीत आदर्श शासन, धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन आणि लोककल्याणाचे अद्वितीय उदाहरण सादर केले. हे ‘सामाजिक पर्व’ म्हणजे त्यांना दिलेली श्रद्धांजलीच आहे.या कार्यक्रमांमुळे तरुण पिढीला इतिहासाशी नातं जोडून सामाजिक भान निर्माण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त करताना महापुरुषांचा इतिहास कायम स्मरणात रहावे आणि युवा पिढीला प्रेरणा मिळावी, यासाठी असे उपक्रमे महत्वपूर्ण असल्याचेही त्यांनी नोंदीत केले. महापुरुषांना एकाच समाजाने मानावे हा समज दूर झाला पाहिजे त्यासाठी प्रत्येक महापुरुषांचा प्रत्येक समाजाने जयंती व इतर कार्यक्रम साजरे केले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. मते मिळावी म्हणून भाजप कार्यक्रम करत नाही तर तळागाळात सर्व घटकात आपल्या देशाचा गौरवशाही इतिहास पोहोचला पाहिजे, यासाठी सतत उपक्रम राबविले जातात, असेही त्यांनी अधोरेखित केले. यावेळी प्रास्ताविकातून जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी सामाजिक पर्वाची तसेच या उपक्रमाच्या संदर्भात नियोजन कमिटीची जबाबदारीची माहिती दिली.
या कार्यशाळेच्या निमित्ताने यावेळी उत्तर जिल्हा भाजपच्या अध्यक्षपदी पुनर्निवड झाल्याबद्दल अविनाश कोळी, तसेच जिल्ह्यातील तालुका मंडल अध्यक्ष प्रवीण पाटील, भूपेंद्र पाटील, सुमित झुंझारराव, दशरथ म्हात्रे, अमर पाटील, विकास घरत, राजेश लाड, प्रसाद भोईर, प्रवीण मोरे, रुपेश धुमाळ, मंगेश वाकडीकर, धनेश गावंड, राहुल जाधव, दिनेश खानावकर, दिनेश रसाळ, नरेश मसणे, सनी यादव यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.




Be First to Comment