Press "Enter" to skip to content

धाटाव जैनवाडी परिसरात कुंडलिक अतिक्रमणाचा विळखा; पूरस्थितीचा धोका,काँग्रेस नेते मारुती फाटक आक्रमक

रोहा : प्रतिनिधी

धाटाव जैनवाडीच्या उजव्या बाजूस कुंडलिक नदी पात्रात बेकायदेशीररित्या अतिक्रमण करण्यात आल्याने परिसरात संभाव्य पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या प्रकरणात सहा लोकांनी अनधिकृत बांधकाम केल्याचे उघडकीस आले असून, पाटबंधारे विभागाने त्यांच्यावर नोटीस बजावली आहे.

या नोटीसींपैकी तीन लोकांनी ती स्वीकारली आहे, तर श्रीवास्तव, महादेव माडेकर आणि नवनाथ धाबेकर यांनी नोटीस घेतलीसुद्धा नाही, उलट ती फाट्यावर मारून दुर्लक्ष केल्याचे समजते. याबाबत सहाय्यक कार्यकारी अभियंता, कोलाड पाटबंधारे विभाग यांनी बांधकाम हटवण्यासाठी नोटीस पाठवली होती. या नोटीसमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, संबंधित अतिक्रमण हे कुंडलिक नदीच्या निळी व लाल पूररेषेच्या आत येते, आणि त्यामुळे सदर बांधकाम मुळ पूरपरिस्थिती निर्माण करू शकते.

यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अतिक्रमणामुळे नदीपात्रातील नैसर्गिक प्रवाहात अडथळा निर्माण होऊन परिसरात पावसाळ्यात पूरपरिस्थिती ओढवू शकते, असा गंभीर इशारा स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते देत आहेत.

याच पार्श्वभूमीवर काँग्रेस पार्टीचे पर्यावरण विभागाचे तालुका अध्यक्ष मारुती फाटक यांनी पाटबंधारे विभागाशी संपर्क साधत तातडीने ही अतिक्रमण हटवण्याची मागणी केली आहे. त्यांनी विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर करताना प्रशासनाच्या हलगर्जीवर टीका केली. “नदी पात्रात अतिक्रमण होऊनही प्रशासन डोळ्यांदेखत गप्प बसले आहे. उद्या मोठा पूर आला आणि जिवितहानी झाली, तर याला जबाबदार कोण? आज उपाय केले नाहीत तर उद्या संकट टाळता येणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी प्रशासनाला जागं करण्याचा प्रयत्न केला.

मारुती फाटक यांचे म्हणणे आहे की, कुंडलिक नदीच्या नैसर्गिक वहन मार्गात कोणतेही बांधकाम झाल्यास पाणी साचण्याचा धोका वाढतो. अशा प्रकारची अतिक्रमणे केवळ पर्यावरणाची हानी करत नाहीत, तर स्थानिक लोकांच्या जिवावर बेतू शकतात. त्यामुळे तातडीने कारवाई करत हे बांधकाम हटवावे, अन्यथा आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.

स्थानिक नागरिकांनीही मारुती फाटक यांच्या या भूमिकेचे स्वागत करत प्रशासनाकडून त्वरित कारवाईची मागणी केली आहे. प्रशासन आता या प्रकरणात कोणती पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.