Press "Enter" to skip to content

नेरळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत पर्यटक पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेत पडली भर

नवी मुंबई मधील दिघा गावातील टुरिस्ट व्यवसाय करणारे अजय रावत – 28 हे आपल्या चार मित्रांसह दि. 11 मे 2025 रोजी दुपारी 3.00 वाजताच्या सुमारास कर्जत तालुक्यामधील नेरळ पोलीस स्टेशन हद्दीतील पाषाणे गावातल्या लघु पाटबंधारे खात्याच्या धरणामध्ये मौज मजा करण्यासाठी आले होते. त्यांना धरणाच्या तळ्याचा अंदाज आला नाही, त्यामुळे पाण्यात बुडून त्यांचा सुमारे 5.00 वाजताच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

त्यांच्या मित्रमंडळीनी शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र अपयश आल्याने त्यांनी पाषाणे गावातील गावकऱ्यांना याबाबतची माहिती दिली आणि नेरळ पोलीस यंत्रणेशी संपर्क साधला. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच नेरळ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांनी अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या हेल्प फाउंडेशनच्या गुरुनाथ साठेलकर यांना संपर्क केला आणि त्या ठिकाणी मदतसाठी पाचारण केले. तोवर तिन्हीसांज झाली होती त्या कारणे अंधारात शोधकार्य करणे जिकिरीचे असल्याने हेल्प फाउंडेशनची टीम दुसऱ्या दिवशी अर्थात आज सकाळी त्या ठिकाणी दाखल झाली आणि त्यांनी धरणात बुडालेल्या अजय रावत यांचे शव बऱ्याच प्रयत्नांती बाहेर काढले. नेरळ पोलीस स्टेशनचा अधिकारी वर्ग आणि अजय रावत यांचे नातेवाईक घटनास्थळी होते. स्थानिक नागरिकांनी देखील यावेळी मोलाची मदत केली. या घटनेची नोंद अपघाती मृत्यू अशी नेरळ पोलीस स्टेशनमध्ये झाली आहे.

कोणत्याही धरण तलाव किंवा नदीमध्ये कोणाला पोहता येत असेल अथवा नसेल तरी देखील स्थानिक माहीतगारांच्या सल्ल्याशिवाय पाण्यामध्ये उतरू नये, त्यांच्या जीविताला धोका संभवतो, असा इशारा हेल्प फाउंडेशनच्या वतीने पर्यटकांना देण्यात आला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.