
पेण, ता. 9 (वार्ताहर) : पेण शहराची वाढती लोकसंख्या पाहता येथे येणाऱ्या जेएसडब्ल्यू कंपनीच्या इलेक्ट्रिक बसेस शहरातील काही भागांमध्ये धावत असून त्या अनाधिकृतपणे कुठेही थांबा तसेच करून पार्किंग करून उभ्या राहत असल्याने यामुळे छोटे- मोठे अपघात होण्याची दाट शक्यता असल्याने जेएसडब्ल्यू कंपनीच्या बसेस ना थांबा देऊ नये असे शिवसेना ठाकरे गटाचे जेष्ठ शिवसैनिक तथा बृहन्मुंबई निवृत्त सहाय्यक अभियंता जीवन पाटील यांनी मुख्याधिकारी तसेच पोलीस निरीक्षक यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
जेएसडब्ल्यू कंपनीच्या येणाऱ्या इलेक्ट्रिक आणि भल्या मोठ्या बसेस पाहता पेण शहरात अनाधिकृतपणे कुठेही थांबत असून पार्किंग करत आहेत.एकीकडे शहरांमध्ये नागरिकांची रहदारी वाढत असताना सदर बसेसचा त्रास पादचाऱ्यांसह शहरातील नागरिकांना तसेच विद्यार्थी, कामगार वर्गाला बसत असून कंपनीच्या कर्मचाऱ्यांना बस मध्ये चढ उतार करण्यासाठी बसेसचे ड्रायव्हर मोक्याच्या ठिकाणी मध्येच थांबवतात त्यामुळे या इलेक्ट्रीकल बसेसचा आवाज येत नसल्याने रस्त्यावरील पादचाऱ्यांना बस आल्याची जाणीव सुद्धा होत नाही.त्यामुळे येथे छोटे- मोठे अपघात होऊन पादचारी व दोन चाकी वाहन चालकांना दुखापत होण्याचे प्रकार सातत्याने वाढत आहेत.त्यामुळे या बसेसना शहरात थांबा अथवा पार्किंग व्यवस्था न देता त्यांनी पार्किंग व्यवस्था शहराच्या बाहेर करावीत असे ठाकरे गटाचे जेष्ठ शिवसैनिक जीवन पाटील यांनी पेण नगरपालिका मुख्याधिकारी आणि पेण पोलीस निरीक्षक यांना निवेदनद्वारे मागणी केली आहे.





Be First to Comment