Press "Enter" to skip to content

१ हजार वर्षांपूर्वीच्या सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे होणार दुर्मिळ दर्शन !

२३ देशांतील लोकसहभाग ; शंखनाद महोत्सव हा आध्यात्मिक पर्यटनाचा नवा अध्याय! – सनातन संस्था

पणजी (गोवा) – १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत सनातन संस्थेच्या वतीने फर्मागुडी, फोंडा येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर होणारा ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ हा केवळ धार्मिक नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील आध्यात्मिक जागृतीचा महोत्सव ठरणार आहे. २३ देशांतील प्रतिष्ठित मान्यवर, विविध संप्रदायांचे संत-महंत, मंदिरांचे विश्वस्त आणि २५ हजारांहून अधिक साधक, भाविक यांचा सहभाग अन् यज्ञयागामुळे हा महोत्सव काशी, उज्जैन, अयोध्येप्रमाणे आध्यात्मिक पर्यटनाचा नवा अध्याय असणार आहे, त्यामुळे विकासालाही गती मिळणार आहे, अशी माहिती सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी आज पणजी येथील पत्रकार परिषदेत दिली.

पणजी येथील ‘हॉटेल मनोशांती’मध्ये आयोजित पत्रकार परिषदेला आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री. संतोष घोडगे, सांस्कृतिक न्यासाचे श्री. जयंत मिरिंगकर, आंतरराष्ट्रीय बजरंग दलाचे श्री. नितीन फळदेसाई, कुंडई तपोभूमी येथील पद्मनाभ संप्रदायाचे श्री. सुजन नाईक, ब्राह्मण महासंघाचे श्री. राज शर्मा, जगद्गुरु स्वामी नरेंद्राचार्य महाराजांचे अनुयायी श्री. अनिल नाईक, गोमंतक मंदिर महासंघाचे श्री. जयेश थळी आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. युवराज गावकर उपस्थित होते.

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त १ हजार वर्षांपूर्वीच्या सोरटी सोमनाथ जोतिर्लिंगाचे दर्शन घेण्याची दुर्मिळ संधी सर्वांना मिळणार आहे. हे शिवलिंग मूर्तीभंजक गझनी याने तोडले होते आणि नंतर त्याचा पुढे अग्निहोत्र संप्रदायाच्या साधकांनी सांभाळ केला. आता ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे संस्थापक गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्या आशीर्वादाने आता हे शिवलिंग महोत्सवाच्या ठिकाणी १७ ते १९ मे या कालावधीत लोकांच्या दर्शनासाठी ठेवले जाणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळतील शस्त्रात्रांचे प्रदर्शनही लावण्यात येणार आहे.

काशी विश्वनाथ कॉरिडॉर आणि अयोध्येतील श्रीराम मंदिरामुळे उत्तर प्रदेशला दरवर्षी सुमारे २२ हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे पर्यटन क्षेत्रात ७ व्या क्रमांकावर असलेले उत्तर प्रदेश आता अग्रस्थानावर पोहोचले आहे. यावरून केवळ आध्यात्मिक पर्यटनामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठा चालना कसा मिळू शकतो, हे स्पष्ट होते. पूर्वी ‘दक्षिण काशी’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या गोव्यालाही असा लाभ निश्चितच मिळू शकतो. मंदिरे किंवा धार्मिक कार्यांना अंधश्रद्धा समजणार्‍यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, मंदिरे म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेचा आत्मा आणि कणा आहेत. आज जागतिक स्तरावरील औद्योगिक शहरे लयाला जात असताना, उज्जैन, तिरुपती, रामेश्वरम्, काशी यांसारखी तीर्थक्षेत्रे असलेली शहरे हजारो वर्षांपासून टिकून आहेत, तसाच त्यांच्या परिसराचाही विकास झाला आहे.

*शंखनाद महोत्सवामुळे पर्यटनात वाढ* : या तीन दिवसीय महोत्सवासाठी देशविदेशातून २५ हजारांहून अधिक भाविक, साधक, प्रतिष्ठित लोक गोव्यात दाखल होणार आहेत. हे सर्वजण येथे ३ ते ५ दिवस निवास करतील, प्रवास करतील, स्थानिक वाहने वापरतील, मंदिरांना भेट देतील, हॉटेल, बाजार, रेस्टॉरंट्स, पर्यटन स्थळे यांचा लाभ घेतील. यामुळे सर्व स्थानिक व्यवसाय आणि रोजगार यांना चालना मिळेल. या सर्व प्रक्रियेतून जो जीएसटी, तसेच सेवा कर भरला जाईल त्यामधून राज्य सरकारलाही मोठे उत्पन्न मिळणार आहे.

*हा महोत्सव उज्ज्वल अध्यात्मिक भविष्यासाठीचा शंखनाद* : अन्य व्यवसायाच्या तुलनेत आध्यात्मिक पर्यटन हे एक सुरक्षित आणि शाश्वत विकासासोबतच समाजातील नैतिक मूल्यांची पुनर्स्थापना करणारे आहे. या महोत्सवामार्फत मंदिर परंपरा, लोककला, सांस्कृतिक ओळख, तसेच साधना, आध्यात्मिक विचारधारा आणि राष्ट्रनिष्ठ मूल्यांचा जागर करण्यात येणार आहे. एकूणच ‘शंखनाद महोत्सव’ हा उज्ज्वल आध्यात्मिक भविष्यासाठीचा शंखनाद आहे.

या महोत्सवाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी SanatanRashtraShankhnad.in या संकेतस्थळाला भेट द्या !

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.