Press "Enter" to skip to content

रायगड अलिबाग येथे जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक संपन्न

खरीप हंगामात कृषी विभागाने शेतकऱ्यांना
खते व बियाणांचा पुरवठा सुरळीत होण्याची दक्षता घ्यावी : रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे

नागोठणे प्रतिनिधी (याकूब सय्यद)

आगामी खरीप हंगाम लक्षात घेता बियाणे, खते, कीटकनाशके आदी निविष्ठा सर्वत्र उपलब्ध असण्याच्या दृष्टीने परिपूर्ण नियोजन करा तसेच कोणत्याही परिस्थितीत खते, बियाणे यांची टंचाई भासणार नाही याबाबतची दक्षता घ्यावी, असे निर्देश रायगड जिल्हाधिकारी श्री. किशन जावळे यांनी दिले.

रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित खरीप हंगाम आढावा बैठकीत जिल्हाधिकारी श्री.किशन जावळे बोलत होते. बैठकीला खा.धैर्यशील पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी जिल्हा सत्यजित बढे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वंदना शिंदे आदी उपस्थित होते.
खरीप हंगामामध्ये बियाणे आणि खतांचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर जाणवतो. त्यामुळे या दोन्हीचे नियोजन आवश्यक आहे. पिक पेरणी क्षेत्राला आवश्यक असणाऱ्या बियाण्यांची उपलब्धता होण्यासाठी कृषी विभागाचे नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे. गुणनियंत्रण विभागाने दक्ष राहून बोगस बियाणे, खतांची विक्री होणार नाही याबाबतची दक्षता घ्यावी अशा सूचना रायगड जिल्हाधिकारी श्री. किशन जावळे त्यांनी दिल्या. खरीप पीक हंगामासाठी शेतकऱ्यांना कर्जपुरवठा सुरळीत झाला पाहिजे. एकही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. पीक कर्जाचे देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण करा तसेच शेतीपंपासाठी आवश्यक त्या प्रमाणात वीजपुरवठा होईल यादृष्टीने विद्युत विभागाने नियोजन करावे. शेतकऱ्यांना पिक विम्याची समस्या जाणवते. पिक विमा योजनेचा शेतकऱ्यांना फायदा होण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने लक्ष देण्याची गरज आहे. यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

रायगड जिल्हाधिकारी श्री. किशन जावळे यांनी जिल्ह्यातील सर्व तालुका कृषी अधिकारी यांनी जिल्ह्यातील फार्म हाऊस धारकांना किमान एक पीक लागवड करण्याचे आवाहन करावे व त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईल याची दक्षता घ्यावी असे सांगितले. तसेच प्रत्येक कृषी सेवकाला गाव निवडून तेथील पीक क्षेत्र दुप्पट करण्याचे उद्दिष्ट देण्यात यावे असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. शेतकऱ्यांना नवीन नवीन पिके घेण्यासाठी प्रोत्साहन देण्यात यावे. हळदी व आले पीक प्रात्यक्षिक घेण्यात यावे तसेच पेण मध्ये प्रायोगिक तत्वावर आले पीक घेण्यात यावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. हळदीचे क्षेत्र वाढविण्यासाठी सामूहिक प्रयत्न करावेत अशा सूचनाही रायगड जिल्हाधिकारी श्री. किसन जावळे यांनी दिल्या.
खा.धैर्यशील पाटील यांनी कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सर्व सेवा, सवलती त्यांच्या पर्यंत वेळेत पोहोचव्यात. निकृष्ट दर्जाचे खत पुरवठा करणाऱ्या कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश खा. धैर्यशील पाटील यांनी यावेळी दिले.

बैठकीच्या सुरूवातीला रायगड जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वंदना शिंदे यांनी खरीप हंगामपूर्व तयारी व नियोजनाचा आढावा सादर केला. यावेळी रायगड जिल्ह्यातील नाविन्यपूर्ण उपक्रम राबविलेल्या शेतकऱ्यांचा मान्यवरांचा हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या विविध माहितीपुस्तिकांचे मान्यवरांच्या हस्ते विमोचनही करण्यात आले. बैठकीस सर्व संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

असे आहे खरीप हंगाम २०२५ चे नियोजन

खरीप हंगामातील भातपिकासाठी ८१ हजार ३३५ हेक्टर क्षेत्रावर नियोजन
भात पिकासाठी ०२ हजार ९९५ किलोग्रॅम/हेक्टर उत्पादनाचे लक्ष
खरीप हंगामातील नाचणी पिकासाठी ०२ हजार ५५० हेक्टर क्षेत्रावर नियोजन
नाचणी पिकासाठी ०१ हजार २६० किलोग्रॅम/हेक्टर उत्पादनाचे लक्ष,

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.