
उलवे, ता. ८ : दिवंगत जनार्दन आत्माराम भगत साहेब हे दूरदृष्ट्रीचे नेते होते, त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत एक वर्षाचा कारावास भोगला. त्यांना शिक्षणाचे महत्त्व समजले होते, त्यांच्या घराच्या ओटीवर जेव्हा मी बसत असे तेव्हा ते मला शिकून मोठा हो, असे सांगत होते. त्यामुळेच मी पदवीधर झालो आणि अकराशे रुपयांच्या पगारावर नोकरीवरही लागलो, पण धडपड्या स्वभावामुळे आणि रामशेठ ठाकूर यांच्या पाठिंब्यामुळे मी पुढची राजकारणातील वाटचाल करू शकलो. जिल्हा परिषद निवडणूक जिंकलो आणि महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवण्याचे महत्त्ववूर्ण काम केले, हे मी अभिमानाने सांगतो, असे आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्रशेठ घरत म्हणाले. ते ज. आ. भगत यांच्या ३७ व्या पुण्यतिथीनिमित्त बोलत होते.
महेंद्रशेठ घरत यांनी बुधवारी सकाळी ९ वाजता दिवंगत ज. आ. भगत यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना अभिवादन केले. त्यानंतर सायंकाळी पुण्यतिथी आयोजित कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, भगत साहेबांनी सामाजिक कामांचा पाया रचला तर रामशेठ ठाकूर यांनी कळस बांधला, जावई कसा असावा तर रामशेठ ठाकूर यांच्यासारखा, कारण त्यांनी दोन मिनिटांत शेलघर या त्यांची सासुरवाडी असलेल्या गावात होणाऱ्या साई मंदिराला अडीच कोटी रुपयांची देणगी दिलीय. भगत साहेबांनी माणसे पेरली, गव्हाण परिसराच्या विकासात रामशेठ ठाकूर यांचा मोलाचा वाटा आहे. मै जहाँ खडा रहता हूँ, लाईन वहासे शुरू होती है, हे रामशेठ ठाकूर यांनी दाखवून दिले. त्यांनी जिथे हात लावला तिथे सोने झाले, जावई कसा असावा तर रामशेठ यांच्यारखा हे त्यांनी दाखवून दिले. दिबांना सिडकोचे अधिकार घाबरत असत, आता रामशेठना घाबरतात, याचा अनुभव मला आहे. रामशेठ ठाकूर हे रयत शिक्षण संस्थेला देणगी देणारे मोठे देणगीदार आहेत, पण त्यांच्या पावलावर पाऊल टाकून मी आणि शुभांगीताई ‘रयत’च्या दुर्गम भागातील शाळा-महाविद्यालयांना देणगी देतोय, म्हणून शुक्रवारी आमचा देशातील दूरदृष्ट्रीचे नेते शरद पवार साहेब यांच्या हस्ते सातारा येथे सत्कार होणार आहे. शेलघर स्वच्छ, सुंदर ठेवण्याचा मी विडा उचलला आहे. म्हणूनच भगत साहेबांचे शेलघर गाव आदर्श आणि बंगल्यांचे गाव म्हणून राज्यभर नावलौकिक मिळवेल, असा मला विश्वास आहे.

यावेळी माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर, आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत, शकुंतला ठाकूर, वर्षा ठाकूर, जे. एम. म्हात्रे, दिबांचे पुत्र अतुल पाटील, अरुणशेठ भगत, परेश भगत, वाय. टी. देशमुख, भाऊशेठ पाटील, संजय भगत, प्रकाश भगत, अनिल भगत, वसंत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जनार्दन भगत साहेब तालुकास्तरीय स्वच्छ ग्रामपंचायतीचा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार एक लाख रुपये चिंद्रण ग्रामपंचायतीला, दुसरा विचुंबे, तर उत्तेजनारार्थ तुराडे, करंजाडे, गव्हाण ग्रामपंचायतीला मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच विविध गुणवंतांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

Be First to Comment