Press "Enter" to skip to content

स्व. जनार्दन आत्माराम भगत यांच्या पुण्यतिथी निमित्ताने बुधवारी विविध समाजोपयोगी कार्यक्रम 

“स्व. जनार्दन भगत स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार, गुणिजनांचा सन्मान आणि सांस्कृतिक कार्यक्रम

पनवेल(प्रतिनिधी) पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती, कष्टकऱ्यांचे द्रष्ट नेते थोर समाजसुधारक स्व. जनार्दन आत्माराम भगत यांच्या ३७ व्या पुण्यतिथी निमित्ताने बुधवार दिनांक ०७ मे २०२५ रोजी सायंकाळी ०६ वाजता उलवे नोड मध्ये माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध समाजोपयोगी कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये विशेषत्वाने पनवेल तालुकास्तरीय “स्व. जनार्दन भगत स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार स्पर्धा २०२५”चे बक्षिस वितरण तसेच शिक्षण, क्रीडा व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या गुणिजनांचा पारितोषिक सन्मान समारंभ त्याचबरोबरीने “मराठी पाऊल पडते पुढे” या सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमे होणार आहेत.  

            या समारंभाला प्रमुख मान्यवर म्हणून भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती लाभणार असून समारंभ अध्यक्ष जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती असणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, मंडळाचे सचिव परेश ठाकूर, संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे, कार्यकारी मंडळ सदस्य अनिल भगत, प्रकाश भगत, संजय भगत, सभासद वसंत पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. 

      जनार्दन भगत साहेबांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील कार्य अफाट राहिले असून त्यांनी अहोरात्र लोकांची सेवा केली. आयुष्यापेक्षा ध्येय्य मोठे असले पाहिजे, ही शिकवण त्यांनी समाजामध्ये रुजवत फक्त राजकारण नाही तर सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. स्वर्गीय भगतसाहेबांनी अहोरात्र आपला देह ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ या तत्त्वाच्या पूर्ततेसाठी कारणी लावला. तळागाळातल्या लोकांबदल त्यांना विशेष प्रेम होते. दारिद्रय व भूक यांच्याबद्दल अगदी मनापासून तळमळ होती. तळागाळातील समाजाचा उद्धार फक्त शिक्षणामूळेच होऊ शकते हे त्यांनी जाणले होते. आपली दूरदृष्टी, अविश्रांत श्रम, चिकाटी, धडाडी त्याचबरोबर व्यापक समाजहिताची तळमळ ही उदात्त भावना स्व. जनार्दन भगत साहेब यांच्या अंतःकरणात कायम होती. त्याचबरोबर देवदूताची भूमिका सुद्धा पार पाडत त्यांनी समाजाला न्याय दिला आहे. त्यामुळे भगतसाहेबांची कीर्ती अजरामर राहिली आहे. त्यांची जयंती फेब्रुवारी लीप महिन्यामुळे दर चार वर्षांनी असते. त्यावेळी जयंतीनिमित्त राज्यात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तीला त्यांच्या नावे बहुमानाचा पुरस्कार दिला. जातो. तर दर वर्षी पुण्यतिथीलाही सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करत भगतसाहेबांच्या स्मृतीला अभिवादन करत युवा पिढीला प्रेरणा देण्याचे काम केले जाते. त्या अनुषंगाने या कार्यक्रमाचे अनन्य साधारण महत्व असते. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.