
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते जे एम म्हात्रे हे प्रीतम म्हात्रे आणि शेकडो समर्थकांसह करणार ७ मे रोजी भाजपामध्ये प्रवेश
पनवेल : प्रतिनिधी
गेल्या अनेक दिवसांपासून सुरू सुरू असलेल्या चर्चांवर अखेर आज शिक्का मोर्तब झाले. शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते जे एम म्हात्रे हे आपले पुत्र युवा नेते प्रीतम म्हात्रे आणि आपल्या शेकडो समर्थकांसह भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर करण्यात आले. येत्या ७ मे रोजी शे का पक्षाचे पूर्वाश्रमीचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय जनार्दन भगत यांच्या पुण्यतिथी च्या दिवशी हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे.

जे एम म्हात्रे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपण आपल्या कार्यकर्त्यांशी बोलल्या नंतर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची भेट घेऊन भाजपा पक्ष प्रवेशाचा निर्णय घेतला असल्याचे जाहीर केले. यावेळी पत्रकारांनी त्यांना आपण भाजपात जात असल्याने आता प्रीतम म्हात्रे यांचे पुढील राजकीय भविष्य काय असा सवाल केला असता ते म्हणाले की, “भाजपा हा काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी देणारा पक्ष आहे. त्यामुळे हा पक्ष आम्हा सर्व कार्यकर्त्यांना योग्यरीता सामावून घेईल आणि चांगले काम करणाऱ्या कार्यकर्त्याला नक्कीच चांगली संधी देईल अशी आम्हाला आशा आहे. त्यामुळे आम्ही कोणतेही अट किंवा मागण्या न ठेवता प्रवेश करीत आहोत. भाजपा सत्ताधारी पक्ष असल्याने नक्कीच लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्हाला या सत्तेचा फायदा होणार आहे आणि म्हणूनच आम्ही भाजपाचे निवड केली आहे.”

यावेळी प्रीतम म्हात्रे यांना भाजपामध्ये काम करत असताना आपले कार्यक्षेत्र कोणते असेल असा प्रश्न विचारला असता त्यांनी पनवेल, उरण, खालापूर हे तिन्ही तालुके आपले कार्यक्षेत्र असेल असे सांगितले.
यावेळी जे एम म्हात्रे यांच्यासोबत पनवेल महानगरपालिकेचे अनेक माजी नगरसेवक, ग्रामपंचायतचे सरपंच, सदस्य, शेकापचे पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात आले.

Be First to Comment