Press "Enter" to skip to content

नागरिकांमध्ये तीव्र संताप, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

भूनेश्वर निवी कालवा रोडवर जलजीवन योजनेची अयोग्य पाइपलाईन खोदाई

रोहा : समीर बामुगडे

भूनेश्वर – निवी कालवा रोडवर जलजीवन योजनेच्या पाइपलाईनसाठी झालेली अयोग्य व अनधिकृत खोदाई सध्या प्रचंड वादाचा विषय ठरत आहे. पाटबंधारे विभागाच्या मालकीच्या भूखडावरून ही पाइपलाईन टाकण्यात आली असून, संबंधित ठेकेदाराने कोणतीही परवानगी न घेता ही कारवाई केली असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

या प्रकारामुळे भविष्यात गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या रोडखालील कालवा मार्गावर पाइपलाईन टाकल्यामुळे पावसाळ्यात पाणी वाहून जाण्याचा मार्ग अडवला गेला असून, पूर परिस्थिती उद्भवण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. यामुळे निवी गावातून येताना उजव्या बाजूला असणाऱ्या शेतकरीवर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ठेकेदाराने या कामात शेतकऱ्यांचा कोणताही विचार न करता फक्त स्वतःचा फायदा पाहून ही पाइपलाईन पाटबंधारेच्या भूखडातून टाकली आहे, असा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या ठिकाणी नैसर्गिक परिसंस्थेचा समतोल बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागाने तात्काळ स्थळी भेट देऊन तपासणी करावी, व ठेकेदाराने कोणते नियम मोडले आहेत, याची चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. जलजीवन योजनेच्या नावाखाली निसर्गाची हानी करणाऱ्या अशा ठेकेदारांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी जोरदार मागणी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी केली आहे.

या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात अस्वस्थता निर्माण झाली असून, प्रशासनाने योग्य ती कार्यवाही न केल्यास आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.