Press "Enter" to skip to content

बी एस सी ९७ बॅच चे सलग तिसरे रियुनियन संपन्न

लोणीवली येथील सृष्टी फार्म हाऊस ने अनुभवला मित्रांचा कल्ला

पनवेल / प्रतिनिधी.

  डोंबाळा येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले आर्ट्स सायन्स व कॉमर्स कॉलेज मधून १९९७ साली बीएससी उत्तीर्ण होऊन पदवीधर झालेल्या मित्रांनी २८ वर्षानंतर देखील मैत्रीचा बंध अतूट असल्याची अनुभूती घेतली.२०२३ सालात तब्बल २६ वर्षांनंतर बी एस सी ९७ बॅच चे मित्र प्रथमच एकत्र भेटले होते. त्यानंतर प्रतिवर्षी गेट-टुगेदर करायचेच असे सगळ्यांनी मनोमन ठरवले होते. त्याचाच परिपाक म्हणून रविवार दिनांक ४ मे रोजी सायंकाळी मित्रमेळा फुलला होता. 
   समीर आंबवणे, किसन खारके आणि राजेश हुद्दार या मित्रांनी सर्व बॅचमेट सोबत समन्वय साधत देश परदेशात विखुरलेल्या मित्रांना एकत्र आणण्याची किमया केली. बॅचमेट प्रशांत पाटील यांच्या लोणीवली येथील निसर्गरम्य वातावरणातील सृष्टी फार्म हाऊसवर त्यांच्या आपुलकीने भारलेल्या पाहुणचाराने मित्रांची मने जिंकली. कडक आलिंगने देत,गळाभेटी घेत, दोस्ती मध्ये एखादी शिवी हासडत, तर कुणी धपाटे घालत एकमेकांना भेटले. मग गप्पांचा आणि हास्यकल्लोळाचा धुरळा उडाला.
   सॉफ्ट ड्रिंक्स आणि स्टार्टर चा आस्वाद घेत ख्याली खुशाली, अचिवमेंट, कौटुंबिक विचारपूस सुरू झाली.हळू हळू जुन्या नाजूक आठवणी निघाल्यावर माहोल एकदम रंगीन झाला. त्यानंतर राजेश हुद्दारने माईकची सूत्रे स्वतःच्या हातात घेतल्यानंतर कराओके ट्रॅकवर गाणी गाण्याचा आनंद सगळे घेऊ लागले. हळूहळू त्या गाण्यांच्या तालावर पावले थिरकू लागली. दत्तात्रेय म्हात्रे, समीर आंबवणे, डी के माळी, आनंद जितेकर, रवी म्हात्रे, विजय खिल्लारे यांनी अप्रतिम गाणी सादर केली.गणेश घरत याच्या "ग आई तुझं देऊळ सजतंय..."या गाण्यावर तर मित्रांनी अक्षरशः धुडगुस घातला. नंदकुमार मुंबईकर यांनी सादर केलेल्या स्वरचित कवितांनी उपस्थितांची वाहवा मिळवली.
     दरवर्षी नित्यनेमाने भेटायचे असे सगळ्या मित्रांनी ठरवले असले तरी देखील फक्त खाण्यापिण्याकरता भेटण्यापेक्षा आपल्या बॅचमेट ग्रुपच्या माध्यमातून समाज उत्कर्षाकरता काही हातभार लागला पाहिजे हा विचार करत यंदाचे वर्षी वारदोलि येथील विश्वधर्म वारकरी सामाजिक संस्था यांना शौचालय बांधण्यासाठी ३० हजार रुपयांची देणगी देण्यात आली.बी एस सी ९७ बॅच ने दिलेल्या आर्थिक सहाय्याबद्ल संस्थेचे संस्थापक तथा संचालक ह. भ.प. संजय महाराज पाटील यांनी मनापासून आभार मानले. 
   मित्रांच्या मेळाव्यात दीपक फर्टीलायझर्स अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड कंपनीच्या कामगार युनियनच्या जनरल सेक्रेटरी पदी नियुक्ती झाल्याबद्दल आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भालाफेकपटू आनंद जितेकर तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक सुवर्णपदकांना गवसणी घालणारे पिस्तल शूटर किसन खारके यांना विशेष सन्मानित करण्यात आले.
    समीर आंबवणे, किसन खारके, राजेश हुद्दार, शिवाजी चव्हाण, दत्तात्रय म्हात्रे, भालचंद्र गवंडी, नंदकुमार मुंबईकर, प्रशांत पाटील, विजय खिल्लारे उदय शेळके, रमेश तुपे, डि.के.माळी,दीपक डाऊर, गुरुनाथ वालीलकर, आनंद जीतेकर, मंदार दोंदे, अनिल गोंधळी, नंदकुमार म्हात्रे, गणेश भोईर, कृष्णा म्हात्रे, धनंजय कवाडकर, सचिन देशमुख, योगेश वाणी, बाळकृष्ण पाटील, जीवन माळी, रमेश पाटील, रवी म्हात्रे, सुनील पवार,विनोद तारेकर, विनोद पाटील, सुशीलकांत तारेकर, तुषार यादव, नरेश खुटले,गुरुदत्त कांबळे,नरेश मुसळे, सागर खुटले,नाना भोईर, संतोष चौधरी, सचिन केणी, गणेश घरत आदींनी मित्रमेळ्याचा आनंद लुटला. सगळ्या मित्रांना एकत्र आणून अप्रतिम नियोजन करणाऱ्या टीमचे सगळ्यांनी मुक्तकंठाने कौतुक केले. त्यानंतर सुग्रास शाकाहारी आणि झणझणीत मांसाहारी भोजनाच्या सोबत खुमासदार गप्पा असे डेडली कॉम्बिनेशन सगळ्यांनी अनुभवले. पुढचे गेट-टुगेदर आणखीन दणक्यात करायचे असे ठरवून बीएससी ९७ बॅचमेट्स आपापल्या निवासी मार्गस्थ झाले.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.