
मी शेतकरी कामगार पक्ष सोडून जावे असे वातावरण निर्माण केले जात आहे ; शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते जे एम म्हात्रे यांची पत्रकार परिषदेत खंत
पनवेल : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते जे एम म्हात्रे हे आपले पुत्र प्रीतम म्हात्रे यांच्यासह भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश करणार अशी चर्चा जोर धरू लागली होती. शेतकरी कामगार पक्षाच्या एका बड्या नेत्याने पत्रकार परिषद घेऊन तसा दावा देखील केला होता. त्यावर 29 एप्रिल रोजी जे एम म्हात्रे यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत आपण महाविकास आघाडी मधून बाहेर पडत आहोत मात्र आजही आपण शेतकरी कामगार पक्ष मध्येच आहोत असे जाहीर केले होते.
यावेळी त्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांना आपण पक्ष म्हणून महाविकास आघाडी मधून बाहेर पडलो पाहिजे अशी भूमिका घेणे गरजेचे आहे अशी गळ देखील घातली होती. मात्र त्यांच्या या भूमिकेला शेतकरी कामगार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मात्र समर्थन दिले नाही. त्यानंतर गेले चार ते पाच दिवस जे एम म्हात्रे व प्रीतम म्हात्रे हे शेतकरी कामगार पक्ष सोडून भाजपात प्रवेश करणार अशा चर्चांना ऊत आला होता. त्यावर आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी जे एम म्हात्रे यांनी आज स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.
यावेळी ते म्हणाले की, “विधानसभा निवडणुकीच्या आधी झालेल्या विधान परिषद निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस जयंत पाटील यांच्या विरोधात महाविकास आघाडी मधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रमुखांनी आपला उमेदवार दिला आणि जयंत पाटील यांचा नामुष्कीजनक पराभव केला. एवढेच काय कमी होते तर विधानसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाने ज्या सात जागा लढवल्या त्यापैकी पाच जागांवर याच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आपले उमेदवार दिले आणि शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारांचा पराभव करण्यास ते कारणीभूत ठरले. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचा सांगोला येथे एकमेव आमदार निवडून आला. सुरुवातीला पनवेल आणि उरण मतदार संघातून बाळाराम पाटील व प्रीतम म्हात्रे यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या पक्षाचे एबी फॉर्म दिले. मात्र निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याकरता जात असतानाच याच पक्षप्रमुखांनी त्यांनी दिलेला एबी फॉर्म आमच्याकडून परत मागून घेतला. शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांनी त्यांचा हा झालेला अपमान सहन करणे कितपत योग्य होते ? जेव्हापासून विधानसभा निवडणूक झाली तेव्हापासूनच मी शेतकरी कामगार पक्षाच्या आमच्या नेत्यांना आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडलो पाहिजे असे सांगत होतो. परंतु त्यांनी आपला एवढा अपमान होऊन देखील या भूमिकेकडे लक्ष दिले नाही. अखेर मी माझा निर्णय घेतला आणि महाविकास आघाडीतून बाहेर पडलो. जरी मी महाविकास आघाडीतून बाहेर पडलो असलो तरी शेतकरी कामगार पक्षाचाच कार्यकर्ता होतो. परंतु मला दुःख या गोष्टीचे वाटते की, मी माझा निर्णय घेतल्यानंतर शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांकडून मला दूर ढकलण्यात आले. दोन दिवसांपूर्वी शेतकरी कामगार पक्षाच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन झाले या उद्घाटनाला देखील मला बोलवण्यात आले नाही. त्याचप्रमाणे शेतकरी कामगार पक्षाच्या आज होत असलेल्या कोणत्याच बैठकीचे आमंत्रण मला देण्यात आलेले नाही. यावरूनच येथील शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांनाच आता मी नको आहे. ते स्वतःहून मला दूर ढकलत आहेत. त्यांचे हे असे वागणे असेल तर आमचेही ठरले आहे. मी उद्याच आमच्या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक बोलावणार आहे. त्यांच्यासमोर माझी भूमिका मांडणार आहे आणि कार्यकर्ते बोलतील ती भूमिका कार्यकर्ते बोलतील तो पक्ष हाच माझा निर्णय असेल.”

Be First to Comment