
सनातन संस्थेच्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना ‘ॐ शिव शक्ति ॐ’ पुरस्कार प्रदान !
कन्नूर (केरळ) - सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी तथा महर्षींच्या आज्ञेने देश-विदेशांत लाखो किलोमीटर भ्रमंती करणार्या, तहान-भूक, उन-पाऊस यांची तमा न बाळगता धर्मप्रसार करणार्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना ‘ॐ शिव शक्ति ॐ’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. केरळमधील ‘शिवोहम् टेंपल ऑफ कॉन्शियसनेस ट्रस्ट’च्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला. स्वतःतील आंतरिक शक्ती, दृढ निश्चय आणि कृपाशीर्वाद यांद्वारे नेतृत्व करून दिशादर्शन करणार्या महिलांना हा पुरस्कार देण्यात येतो.
‘सनातन एकल वास्तूरत्न’चे कुलपती ब्रह्मश्री डॉ. सोमनाथ राघवन् आचार्य यांनी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना हा पुरस्कार प्रदान केला. ‘शिवोहम् स्पिरिच्युअल वेलनेस सेंटर’च्या मुख्य चिकित्सक डॉ. ज्योती शमिथ यांनी प्रमाणपत्र देऊन, तर सौ. सुधा रविंद्रनाथ यांनी शाल प्रदान करून श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा सन्मान केला. ‘शिवोहम् टेंपल ऑफ कॉन्शियसनेस ट्रस्ट’ ही अध्यात्म, संस्कृती, ध्यान, योग आदींविषयी जागृती करणारी संस्था असून ती संयुक्त राष्ट्रांच्या ‘यू.एन्. ग्लोबल कॉम्पॅक्ट’शी संलग्न आहे.
*पुरस्कार स्वीकारतांना श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ म्हणाल्या की,* हा पुरस्कार मला मिळाला नसून आमचे गुरुदेव सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना मिळाला आहे. मी केवळ एक माध्यम आहे. गुरुकृपेमुळेच आपण जीवनात यशस्वी होतो. गुरुदेवांच्या कृपेनेच आपले जीवन सात्त्विक होते आणि आपल्या जीवनाला एक अर्थ प्राप्त होतो. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘मनुष्यजन्माचा प्रमुख उद्देश ईश्वरप्राप्ती करणे हाच आहे, हे मनावर बिंबवून समाजाला अध्यात्म आणि साधना यांकडे वळवले आहे. साधनेमुळे व्यक्तीच्या जीवनातील प्रत्येक कर्म सात्त्विक झाले, तर ईश्वरप्राप्ती लांब नाही. ‘समाजात साधनेचा प्रचार-प्रसार करणे आणि समाजाला समष्टी साधनेविषयी अवगत करणे’, हा आपला धर्म आहे. यामुळे समाजात जागृती निर्माण होईल आणि आपले राष्ट्र सात्त्विक होईल, असेही त्यांनी सांगितले.
या वेळी ब्रह्मश्री डॉ. सोमनाथ राघवन् आचार्य म्हणाले की, आपल्या गुरूंचे कृपाशीर्वाद आणि त्यांचा परीसस्पर्श लाभल्यास आपण अध्यात्माच्या मार्गावर मार्गक्रमण करू शकतो. तर ‘जागतिक शांतता संघटने’चे आंतरराष्ट्रीय महासचिव प्रा. डॉ. सुरेश के. गुप्तन् म्हणाले की, जगात ६५ टक्के जनतेमध्ये निराशा दिसून येते. या सर्व आजारांना मानवी भावना हे कारण आहे. या भावनांवर नियंत्रण असणे आवश्यक आहे. शिवोहम् टेंपल ऑफ कॉन्शियसनेस ट्रस्टचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सी.व्ही. रविंद्रनाथ यांच्या कन्या शुभा रविंद्रनाथ यांनी कार्यक्रमाच्या आरंभी सर्वांचे स्वागत केले. त्यानंतर ‘निर्वाण षट्कम’ म्हणण्यात आले. ‘कृष्णा बिच रिसॉर्ट’चे श्री. सुमल यांनी आभारप्रदर्शन केले.

Be First to Comment