सोलापूर / प्रतिनिधी दि. ३ :
शिक्षणक्षेत्रात विविध उपक्रमाद्वारे विद्यार्थी गुणवत्ता विकासासाठी कार्य करणाऱ्या आणि विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता व संस्कार रुजवणाऱ्या राज्यातील विविध जिल्ह्यातील पंधरा महिला शिक्षिकांना वुमन टीचर्स फोरम व स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशन अर्थात सर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ‘राज्यस्तरीय नारीशक्ती सन्मान पुरस्कार–2025’ जाहीर झाला आहे. सोलापूर येथील शिवछत्रपती रंगभवन सभागृह येथे 4 मे 2025 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा परिषद सोलापूरचे मुख्यकार्यकारीअधिकारी मा.कुलदीप जंगम व प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. यावेळी परीक्षा परिषद,पुणेचे उपायुक्त,संजयकुमार राठोड, जिल्हा परिषद सोलापूर प्राथमिकचे शिक्षणाधिकारी कादर शेख, शिक्षण व दिव्यांग क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्या मा. सुजाता लोहोकरे, समाजकल्याण सोलापूरच्या सहायक आयुक्त सुलोचना सोनवणे, राज्य कामगार विमा रुग्णालय मुंबई चे मुख्य प्रशासन अधिकारी डॉ. शशिकांत शिंदे व महिला बालविकास जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
सर फाउंडेशन हे देश स्तरावरील प्रयोगशील व उपक्रमशील शिक्षकांचे नेटवर्क आहे. याद्वारे विविध उपक्रमांच्या माध्यमातून गुणवत्ता विकास व शिक्षकांचे सक्षमीकरण साधण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचाच भाग म्हणून महिला दिनानिमित्त राज्यस्तरीय नारीशक्ती सन्मान पुरस्कार सोहळा आयोजित केला जातो. नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतींचा स्वीकार, उपक्रमशीलता आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न आणि त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन राज्यातील 15 आणि सोलापूर जिल्ह्यातील 31 महिला शिक्षिकांची निवड करण्यात आली आहे. शिक्षण क्षेत्रासाठी भरीव असे योगदान दिल्याबद्दल त्यांच्या कार्याचे कौतुक करून त्यास अधिक बळकटी देण्यासाठी त्यांचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती फाउंडेशनच्या राज्य समन्वयक सौ.हेमा शिंदे-वाघ यांनी सांगितले. पुरस्कार प्राप्त सर्व महिला शिक्षिकांचे सर फाउंडेशनचे समन्वयक हेमा शिंदे, सिद्धाराम माशाळे, बाळासाहेब वाघ,
यांनी पुरस्कार निवडीबद्दल अभिनंदन केले आहे.
राज्यस्तरीय नारीशक्ती सन्मान पुरस्कार प्राप्त शिक्षिका-
प्रतिभा वसंतराव जोशी-अकोला, शीला जानरावजी मसराम-अमरावती, नीता भास्कर अरसुळे-जालना, ज्ञानेश्वरी आनंदराव शिंदे-धाराशिव, योगिनी यल्लाप्पा वैदू-रायगड, सत्यदेवी किशनराव बनवसकर-रायगड, अंजली कमलाकर स्वामी-लातूर, महादेवी धोंडीराम पाटील-सांगली, मनीषा शंकर रामगुडे-सातारा, मंगला सुरेश नाईकनवरे- सोलापूर, सोनी प्रभाकर कानडे- माळशिरस सोलापूर, सौ.ज्योती सचिन कलुबर्मे-मंगळवेढा, सोलापूर,प्रतिभा सुरेश जाधव-दक्षिण सोलापूर,सोलापूर, किशोरी शिवाजी भोर-अहिल्यानगर, अश्विनी चंद्रकांत चव्हाण-सोलापूर .

रायगड जिल्ह्यातून नारी शक्ती पुरस्कार जाहीर झालेल्या योगिनी यल्लाप्पा वैदू.




Be First to Comment