
नागोठणे : याकूब सय्यद
डोलवीतील जेएसडब्ल्यू (जिंदाल स्टील वर्क्स) प्रकल्पासाठी उभारण्यात येत असलेल्या ४००/२२० के.व्ही. उच्चदाब वीज वाहिनीविरोधात रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मोबदला ठरवण्याआधीच आणि कोणतीही परवानगी न घेता थेट शेतजमिनींमध्ये टॉवर उभारणीचे काम सुरू करण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
खारकोलेटी, कोलेटी, बाहेरशिव तसेच डोलवी परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी या प्रकल्पामुळे बाधित होत असून, कोणतीही पूर्वसूचना न देता वीज वाहिनीच्या कामाचा अंमल सुरू करण्यात आला आहे. या कामाची जबाबदारी बीएनसी पॉवर प्रोजेक्ट्स लिमिटेड या खाजगी कंत्राटदार कंपनीकडे देण्यात आली आहे.
बाहेरशिव येथील शेतकरी पांडुरंग साळुंखे यांच्या जमिनीमध्ये परवानगीशिवाय काम सुरू झाल्याचा आरोप करण्यात आला असून, त्यांनी यासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा दिला आहे. याशिवाय, गावातील महिलांनी विरोध दर्शवल्यावर “मातीत गाडून टाकू” अशी धमकी दिल्याचा आरोप बीएनसी कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर करण्यात आला आहे. याबाबत रायगड पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
या प्रकल्पाच्या कामात गावकऱ्यांना विश्वासात घेतले गेले नाही. जमिनीचा मोबदला, नुकसानभरपाई किंवा पर्यायी व्यवस्था याबाबत कुठलाही स्पष्ट निर्णय किंवा संवाद प्रशासनाने केलेला नाही, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर आज रोहा येथील उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनात संबंधित अधिकाऱ्यांसमवेत शेतकऱ्यांची बैठक पार पडली. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी काम तात्काळ थांबवण्याची मागणी करत रेट अंतिम न होईपर्यंत कोणतीही उभारणी न करण्याचा ठाम पवित्रा घेतला आहे.
अजित शिर्के, चंद्रकांत दुर्गवले, प्रशांत भोईर, मिलिंद डाके, रुपेश डाके, योगेश डाके, दीपक डाकी, ज्ञानेश्वर शिर्के, प्रकाश शिर्के, शशिकांत शिर्के, रवींद्र भोईर, जितेंद्र मढवी, किसन मढवी, मधुकर मढवी, संतोष भालेकर, प्रमोद शिर्के, रवींद्र शिर्के, राजेश शिर्के यांनी विरोध केला आहे.

Be First to Comment