महाराष्ट्राच्या संघाने पटकावला दुहेरी सन्मान
पनवेल/ प्रतिनिधी.
कर्नाटक राज्यातील मंगलोर येथे नुकतीच राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धा संपन्न झाली. राज्यभरातील विविध संघांनी यामध्ये आपले कसब पणाला लावले. या स्पर्धांच्यांत महाराष्ट्र राज्याने दुहेरी सन्मान पटकावला. राष्ट्रीय स्पर्धेत मुलांचा संघ अव्वल ठरला तर मुलींच्या संघाला अंतिम सामन्यात यशाने थोडक्यात हुलकावणी दिल्याने दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या संघात दोन पनवेलकर चमकले आहेत.
पनवेल मधील तरुण विद्यार्थी मितांशू प्रशांत कर्पे आणि विक्रम अरविंद जयस्वाल यांनी राष्ट्रीय स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी केली. राष्ट्रीय स्पर्धेत अव्वल ठरलेल्या महाराष्ट्राच्या विजयामध्ये या दोघांचा सिंहाचा वाटा आहे. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या संघात रायगड जिल्ह्यातील सहा मुले तर मुलींच्या संघात रायगड मधील तीन मुलींची निवड झाली होती. स्पर्धेमध्ये मुलांचे ३२ तर मुलींचे २९ संघ सहभागी झाले होते.
मितांशू कर्पे आणि विक्रम जयस्वाल यांनी पनवेलच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवल्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.


Be First to Comment