
खांदा कॉलनी पनवेल येथील आंदोलनात काश्मीरमधील पर्यटकांच्या क्रूर हत्येचा तीव्र निषेध करत कठोर सैन्य कारवाईची मागणी !
उरी, पठाणकोट, पुलवामा आदी दहशतवादी हल्ल्यांना चोख उत्तर दिल्यानंतरही असे हल्ले थांबायला तयार नाहीत. हे काश्मीरच्या पहलगामधील भीषण दहशतवादी हल्ल्यावर पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. येथे दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर त्यांचा धर्म विचारून २८ जणांची निर्दयीपणे हत्या केली. यात एका नवविवाहितेसमोरच तिच्या पतीला मारण्यात आले. ही घटना दहशतवाद्यांची केवळ क्रूरताच नव्हे, तर भारताच्या सार्वभौमत्वावर आणि हिंदू समाजावर झालेले थेट आक्रमण दर्शवते. हे जिहादी आक्रमण काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराचाच पुढचा भाग आहे. याचा केवळ निषेध न करता भारत सरकारने जिहादी अतिरेक्यांना आणि त्यांच्या भारतातील हस्तकांना जन्माची अद्दल घडेल, अशी कठोर सैन्य कारवाई करावी, अशी मागणी *छत्रपती शिवाजी महाराज चौक, खांदा कॉलनी पनवेल येथे हिंदू जनजागृती समितीच्या वतीने केलेल्या आंदोलनातून केली. या आंदोलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, मावळा प्रतिष्ठान, सनातन संस्था विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधीसह राष्ट्रप्रेमी नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
या हल्ल्यात बळी पडलेले २८ पर्यटक देशभरातील विविध राज्यांतील असल्याने यातून संपूर्ण देशभरात दहशत माजवण्याचा दहशतवाद्यांचा उद्देश स्पष्ट होतो. हत्येचे जे व्हिडिओ आणि छायाचित्रे समाजमाध्यमांवर प्रसारित झाली आहेत, ती पाहिल्यानंतर ही क्रूरता मानवतेलाही लाजवणारी आहे. गेल्या काही काळात हिंदू व्यावसायिक, कर्मचारी, काश्मीरी हिंदूंवर सातत्याने हल्ले होत आहेत. केंद्र सरकारने ३७० कलम रद्द करून काश्मीरला भारतीय घटनेच्या संपूर्ण चौकटीत आणले, निवडणुका घेतल्या, विकासाचे प्रयत्न केले; पण तरीसुद्धा जिहादी अतिरेकी कारवाया थांबायला तयार नाहीत. तसेच असे भीषण दहशतवादी हल्ले स्थानिकांच्या सहभागाशिवाय होणे शक्य नाही. वर्ष १९९० मध्ये ९० हजार हिंदूंची हत्या आणि साडेचार लाख काश्मिरी हिंदूंचे बलपूर्वक विस्थापन अशाच पद्धतीने करण्यात आले होते. आता ही आक्रमणे याच षड्यंत्राचा पुढचा भाग आहेत. त्यामुळे या हल्ल्यात कोणत्या संघटना, नेते वा जिहादी आतंकवादी सहभागी आहेत, हे शोधून त्यांच्यावर ‘दशहतवादविरोधी कायद्यां’र्गत कठोर कारवाई करून कायमचा धडा शिकवला पाहिजे, अशी मागणी समितीने केली आहे.
काश्मीर खोऱ्यामध्ये व्यापक ‘कोंबिंग ऑपरेशन’ राबवून अतिरेक्यांचा बीमोड करावा, ज्या परिसरातून सतत अतिरेकी हल्ले होत आहेत, तेथे कायमस्वरूपी लष्करी तळ उभारण्यात यावेत. काश्मीरमधील उरलेले हिंदू पर्यटक, व्यावसायिक आणि हिंदू पंडित यांचे जीवित रक्षण करण्यासाठी विशेष सुरक्षा आराखडा लागू करण्यात यावा, अशा मागण्याही या वेळी करण्यात आल्या.




Be First to Comment