पनवेल नाईट मार्केट 3.0 चे रंगारंग आयोजन
पनवेल /प्रतिनिधी.
पनवेल मधील सुप्रसिद्ध "पनवेल स्मार्ट मम्मीज" या संस्थेच्या वतीने पनवेल नाईट मार्केट या इव्हेंटचे आयोजन करण्यात आले आहे. या इव्हेंट्स चे यंदाचे तिसरे वर्ष आहे. महिलांमधील सुप्त गुणांना वाव देण्याच्या पनवेल स्मार्ट मम्मीज यांच्या उद्देश पूर्तीच्या अनुषंगाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. २६ आणि २७ एप्रिल रोजी सायंकाळी चार ते दहा दरम्यान पनवेल नाईट मार्केट इव्हेंट साजरा होणार असून यासाठी प्रवेश विनामूल्य असणार आहे.
महिलांनी केवळ चूल आणि मुल एवढ्यापुरतच मर्यादित न राहता स्वतःमधील अंगभूत गुणांसाठी आणि स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासासाठी सुद्धा वेळ दिला पाहिजे. याच प्रामाणिक भूमिकेतून संस्थापिका शितल ठक्कर यांच्या नेतृत्वाखाली १६ वर्षांपूर्वी पनवेल स्मार्ट मम्मी या ग्रुपची स्थापना करण्यात आली. आतापर्यंत या संस्थेच्या वतीने महिलांकरता अनेक लोकाभिमुख कार्यक्रम राबविले गेले आहेत. विविध फॅशन शो, क्रीडा स्पर्धा, हळदी कुंकू, कार्यशाळा, पिकनिक,भोंडला अशा अनोख्या कार्यक्रमांच्या माध्यमातून संसारात गुरफटलेल्या मम्मीज ना एक खुला रंगमंच उपलब्ध करून देण्याचे काम ही संस्था प्रामाणिकपणे करत आहे.
संस्थेच्या याच उद्दिष्ट पूर्तीच्या अनुषंगाने पनवेल नाईट मार्केट ही संकल्पना राबविण्यात आली. यामध्ये होतकरू महिलांनी उभारलेले विविध स्टॉल असणार आहेत. विविध लाईव्ह फूड कॉर्नर्स असणार आहेत. तसेच धमाकेदार डीजे नाईट, लहान मुलांसाठी फॅशन शो आणि मिस्टर अँड मिसेस पनवेल ग्लोबल टायटल असणारा फॅशन शो हे या इव्हेंटचे प्रमुख आकर्षण असतील.
राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळींची या इव्हेंटला प्रमुख उपस्थिती असणार आहे. पनवेल मधील विठोबा खंडाप्पा हायस्कूलच्या भव्य प्रांगणावर पनवेल नाईट मार्केट चे आयोजन करण्यात आले आहे. रंगारंग कार्यक्रमाने खच्चून भरलेल्या या इव्हेंटमध्ये प्रवेश विनामूल्य असणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन शीतल ठक्कर तसेच पनवेल स्मार्ट मम्मीज यांच्या वतीने करण्यात आले आहे.



Be First to Comment