Press "Enter" to skip to content

नेत्रदिपक सोहळ्यामध्ये बाल रक्षकांना करण्यात आले सन्मानित

शिक्षणापासून वंचित मुलांना मूळ प्रवाहात आणण्याचे अतुलनीय कार्य करतात बालरक्षक

प्रतिनिधी/ नाशिक.
नुकतेच नाशिक येथील औरंगाबादकर नाट्यगृहात झालेल्या नेत्रदीपक सोहळ्यामध्ये असामान्य बालरक्षकांना जीवनगौरव आणि कार्य गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. एका अभिनव चळवळीतील सेवाभावी वृत्तीने कार्य करणाऱ्या बालरक्षकांच्या असामान्य कार्यकर्तुत्वाला यावेळी गौरविण्यात आले.
शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे अतुलनीय कार्य करीत असल्याबद्दल प्रत्येक बालरक्षक व त्यांना प्रशासकीय पाठबळ देणाऱ्या सक्षम हातांना जीवनगौरव पुरस्काराने यावेळी सन्मानित करण्यात आले.यामध्ये पनवेल येथील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळोजे पाचनंद येथील उपशिक्षिका योगिनी यल्लाप्पा वैदू यांना गौरविण्यात आले.त्या २०१७ पासून शाळाबाह्य मुलांसाठी करत असलेल्या कार्याची दखल घेत त्यांना जीवन गौरव पुरस्कार बहाल करण्यात आला. योगिनी वैदू यांनी अनेक शाळाबाह्य मुलांना शिक्षण प्रवाहात आणले आहे. शिक्षणापासून वंचित असणाऱ्या मुलांना त्यांच्या जवळच्या शाळेत प्रवेशित करण्यासाठी वेळोवेळी त्या कार्य करीत आल्या आहेत.
या कार्यक्रमात बाल रक्षक संकल्पनेचे आधारवड मानले जाणारे माजी उपसंचालक एस सी आर टी शोभा खंदारे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या तसेच या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक किनो एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष रईस शेख देखील उपस्थित होते. पुणे येथील पदपथावरील शाळा चालवणारे तृतीयपंथी डॉक्टर आम्रपाली उर्फ अमित मोहिते यांनीही आपला अमूल्य वेळ देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली.TDRF महाराष्ट्र राज्य संचालक हरिश्चंद्र राठोड यांच्या अद्वितीय भाषणाने सभागृह भारावून गेले. शिक्षण अधिकारी पोपटराव काळे,अकोला शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर, SCERT डॉक्टर अरुण जाधव प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. महाराष्ट्रातील अष्टपैलू हिरा आदरणीय भरत काळे यांच्या प्रास्ताविकेने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
महाराष्ट्राच्या तळागाळातून आलेले हिरे केवळ नावानेच नाही तर कर्तुत्वाने चमकणारे बालरक्षक समर्पित भावनेतून हे कार्य करत असतात. प्रत्येकाच्या मुखात एकच वाक्य होतं की हा सन्मान बालरक्षकाचा नाही तर हा सन्मान मानवतेचा आहे! या कार्यक्रमाला मूर्त स्वरूप देण्यासाठी अहोरात्र परिश्रम करणारे विनोद राठोड यांची सर्वांनीच मनोगताच्या माध्यमातून मुक्त कंठाने प्रशंसा केली. या अभिनव संकल्पनेला पुन्हा एकदा बळकटी देण्यासाठी विनोद राठोड यांनी अक्षरशः महाराष्ट्र पिंजून काढला आहे. विनोद राठोड व त्यांच्या टीमने समन्वयाचा आदर्श नमुना पेश करत एक नेत्र दीपक सोहळ्याचे आयोजन केल्याबद्दल त्यांच्यावर स्तुती सुमनांचा वर्षाव होत होता.
विविध कारणास्तव शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये समाविष्ट करण्यासाठी झटून काम करणाऱ्या बालरक्षकांचे कौतुक करावे तितके थोडेच असेल. दुर्गम विभागातील मुले, आदिवासी वनवासी यांची मुले, भटक्या प्रजातीतील मुले, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील मुले ही सातत्याने शिक्षणापासून फारकत घेत असतात. अशा मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे असामान्य काम बालरक्षक करत असतात. या अभियानातील त्यांचे योगदान अतुलनीय असले तरीदेखील काही कारणास्तव बालरक्षक हे दुर्लक्षित राहिलेले होते. नाशिक मध्ये झालेल्या कार्यक्रमाने बालरक्षकांच्या कामाला उभारी मिळेल व त्यांना पाठबळ मिळाल्यामुळे हे अभियान अधिक जोमाने कार्यरत राहील.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.